गुरुवार, 23 जून 2022
संत योहान बाप्तिस्ताच्या जन्माचे महापर्व
टीप: 2022 मध्ये हे महापर्व नेहमीप्रमाणे 24 जून रोजी न साजरे करता आज, 23 जून रोजी साजरे केले जाते, कारण यंदा येशूच्या पवित्र हृदयाचे महापर्व 24 जून रोजी येते.

त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि त्यावर लिहिले, “त्याचे नाव योहान आहे.” तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाचा धन्यवादा करू लागला. लूक 1:63-64
जखऱ्याचे जीवन आपल्या सर्वांसाठी एक प्रभावी साक्ष आहे. देवावर विश्वास न ठेवल्यामुळे त्याने पाप केले; पण त्या पापामुळे झालेली मानहानी सोसल्यानंतर तो देवाशी खरोखर निष्ठावान झाला आणि अखेरीस “देवाचा धन्यवाद” करू लागला.
जखऱ्याची कथा आपल्याला परिचित आहे. त्याच्या पत्नीला म्हातारपणी चमत्काराने गर्भ राहिला. तिच्या पोटी योहान बाप्तिस्ता जन्माला येणार होता. हे घडणार असल्याचे एका देवदूताने जखऱ्याला सांगितले, पण त्याने या वचनावर विश्वास ठेवला नाही; उलट त्याने शंका घेतली. त्यामुळे योहानाचा जन्म होईपर्यंत त्याची वाचा गेली. बाळाचा जन्म झाला तेव्हा देवदूताने सांगितल्याप्रमाणे जखऱ्याने त्याचे नाव “योहान” ठेवले आणि अशा रीतीने देवाने प्रकट केलेल्या गोष्टीशी निष्ठा दाखवली. जखऱ्याच्या या निष्ठावान कृतीने त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाची स्तुती करू लागला.
आपल्या जीवनात देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूनही ज्यांना अपयश आले आहे, त्या सर्वांना जखऱ्याच्या या साक्षीतून प्रेरणा मिळावी. अनेकदा देव आपल्याशी बोलतो, आपण त्याचे बोलणे ऐकतो, पण तो जे सांगतो त्यावर विश्वास ठेवत नाही. आपण त्याच्या वचनांशी निष्ठावान राहत नाही. परिणामी, त्या पापाचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
आपल्या जीवनात पापाचे जे दुष्परिणाम होतात, ते सुरुवातीला शिक्षेसारखे वाटू शकतात. अनेक अर्थांनी ती शिक्षाच असते. पण ती देवाने दिलेली शिक्षा नसते; ती पापातूनच ओढवते. पापाचे आपल्या जीवनावर विनाशकारी परिणाम होतात. पण आशेची गोष्ट अशी की, आपण पुन्हा त्याच्याशी निष्ठावान व्हावे म्हणून देव पापाचे हे परिणाम घडू देतो. जखऱ्याप्रमाणे आपणही या परिणामांतून नम्र होऊ दिले आणि स्वतःला बदलू दिले, तर देवाच्या इच्छेशी एकनिष्ठ न राहण्याचे जुने जीवन सोडून आपण निष्ठेचे जीवन जगू शकू. आणि अशा निष्ठावान जीवनामुळे अखेरीस आपल्याला आपल्या देवाची स्तुती गाता येईल.
आज आपल्या जीवनात कोणकोणत्या बाबतींत आपण देवाशी निष्ठावान राहिलो नाही, यावर चिंतन करा. पण हे करताना आशा बाळगा. तुम्ही देवाकडे परतलात, तर तो तुम्हाला पुन्हा स्वीकारेल आणि तुमचे जीवन बदलेल, अशी आशा ठेवा. देव तुमची वाट पाहत आहे आणि त्याची दया विपुल आहे. त्याच्या दयेने तुमचे अंतःकरण भरून जाऊ द्या, म्हणजे तुम्ही मनापासून देवाच्या चांगुलपणाचा धन्यवाद कराल.
हे प्रभू, माझ्या गतकाळातील पापांकडे पाहून निराश होण्याऐवजी, ती अधिक निष्ठेने तुझ्याकडे परतण्याची कारणे आहेत, हे मला जाणू दे. मी कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभे राहण्यास आणि निष्ठेने तुझे स्तुतिगान करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनाचा कालावधी : १५ ते २३ जून २०२२
२४ जून २०२२ : येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव
अधिक वाचन – संत योहान बाप्तिस्ता यांचा जन्म




