मराठी

तुमचा धिक्कार असो!

12 ऑक्टोबर 2022
सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

व्हिडिओ

“तुमचा धिक्कार असो! तुम्ही न दिसणाऱ्या थडग्यांसारखे आहात; लोक नकळत त्यांवरून चालत जातात.” त्यावर एका धर्मशास्त्रज्ञाने त्यांना म्हटले, “गुरुजी, असे बोलून तुम्ही आमचाही अपमान करता.” ते म्हणाले, “धर्मशास्त्रज्ञांनो, तुमचाही धिक्कार असो! तुम्ही लोकांवर वाहायला कठीण अशी ओझी लादता; पण स्वतः त्या ओझ्यांना बोटसुद्धा लावत नाही.” लूक 11:44-46

येशू आणि या धर्मशास्त्रज्ञामधला हा संवाद किती रंजक आणि काहीसा आश्चर्यकारक आहे! इथे येशू परुश्यांना कठोर शब्दांत दोष देत आहेत. त्यांचे बोलणे अपमानास्पद आहे, असे सांगून एक धर्मशास्त्रज्ञ त्यांना त्यांची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. मग येशू काय करतात? ते माघार घेत नाहीत, की त्याचा अपमान केल्याबद्दल क्षमाही मागत नाहीत. उलट, ते त्या धर्मशास्त्रज्ञालाच कठोर शब्दांत फटकारतात. त्याला याचे आश्चर्य वाटले असणार!

रंजक गोष्ट अशी की, येशू आपला “अपमान” करत आहेत, असे तो धर्मशास्त्रज्ञ त्यांच्या निदर्शनास आणून देतो. जणू येशू पाप करत आहेत आणि त्यांना जाब विचारायला हवा, अशा थाटात तो हे सांगतो. मग येशू परुश्यांचा आणि त्या धर्मशास्त्रज्ञाचा अपमान करत होते का? हो, बहुधा करत होते. पण येशूंच्या हातून पाप घडले का? अर्थातच नाही. येशू पाप करत नाहीत.

इथे आपल्यासमोर असलेले रहस्य असे आहे की, कधीकधी सत्यही एक प्रकारे “अपमानास्पद” वाटते. कारण सत्य माणसाच्या अहंकाराला ठेच लावते. यातली सर्वांत रंजक गोष्ट अशी की, आपला अपमान झाला असे वाटते तेव्हा आपण आधी हे ओळखले पाहिजे की ती भावना आपल्या अहंकारातून येते, दुसऱ्याच्या बोलण्यातून किंवा कृतीतून नव्हे. समोरची व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त कठोरपणे बोलली तरी अपमान वाटण्याचे कारण आपला अहंकारच असतो. जो खरोखर नम्र असतो, तो आपली चूक सुधारण्याची संधी म्हणून कानउघाडणीचाही स्वीकार करतो. दुर्दैवाने, येशूंची कानउघाडणी मनापासून स्वीकारण्यासाठी आणि तिच्यामुळे आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी लागणारी नम्रता त्या धर्मशास्त्रज्ञाकडे नव्हती, असे दिसते.

दुसऱ्याने आपली चूक दाखवून दिली तर ती मान्य करण्याइतकी नम्रता आपल्यात आहे का, यावर आज चिंतन करा. कोणी तुमचे पाप दाखवून दिले, तर तुम्हाला अपमान झाल्यासारखे वाटते का? की तुम्ही ती चूक सुधारण्याची संधी मानून पवित्रतेत वाढण्यासाठी तिचा उपयोग करता?

हे परम नम्र प्रभू, मला खरी नम्रता दे.  इतरांनी माझी चूक दाखवून दिली तर मी कधीही दुखावून घेऊ नये, यासाठी मला मदत कर.  इतरांनी दाखवून दिलेल्या चुका पवित्रतेच्या वाटेवर मला पुढे नेणारी तुझी कृपा म्हणून मी स्वीकाराव्यात.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

नवीन!


देवाकडे नेणारा अंतर्मनाचा प्रवास:
आविलाच्या संत तेरेसा यांची चिंतने

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

प्रमुख चित्र: शास्त्र्यांनो आणि परुश्यांनो, तुमचा धिक्कार असो — जेम्स टिसो यांचे चित्र, ब्रुकलिन संग्रहालयाच्या सौजन्याने