मराठी

असाधारण श्रद्धा 

१ फेब्रुवारी २०२२
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा मंगळवार
आजची वाचने

व्हिडिओ

“मी केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला, तरी बरी होईन.” लगेच तिचा रक्तस्राव थांबला. आपण त्या व्याधीतून बरे झालो आहोत, हे तिला शरीरात जाणवले.  मार्क 5:28-29

बारा वर्षे रक्तस्रावामुळे फार त्रास सहन करणाऱ्या त्या स्त्रीचे हे विचार आणि हा तिचा अनुभव. तिने अनेक वैद्यांकडे धाव घेतली आणि बरे होण्याच्या प्रयत्नात आपल्याजवळ होते ते सर्व खर्च केले. दुर्दैवाने, कशाचाही उपयोग झाला नाही.

आपली श्रद्धा सर्वांसमोर प्रकट करण्याची ही विशिष्ट संधी तिला मिळावी म्हणून देवाने तिचे दुःख इतकी वर्षे चालू राहू दिले असावे. विशेष म्हणजे, ती येशूजवळ येत असताना तिच्या मनात काय चालले होते, हे या उताऱ्यात आपल्याला कळते. “मी केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला, तरी…” तिच्या मनातला हा विचार म्हणजे श्रद्धेचे एक सुंदर उदाहरण आहे.

आपण बरे होऊ, हे तिला कसे कळले असेल? तिला इतक्या स्पष्टपणे आणि इतक्या ठामपणे असे का वाटले असेल? भेटेल त्या डॉक्टरकडे बारा वर्षे उपचार घेतल्यानंतर, बरे होण्यासाठी येशूच्या वस्त्राला केवळ स्पर्श करणे पुरेसे आहे, हे तिला अचानक कसे उमगले? उत्तर सोपे आहे. कारण तिला श्रद्धेची देणगी मिळाली होती.

तिच्या श्रद्धेच्या या उदाहरणावरून दिसते की श्रद्धा म्हणजे केवळ देवच प्रकट करू शकतो अशा गोष्टीचे अलौकिक ज्ञान. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ती बरी होणार आहे हे तिला माहीत होते, आणि हे ज्ञान तिला देवाकडून देणगी म्हणून मिळाले होते. हे ज्ञान मिळाल्यावर तिला त्यानुसार कृती करायची होती. तसे करून तिने तिची कथा वाचणाऱ्या सर्वांसमोर आपल्या श्रद्धेची सुंदर साक्ष दिली. 

तिच्या जीवनाने, आणि विशेषतः या अनुभवाने, आपल्याला एका गोष्टीची जाणीव व्हायला हवी: आपण कान दिले, तर देव आपल्यालाही गहन सत्ये सांगतो. तो सतत आपल्याशी बोलतो, आपल्या प्रेमाची खोली आपल्याला उलगडून दाखवतो आणि आपली श्रद्धा कृतीतून दिसेल असे जीवन जगण्यास आपल्याला बोलावतो. आपली श्रद्धा केवळ आपल्या जीवनाचा पाया असावी असे नव्हे, तर ती इतरांसाठी प्रभावी साक्षही ठरावी, अशी त्याची इच्छा आहे.

आज त्या स्त्रीच्या अंतःकरणात श्रद्धेतून आलेल्या दृढ खात्रीवर चिंतन करा. तिने देवाचे बोलणे मन लावून ऐकले, म्हणून देव आपल्याला बरे करील याची तिला खात्री होती. देवाच्या आवाजाकडे तुम्ही अंतःकरणाने किती लक्ष देता, यावर विचार करा. या पवित्र स्त्रीने ज्या गाढ श्रद्धेची साक्ष दिली, तशीच श्रद्धा स्वीकारण्यासाठी आपले मन खुले ठेवण्याचा प्रयत्न करा.

हे माझ्या करुणामय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुला ओळखावे आणि दररोज तू माझ्याशी काय बोलतोस ते ऐकावे, अशी माझी इच्छा आहे. माझी श्रद्धा वाढव, म्हणजे मला तुला ओळखता येईल आणि माझ्या जीवनासाठी तुझी इच्छा काय आहे हे समजेल. इतरांसमोर श्रद्धेची साक्ष देण्यासाठी तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

इतर ब्लॉग आणि चिंतने

वर दिलेले चित्र: ‘मरिया मग्दालेनाचे मनपरिवर्तन’ — चित्रकार पाओलो व्हेरोनेझे, विकिपीडियावरून