22 मे 2022
पुनरुत्थानकाळातील सहावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “जो माझ्यावर प्रेम करतो, तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वास करू.” योहान 14:23
आपल्या प्रभूने तुमच्याकडे यावे आणि तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात वास करावा, असे तुम्हाला वाटते का? बहुधा तुम्ही सहजच म्हणाल, “होय.” यासाठी देवावर प्रेम करा आणि त्याचे वचन पाळा. तुम्ही असे कराल तेव्हा पवित्र त्रैतत्त्व तुमच्यामध्ये येऊन वास करील.
देवाचे आपल्यावरील प्रेम हे जणू आपण त्याच्यावर किती प्रेम करतो यावर अवलंबून आहे, असे वाटते. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे, आपण आधी देवावर प्रेम केले तरच तो आपल्यावर प्रेम करतो का? नेमके सांगायचे तर, आपण देवावर प्रेम केले किंवा नाही, तरी त्याचे आपल्यावरील प्रेम परिपूर्ण असते. तरीही, जेव्हा प्रेमाचा स्वीकार होतो आणि त्याला प्रेमानेच प्रतिसाद दिला जातो, तेव्हा त्या प्रेमाला एक नवे रूप येते. म्हणून आपण देवावर प्रेम करण्याचे निवडतो, तेव्हा अचानक आपल्या लक्षात येते की आपल्या प्रेमामुळे त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणाचे दार उघडते. तो आपल्यामध्ये येऊन वास करतो, आपल्याला बदलतो आणि आपल्या हृदयाला त्याचे पवित्र मंदिर बनवतो. किती गौरवशाली देणगी!
देवावर प्रेम करण्याचा एक भाग म्हणजे त्याच्या आज्ञेत राहणे, हीदेखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण हे देवाच्या स्वभावाशी सुसंगत आहे. तो स्वतः प्रेम आहे. म्हणून त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे आपली इच्छा पूर्णपणे त्याच्या इच्छेला समर्पित करणे. सर्व बाबतींत त्याच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन करणे, हा त्याच्यावर प्रेम करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. अशा रीतीने तुम्ही त्याला तुमच्यामध्ये वास करू देता आणि तुमच्या इच्छेची सूत्रे त्याच्या हाती सोपवता. तेव्हाच तुम्ही तुमच्या संपूर्ण अस्तित्वाने त्याच्यावर अधिक पूर्णपणे प्रेम करू शकता.
परमपवित्र त्रैतत्त्वाने तुमच्या आत्म्यात येऊन वास करावा, या तुमच्या इच्छेवर आज विशेष चिंतन करा. हेच आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे. देव आपल्यामध्ये वास करत असेल, तर जीवनात बाकीचे सर्व काही आपापल्या जागी येईल. सर्व गोष्टींतून भले घडेल आणि आपल्यामध्ये व आपल्याद्वारे देवाचा गौरव होईल. आज त्याच्या आज्ञेत राहून त्याच्यावर प्रेम करण्याचे निवडा. त्यामुळे त्याच्याशी असलेले तुमचे प्रेमाचे नाते झपाट्याने दृढ होईल.
हे परमपवित्र त्रैतत्त्वा, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि आज तुझ्यावर अधिक परिपूर्ण रीतीने प्रेम करण्याची माझी इच्छा आहे. सर्व बाबतींत तुझ्या परिपूर्ण इच्छेला शरण जाण्यास मला मदत कर. सदैव पूर्णपणे तुझ्या आज्ञेत राहण्यास मला मदत कर. मी अशा प्रेमाने तुला शरण जात असताना, ये आणि माझ्यामध्ये वास कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत –कॅशियाची संत रीटा
यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनेत त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जात नाही




