मराठी

सार्वजनिक पश्चात्ताप

४ डिसेंबर २०२२
आगमनकाळातील दुसरा रविवार (वर्ष अ)
आजची वाचने

व्हिडिओ

अनेक परुशी आणि सदूकी आपल्या बाप्तिस्म्यासाठी येत असल्याचे पाहून योहान त्यांना म्हणाला, “अहो सापाच्या पिलांनो! येणाऱ्या कोपापासून पळून जाण्याचा इशारा तुम्हाला कोणी दिला? तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगले फळ द्या.” मत्तय 3:7–8

ही भेट अतिशय तणावपूर्ण होती, तरीही ती अत्यंत पवित्र होती. संत बाप्तिस्ता योहान यांना बरीच लोकप्रियता आणि आदर मिळाला होता व लोक त्यांना महान संदेष्टा मानत होते. अशा योहानांनी परुशी आणि सदूकी यांना कठोर शब्दांत सुनावले, म्हणून हा प्रसंग तणावपूर्ण होता. “अहो सापाच्या पिलांनो!” असे ते म्हणाले. परुशी आणि सदूकी यांच्याशी सहसा कोणी असे बोलत नसे.

योहान असे बोलतात, कारण ते खरे होते. हे धर्मनेते कोणालाही देवाच्या अधिक जवळ नेत नव्हते. हे धर्मनेते कशा प्रकारचे लोक बनले होते, हे समजण्यासाठी येशू पुढे परुशी आणि सदूकी यांना जे काही सांगणार होता, त्यावर मनन केले तरी पुरेसे आहे.

म्हणून हा प्रसंग खरोखरच तणावपूर्ण आहे. पण तो अत्यंत पवित्रही आहे. तो पवित्र आहे, कारण या ‘सापाच्या पिलांना’ तंबी देण्याची गरज होती. त्यांच्या वर्तनाचा निषेध करून त्यांना बदलण्याचे आव्हान देणे आवश्यक होते. त्यांचा गर्व उतरवण्याची गरज होती. आणि सर्वांसमोर आपल्या पापांचा प्रामाणिकपणे पश्चात्ताप करण्याइतकी नम्रता दुसऱ्या कशातही दिसत नाही.

लक्षात घ्या, योहान या नेत्यांना सरसकट नाकारत नाहीत. उलट, ते त्यांच्याकडून पश्चात्तापाचा ‘पुरावा’ मागतात. का? कारण गर्व, आपणच नीतिमान असल्याचा अहंकार, दांभिकपणा, लोकांकडून मानमरातब मिळवण्याची हाव, इतरांना दोषी ठरवण्याची वृत्ती अशा गोष्टींमुळे या नेत्यांनी इस्राएलच्या लोकांची आध्यात्मिक हानी केली होती. त्यांनी श्रद्धेचे स्वरूप इतके विकृत केले होते की त्यांच्या आत्म्यांच्या भल्यासाठी त्यांनी सर्वांसमोर पश्चात्ताप करणे आवश्यक होते. ते खरोखर बदलले आहेत याची खूण म्हणून त्यांच्या जीवनात दिसणारी चांगली फळे हा बदल मनापासून झाल्याचे सर्वांना दाखवून देणे गरजेचे होते. परुशी आणि सदूकी यांच्यासाठी हे फार कठीण असले, तरी त्यांच्यासाठी पवित्रतेचा मार्ग हाच आहे.

हेच आपल्यालाही लागू होते. परुशी आणि सदूकी ज्या सापळ्यांत अडकले, त्यांपैकी काहींत तुम्हीही अडकला असाल, तर नम्रपणे केलेला आणि इतरांनाही स्पष्ट दिसणारा बदल तुमच्यासाठी फार हितकारक ठरेल. आपणच नीतिमान आहोत असा अहंकार, बोलताना सतत दोष काढण्याची सवय, ‘मी तुमच्यापेक्षा अधिक पवित्र आहे’ असा भाव किंवा इतरांना दोषी ठरवण्याची वृत्ती यांच्याशी तुम्ही झगडत असाल, तर तुम्हाला नम्रपणे आणि सर्वांसमोर पश्चात्ताप करण्याची फार गरज असू शकते.

आज परुशी आणि सदूकी यांच्याविषयी मनन करा. त्यांचे पाप काय होते आणि योहानांनी त्यांना ‘सापाची पिले’ का म्हटले, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यातला गर्व आणि आपणच नीतिमान असल्याचा अहंकार तुमच्याही अंतःकरणात दिसला, तर बाप्तिस्ता योहानांनी हा बोध थेट तुम्हालाच केला आहे असे समजून तो ऐका. “तुमच्या पश्चात्तापाचा पुरावा म्हणून चांगले फळ द्या.” असे करा, आणि देव खऱ्या नम्रतेची देणगी देऊन तुम्हाला मुक्त करील.

हे माझ्या नम्र प्रभू, तू अत्यंत नम्रतेने आणि प्रामाणिकपणे सर्वांना पश्चात्ताप करण्यास बोलावतोस. माझे पाप मला दिसावे आणि त्याला सामोरे जाण्यास मी कधीही कचरू नये, म्हणून मला मदत कर. म्हणजे तू मला त्या मलिनतेतून मुक्त करून पवित्रतेच्या मार्गावर अधिक दृढपणे उभे करू शकशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

मरियेच्या निष्कलंक गर्भधारणेची नोवेना
29 नोव्हेंबर–7 डिसेंबर

आगमनकाळासाठीचे आमचे सर्व साहित्य पाहा

रविवारची आणखी व्हिडिओ चिंतने

संत आंद्रेय यांची नाताळची नोव्हेना
परंपरेनुसार, संत आंद्रेय यांच्या नाताळच्या नोव्हेनेची खाली दिलेली प्रार्थना ३० नोव्हेंबरला, संत आंद्रेय यांच्या सणाच्या दिवशी, सुरू करून नाताळच्या पूर्वसंध्येपर्यंत दररोज १५ वेळा म्हटली जाते.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आगमनकाळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – दमास्कसचे संत योहान, धर्मगुरू, व्रतस्थ आणि चर्चचे धर्मविद्यापंडित
यंदा हा दिवस रविवारी येत असल्यामुळे त्यांचा उपासनाविधीतील स्मृतिदिन साजरा होत नाही

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील प्रमुख चित्र: वाळवंटातील संत बाप्तिस्ता योहान — चित्रकार टिशियन, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने