14 ऑगस्ट 2022
सामान्य काळातील विसावा रविवार, वर्ष क
आजची वाचने

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “मी पृथ्वीवर आग लावायला आलो आहे, आणि ती आताच भडकलेली असावी, अशी माझी किती उत्कट इच्छा आहे!” लूक 12:49
या उताऱ्यातून आपल्याला दोन गोष्टी कळतात. पहिली म्हणजे, “पृथ्वीवर आग लावण्याचा” येशूचा हेतू. दुसरी म्हणजे, “ती आताच भडकलेली असावी,” ही त्याची इच्छा.
मी जगाला आग लावायला आलो आहे, असे येशू म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? आग ही एक प्रभावी प्रतिमा आहे; तिच्यातून ख्रिस्ती जीवनाविषयी बरेच काही समजते. पहिली गोष्ट अशी की आग तिच्या संपर्कात येणारे सर्व काही जाळून टाकते. ख्रिस्ताच्या बाबतीतही असेच आहे. तो आपल्याला त्या आगीसारखे पूर्णपणे व्यापून टाकायला आला. आपल्या छोट्याशा जीवनांचे धगधगत्या ज्वाळांत रूपांतर करायला तो आला. यावरून दिसते की आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात किती मोठी क्षमता आहे. कृपेच्या ठिणगीने आपले आत्मे पेटू दिले, तर आपण पूर्णपणे नवे होऊ शकतो.
आगीत बदल घडवून आणण्याचीही शक्ती आहे. तिची उष्णता आपल्याला ऊब देते, तिच्या प्रकाशामुळे अंधारात आपल्याला दिसते, आणि तिच्या ऊर्जेपासून विविध प्रकारे मिळणारी शक्ती आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. कृपेचेही तसेच आहे. देवाची कृपा आपल्या थंड पडलेल्या हृदयांचे रूपांतर करते, जीवनातील अंधारातून आपल्याला वाट दाखवते आणि फलदायी जीवन जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते आपल्याला देते.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे: येशूने केवळ ‘मी जगाला आग लावायला आलो आहे’ असे म्हटले नाही; ती आताच भडकलेली असावी, अशी त्याने इच्छा व्यक्त केली. आपल्या प्रभूची ही इच्छा म्हणजे सुमार आणि कोमट जीवनातून बाहेर पडून पूर्ण निष्ठेने ख्रिस्ती जीवन जगण्याचे आमंत्रण आहे. केवळ थोडेसे, किंवा अगदी बऱ्याच अंशी बदलावे, एवढ्यासाठी आपल्याला बोलावलेले नाही. नाही, देवाने आपले रूपांतर करावे आणि आपण श्रद्धेच्या धगधगत्या ज्वाळा बनून जगात खरा बदल घडवावा, यासाठी आपल्याला बोलावले आहे!
आज आपल्या आत्म्यातील अग्नीचे चिंतन करा. तो किती तेजाने जळत आहे? दररोज त्या अग्नीला इंधन घालण्याची आणि पूर्ण समर्पणाने तो फुलवण्याची गरज आहे. तुम्ही धगधगती ज्योत व्हावे, अशी प्रभूची इच्छा आहे. तसे होण्याचा प्रयत्न करा; कृपेने तुमचे किती पूर्णपणे रूपांतर होऊ शकते, हे पाहून तुम्ही थक्क व्हाल.
हे प्रभू, तुझ्या प्रेमाच्या आणि दयेच्या तेजाने माझे हृदय प्रज्वलित कर. माझ्या जीवनाचे संपूर्ण रूपांतर व्हावे अशी तुझी इच्छा आहे; ते रूपांतर स्वीकारण्यास मला तयार कर. हे प्रिय प्रभू, मी स्वतःला पूर्णपणे तुला समर्पित करतो. तुझ्या इच्छेप्रमाणे माझा उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
रविवारची आणखी चिंतने आणि प्रवचने व्हिडिओत पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आजचे संत – संत मॅक्सिमिलियन मेरी कोल्बे, धर्मगुरू व ख्रिस्तसाक्षी शहीद
यंदा हा दिवस रविवारी येत असल्याने उपासनेत त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जात नाही




