३ सप्टेंबर २०२२
सामान्य काळातील बाविसाव्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने
संत ग्रेगरी महान, पोप व धर्माचार्य — स्मृतिदिन

शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतातून जात असताना त्याचे शिष्य कणसे तोडून, ती हातात चोळून त्यांतले दाणे खात होते. काही परुशी म्हणाले, “शब्बाथाच्या दिवशी नियमाने निषिद्ध असलेली गोष्ट तुम्ही का करता?” लूक 6:1-2
किती क्षुल्लक गोष्टीचा बाऊ! शिष्यांना भूक लागली होती. बहुधा ते येशूबरोबर बराच वेळ चालत होते. वाटेत त्यांना गहू दिसला, तेव्हा चालता चालता खाण्यासाठी त्यांनी काही कणसे तोडली. इतकी साधी गोष्ट केल्याबद्दल परुश्यांनी त्यांना दोष दिला. कणसे तोडून त्यांतले दाणे खाल्ल्याने त्यांनी खरोखरच नियम मोडला आणि देवाला दुखावले का?
येशूच्या उत्तरावरून स्पष्ट होते की परुश्यांचा मोठा गैरसमज झाला होता आणि शिष्यांनी काहीही चुकीचे केले नव्हते. तरीही, या उताऱ्यामुळे आपल्याला एका आध्यात्मिक धोक्याचा विचार करण्याची संधी मिळते. काही जण अधूनमधून या धोक्याला बळी पडतात. तो धोका म्हणजे पापाची अवाजवी भीती.
प्रत्यक्षात असे घडले की नाही, हे आपल्याला माहीत नाही. पण एखादा शिष्य किंवा काही शिष्य पापाच्या अवाजवी भीतीने त्रस्त असतील, तर दाणे खाल्ल्याबद्दल परुश्यांनी दोष दिल्याचे ऐकताच त्यांना आपल्या कृतीचा खेद वाटला असेल आणि आपण दोषी आहोत असेही वाटले असेल. शब्बाथ दिवस पवित्र मानण्याची देवाची आज्ञा आपण मोडली, अशी भीती त्यांना वाटू लागली असेल. पण ही भीती अवाजवी आहे हे त्यांनी ओळखायला हवे, आणि ती कशामुळे उफाळून आली हेही समजून घ्यायला हवे.
परुश्यांनी देवाच्या नियमशास्त्राचा जो टोकाचा आणि चुकीचा अर्थ लावला, त्यातूनच त्यांना मोह झाला. होय, देवाचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे आणि त्यातील प्रत्येक अक्षराचे सदैव पालन केले पाहिजे. पण आपल्या हातून पाप तर झाले नाही ना, अशी सतत चिंता ज्यांना सतावते, त्यांच्या दृष्टीने देवाच्या नियमशास्त्राचे स्वरूप सहजच विकृत होऊ शकते आणि त्यातील नियमांचा अतिरेक होऊ शकतो. माणसांनी केलेले नियम आणि देवाच्या नियमशास्त्राचे त्यांनी लावलेले चुकीचे अर्थ यांमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. वर दिलेल्या पवित्र शास्त्रातील उताऱ्यात या मोहाला कारणीभूत ठरला तो परुश्यांचा अहंकार आणि कठोरपणा. शब्बाथ दिवशी शिष्यांनी कणसे तोडून त्यांतील दाणे खाल्ले, याचा देवाला मुळीच अपमान वाटला नाही. अशा रीतीने परुशी शिष्यांवर असे ओझे लादू पाहत होते, जे देवाने त्यांच्यावर घातले नव्हते.
देवाचा नियम आणि देवाची इच्छा यांकडे पापाच्या अवाजवी भीतीतून पाहण्याचा मोह आपल्यालाही होऊ शकतो. पुष्कळ लोक दुसऱ्या टोकाला जातात (ते फारच ढिलाई करतात), पण काही जण मात्र देव मुळीच दुखावला नसतानाही आपण त्याला दुखावले की काय, या चिंतेने त्रस्त असतात.
पापाच्या अवाजवी भीतीशी तुमचा स्वतःचा कसा संघर्ष चालतो, यावर आज चिंतन करा. तुम्हाला अशी भीती वाटत असेल, तर लक्षात ठेवा: देव तुम्हाला या ओझ्यातून मुक्त करू इच्छितो.
हे प्रभू, सत्याच्या प्रकाशात तुझे नियमशास्त्र आणि तुझी इच्छा समजून घेण्यास मला मदत कर. तुझ्या नियमशास्त्राविषयीचे सर्व गैरसमज आणि त्याचे चुकीचे अर्थ सोडून, तुझ्या परिपूर्ण प्रेमाचे आणि दयेचे सत्य स्वीकारण्यास मला मदत कर. प्रत्येक गोष्टीत आणि सर्व गोष्टींपेक्षा अधिक, तुझ्या त्या दयेला आणि प्रेमाला मी घट्ट धरून राहावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत ग्रेगरी महान, पोप व धर्माचार्य




