१५ ऑक्टोबर २०२५
येशूच्या संत तेरेसा (कुमारिका व ख्रिस्तसभेच्या धर्मपंडिता) यांचा स्मृतिदिन
आजची वाचने
सामान्य काळातील अठ्ठाविसाव्या आठवड्याच्या बुधवारची वाचने
याकोब योर्डान्स, सार्वजनिक मालकी, विकिमीडिया कॉमन्समार्फत
तेव्हा एका नियमशास्त्रज्ञाने त्याला उत्तर दिले, “गुरुजी, असे बोलून तुम्ही आमचाही अपमान करता.” त्यावर तो म्हणाला, “तुम्हा नियमशास्त्रज्ञांचाही धिक्कार असो! वाहायला कठीण अशी ओझी तुम्ही लोकांवर लादता, पण स्वतः मात्र त्या ओझ्यांना हात लावण्यासाठी एक बोटही उचलत नाही.” लूक 11:45–46
येशू परुश्यांना ठणकावून त्यांची चूक दाखवून देत होता, ते हा नियमशास्त्रज्ञ ऐकत होता. ते ऐकताना त्याच्या स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लागली आणि त्याने आपल्या प्रभूला जाब विचारला. येशू काय करतो? तो लगेच त्या नियमशास्त्रज्ञालाही ठणकावून सांगतो की तो नियमशास्त्राचा वापर लोकांवर जड ओझी लादण्यासाठी करतो. प्रेमापोटी दिलेला हा खडसावणारा उपदेश करण्यात येशूने माघार घेतली नाही. उलट, जिथे त्याच्या शब्दांचा परिणाम होत होता, तिथेच त्याने नेम धरला: त्या नियमशास्त्रज्ञाच्या सदसद्विवेकबुद्धीवर.
या नियमशास्त्रज्ञाच्या अनुभवातून आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. पहिली म्हणजे, आपल्या सदसद्विवेकबुद्धीला ‘टोचणी’ लागते तेव्हा तिच्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. दुसरी म्हणजे, अशा वेळी आपण किती सहजपणे स्वतःची बाजू सावरू लागतो, हे या अनुभवातून दिसते.
तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला कशामुळे टोचणी लागते? गेल्या महिन्याकडे वळून पाहा आणि कोणकोणत्या प्रसंगी तुम्ही स्वतःची बाजू सावरू लागलात, याचा विचार करा. कुणाच्या बोलण्याने तुम्ही अस्वस्थ झालात का? तसे असेल तर त्याकडे लक्ष द्या. कधीकधी आपल्या अस्वस्थतेचे कारण आपले पाप नसून काहीतरी वेगळे असते. पण अनेकदा खरे कारण असे असते की ज्या पापाशी आपला झगडा चालू आहे, तेच आपल्यासमोर येते आणि ते मान्य करण्याची आपली तयारी नसते.
या नियमशास्त्रज्ञाने येशूचे म्हणणे ऐकून घेतले असते आणि अपमान वाटून घेण्याऐवजी त्याच्या शब्दांबद्दल कृतज्ञता बाळगली असती, तर काय झाले असते? त्याने नम्रपणे स्वतःच्या जीवनाकडे पाहिले असते आणि ज्या गोष्टींबद्दल येशू परुश्यांना दोष देत होता, त्याच गोष्टींबद्दल आपणही दोषी आहोत हे ओळखले असते, तर काय झाले असते? त्याने तसे केले असते, तर त्याला आपल्या कृतींचे प्रामाणिकपणे परीक्षण करता आले असते आणि स्वतःमध्ये बदल घडवण्यास सुरुवात करता आली असती. पण हे करणे कठीण आहे.
अलीकडे कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला अपमानित वाटले, यावर आज चिंतन करा. एखादी व्यक्ती प्रेमाने तुमची चूक दाखवून देते, अशा एखाद्या मार्गाने देव तुमचे पाप तुमच्या निदर्शनास आणून देतो. तेव्हा मनातला अहंकार दूर करण्यासाठी अनेकदा जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, हे प्रामाणिकपणे कबूल करा. जेव्हा तुम्ही स्वतःची बाजू सावरू लागता, तेव्हा तुमच्या जीवनात काहीतरी बदलण्याची गरज आहे, याची ती खूण आहे हे लगेच ओळखा. सदसद्विवेकबुद्धीला लागलेली टोचणी ही देवाची देणगी आहे. अशी टोचणी लागते तेव्हा दुखावून घेण्याऐवजी आनंद माना. आपला प्रभू जे पाप तुमच्या निदर्शनास आणून देत आहे, त्याच पापापासून मुक्त होऊन जीवनात पवित्रतेत वाढण्याचा एक उत्तम मार्ग तुम्हाला सापडेल.
हे माझ्या प्रभू, तू मला आव्हान देतोस आणि निरनिराळ्या मार्गांनी सतत माझ्याशी बोलतोस. कधी तू माझ्याशी सौम्यपणे बोलतोस, तर कधी प्रेमाने माझी कानउघाडणी करतोस. माझे पाप मला दिसावे म्हणून मला मदत कर. ते दिसल्यावर मी स्वतःचा बचाव करू नये, त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि सबबी देऊन माझ्या चुकीच्या कृतींचे समर्थन करू नये, अशी मी प्रार्थना करतो. तू मला जे काही सांगतोस त्यात आनंद मानायला मी शिकावे, विशेषतः जेव्हा तू प्रेमाने माझी कानउघाडणी करतोस. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजची संत – येशूची संत तेरेसा (आव्हिलाची), कुमारी आणि ख्रिस्तसभेची धर्मपंडिता — स्मृतिदिन
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





