13 ऑक्टोबर 2022
सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

“नियमशास्त्रज्ञांनो, तुमचा धिक्कार असो! तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही तुम्ही अडवले.” लूक 11:52
आजच्या शुभवर्तमानात येशू परुशी आणि नियमशास्त्रज्ञ यांना पुन्हा फटकारतात. वरच्या उताऱ्यात ते त्यांना फटकारतात, कारण त्यांनी “ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे” आणि देवाला जे ज्ञान लोकांना द्यायचे आहे, त्यापासून त्यांना दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. हा गंभीर आरोप आहे. यातून दिसते की परुशी आणि नियमशास्त्रज्ञ देवाच्या लोकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवत होते.
गेल्या काही दिवसांच्या पवित्र शास्त्रातील वाचनांत आपण पाहिले की, येशूंनी यासाठी नियमशास्त्रज्ञ आणि परुशी यांना कठोर शब्दांत फटकारले. हे त्यांनी केवळ त्यांच्याच भल्यासाठी नव्हे, तर आपल्याही भल्यासाठी केले. अशा खोट्या संदेष्ट्यांच्या आणि सत्यापेक्षा केवळ स्वतःची व स्वतःच्या प्रतिष्ठेची काळजी करणाऱ्या लोकांच्या मागे जाऊ नये, हे आपल्याला त्यातून समजते.
शुभवर्तमानाचा हा उतारा केवळ या पापाचा निषेध करत नाही; त्याहून महत्त्वाचे म्हणजे, तो एक गहन आणि सुंदर विचार आपल्यासमोर ठेवतो. तो विचार आहे “ज्ञानाच्या किल्लीचा.” ज्ञानाची किल्ली म्हणजे काय? ज्ञानाची किल्ली म्हणजे श्रद्धा, आणि देवाची वाणी ऐकल्यानेच श्रद्धा प्राप्त होते. देवाला आपल्याशी बोलू देणे आणि त्याची सर्वांत गहन व सुंदर सत्ये आपल्याला उलगडू देणे, हीच ज्ञानाची किल्ली आहे. प्रार्थनेतून आणि देवाशी थेट संवाद साधण्यातूनच आपण ही सत्ये स्वीकारू शकतो आणि त्यांच्यावर विश्वास ठेवू शकतो.
देवाच्या जीवनातील गहन रहस्यांचा उलगडा ज्यांना झाला, त्यांची उत्तम उदाहरणे म्हणजे संत. प्रार्थना आणि श्रद्धेने भरलेल्या जीवनातून त्यांना देवाची सखोल ओळख झाली. यांपैकी अनेक थोर संतांनी आपल्यासाठी सुंदर लेखन मागे ठेवले आहे आणि देवाच्या अंतरंग जीवनातील, एरवी गुप्त असलेल्या पण त्यांना उलगडलेल्या रहस्यांची प्रभावी साक्ष दिली आहे.
आज या गोष्टीवर चिंतन करा: तुम्ही “ज्ञानाची किल्ली” हाती घेतली आहे का? श्रद्धा आणि प्रार्थनेच्या जीवनातून देवाची रहस्ये तुम्हाला उलगडली आहेत का? रोजच्या वैयक्तिक प्रार्थनेत देवाचा शोध घेण्याचा आणि त्याला तुमच्यासमोर जे काही उलगडायचे आहे ते जाणून घेण्याचा पुन्हा निश्चय करा.
हे प्रभू, दररोज प्रार्थना करत तुझा शोध घेण्यास मला मदत कर. या प्रार्थनामय जीवनातून मला तुझ्या अधिक जवळ घे, आणि तुझे संपूर्ण स्वरूप व जीवनाचा खरा अर्थ मला उलगडून दाखव. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
नवीन!

देवाकडे नेणारा अंतर्मनाचा प्रवास:
आविलाच्या संत तेरेसा यांची चिंतने
मुख्य चित्र: ‘यरुशलेम, यरुशलेम’ — जेम्स टिसो यांचे चित्र, ब्रुकलिन संग्रहालयाच्या सौजन्याने




