मराठी

नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशव्यांत

2 सप्टेंबर 2022
सामान्य काळातील बाविसाव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

व्हिडिओ

“कोणीही नवा द्राक्षारस जुन्या कातडी पिशव्यांत ओतत नाही. तसे केले तर नव्या द्राक्षारसामुळे पिशव्या फुटतील, द्राक्षारस सांडेल आणि पिशव्याही निकामी होतील. म्हणून नवा द्राक्षारस नव्या कातडी पिशव्यांतच ओतला पाहिजे.” लूक 5:37

हा नवा द्राक्षारस कोणता? आणि जुन्या कातडी पिशव्या कोणत्या? नवा द्राक्षारस म्हणजे आशीर्वाद म्हणून आपल्याला विपुलतेने लाभलेले कृपेचे नवे जीवन. जुन्या कातडी पिशव्या म्हणजे आपला जुना, पापामुळे पतित झालेला स्वभाव आणि जुना नियम. येशू आपल्याला सांगतो की, आपल्या जीवनात त्याची कृपा आणि दया स्वीकारायची असेल, तर त्याने आपले जुने रूप बदलून आपल्याला नवी सृष्टी बनवावे, यासाठी आपण त्याला वाव दिला पाहिजे आणि कृपेचा नवा नियम स्वीकारला पाहिजे.

तुम्ही नवी सृष्टी झाला आहात का? तुमच्यातील नव्या व्यक्तीने पुन्हा उठावे म्हणून तुम्ही तुमच्यातील जुन्या व्यक्तीला मरू दिले आहे का? कृपेचा नवा द्राक्षारस तुमच्या जीवनात ओतला जावा म्हणून ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी होणे म्हणजे नेमके काय?

ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी होणे म्हणजे अगदी नव्या रीतीने जगणे आणि आपल्या जुन्या चालीरीतींना यापुढे चिकटून न राहणे. याचा अर्थ असा की, आपण आपल्या बळावर जे काही करू शकतो त्यापलीकडची सामर्थ्यशाली कार्ये देव आपल्या जीवनात करतो. देवाने स्वतःला आपल्यामध्ये ओतावे, यासाठी आपण नवी आणि योग्य ‘कातडी पिशवी’ झालो आहोत. आणि हा नवा ‘द्राक्षारस’ म्हणजे पवित्र आत्मा आपल्या जीवनाची सूत्रे हाती घेतो आणि आपले जीवन पूर्णपणे आपल्या अधीन करतो.

प्रत्यक्ष जीवनात याचा अर्थ असा की, ख्रिस्तामध्ये आपल्याला नवी सृष्टी बनवले गेले, तर संस्कारांची कृपा आणि रोजच्या प्रार्थनेतून व उपासनेतून आपल्याला जे काही लाभते, ते स्वीकारण्यास आपण तयार असतो. पण त्या नव्या कातडी पिशव्यांसारखे होणे हेच आपले पहिले ध्येय असले पाहिजे. मग हे आपण कसे साधायचे?

बाप्तिस्म्याद्वारे आणि त्यानंतर पापापासून दूर फिरून शुभवर्तमान स्वीकारण्याची जाणीवपूर्वक निवड करून आपण हे साधतो. पण पापापासून दूर फिरण्याची आणि शुभवर्तमान स्वीकारण्याची देवाची ही सर्वांसाठीची आज्ञा आपण जाणीवपूर्वक रोजच्या जीवनात उतरवली पाहिजे. रोजच्या व्यवहारात प्रत्येक बाबतीत ख्रिस्ताकडे वळण्याचा जाणीवपूर्वक निर्णय आपण घेत राहिलो, तर पवित्र आत्मा आपल्या जीवनात कृपेचा नवा द्राक्षारस अचानक, सामर्थ्याने आणि तत्क्षणी ओततो, याचा आपल्याला अनुभव येईल. नवी शांती आणि नवा आनंद आपल्याला भरून टाकतील आणि आपल्या स्वतःच्या क्षमतेपलीकडचे बळ आपल्याला मिळेल.

आज चिंतन करा: तुम्ही खरोखरच ख्रिस्तामध्ये नवी सृष्टी झाला आहात का? तुम्ही तुमचा जुना मार्ग सोडला आहे का आणि तुम्हाला जखडून ठेवणाऱ्या बेड्या तोडल्या आहेत का? तुम्ही नवे शुभवर्तमान त्याच्या पूर्णतेने स्वीकारले आहे का? देवाने तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याचा वर्षाव करावा, यासाठी तुम्ही त्याला दररोज वाव देता का?

हे प्रभू, विनंती आहे की तू मला नवी सृष्टी बनव.  माझे संपूर्ण परिवर्तन कर आणि मला पूर्णपणे नवे कर.  तुझ्या ठायी असलेल्या माझ्या नव्या जीवनात तुझ्या कृपेचा आणि दयेचा विपुल वर्षाव मला सतत लाभो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

कॅथलिक श्रद्धेविषयी जाणून घ्या!

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: पिक्साबेवरील हान्स रोमान यांचे चित्र