११ नोव्हेंबर २०२२
सामान्य काळातील बत्तिसाव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने
तूरचे संत मार्टिन, बिशप — स्मृतिदिन

“जो कोणी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करील, तो तो गमावील; पण जो कोणी आपला जीव गमावील, तो तो वाचवील.” लूक 17:33
आपल्याला थांबून विचार करायला लावणारी वचने येशू नेहमीच सांगतो. आजच्या शुभवर्तमानातील हे वचन त्यांपैकीच एक आहे. वरवर पाहता त्यात विरोधाभास वाटतो. आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केल्याने तो गमवावा लागेल; पण तो गमावणे हाच तो वाचवण्याचा मार्ग ठरेल. याचा अर्थ काय?
हे विधान विश्वास आणि समर्पण यांच्या मुळाशी असलेल्या गोष्टीकडे आपले लक्ष वेधते. थोडक्यात, केवळ स्वतःच्या प्रयत्नांनी आपले जीवन आणि भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला, तर गोष्टी सुरळीत होणार नाहीत. आपले जीवन ‘गमावण्याचे’ आवाहन करून येशू आपल्याला सांगतो की आपण स्वतःला पूर्णपणे त्याच्या हाती सोपवले पाहिजे. सर्व गोष्टींचे सूत्र त्याच्याकडे असू द्यावे आणि त्याच्या परमपवित्र इच्छेनुसार जगण्यासाठी त्याचे मार्गदर्शन स्वीकारावे. आपले जीवन वाचवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. स्वतःच्या इच्छेचा आग्रह सोडून देवाच्या हाती आपल्या जीवनाची सूत्रे दिल्यानेच आपण आपले जीवन वाचवतो.
असा भरवसा ठेवणे आणि स्वतःला देवाच्या हाती सोपवणे सुरुवातीला फार कठीण जाते. देवावर पूर्ण भरवसा ठेवणे सहज जमत नाही. पण आपल्याला ते जमले, तर देवाचे मार्ग आणि आपल्या जीवनासाठीची त्याची योजना आपण स्वतः कल्पना करू शकू त्यापेक्षा कितीतरी उत्तम आहेत, हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. त्याच्या ज्ञानाला तोड नाही आणि आपल्या सर्व चिंता व अडचणींवर त्याच्याकडे असलेला उपाय परिपूर्ण आहे.
आपल्या जीवनाची सारी सूत्रे आपल्या दयाळू देवाच्या हाती देण्याची आपली किती तयारी आहे आणि ते करण्याची आपल्याला किती इच्छा आहे, यावर आज चिंतन करा. आपल्या जीवनाची सूत्रे पूर्णपणे त्याच्या हाती देण्याइतका तुमचा त्याच्यावर भरवसा आहे का? शक्य तितक्या मनापासून हे विश्वासाचे पाऊल उचला. मग पाहा, तो कसा तुमचे रक्षण करू लागतो आणि केवळ तोच देऊ शकतो अशा रीतीने तुमचे जीवन फुलण्यास कशी मदत करतो.
हे प्रभू, माझे जीवन, माझ्या काळज्या, माझ्या चिंता आणि माझे भविष्य मी तुझ्या हाती सोपवतो. प्रत्येक बाबतीत माझा तुझ्यावर विश्वास आहे. मी सर्व काही तुला अर्पण करतो. दिवसेंदिवस तुझ्यावर अधिक विश्वास ठेवण्यास आणि स्वतःला पूर्णपणे तुझ्या हाती सोपवून तुझ्याकडे वळण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – तूरचे संत मार्टिन, बिशप
वरील चित्र: एमाऊसच्या वाटेवर — योझेफ फॉन फ्यूरिख यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने





