रविवार, 11 जानेवारी 2026
दिजोंचे ललित कला संग्रहालय, CC BY-SA 4.0, विकिमीडिया कॉमन्समार्फत
येशू गालीलहून यार्देन नदीकाठी योहानाकडे त्याच्याकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहान त्याला अडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, “खरे तर मला तुझ्याकडून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, आणि तू माझ्याकडे येतोस?” येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे, कारण अशा रीतीने जे काही नीतिसंगत आहे ते सर्व पूर्ण करणे आपल्याला योग्य आहे.” तेव्हा योहानाने त्याला बाप्तिस्मा घेऊ दिला. मत्तय 3:13–15
बाप्तिस्मा देणारा योहान हा जुन्या करारातील शेवटचा संदेष्टा होता. मशीहाच्या आगमनासाठी त्याचा मार्ग तयार करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. आजचा सण जुन्या धर्मनियमाकडून नव्या धर्मनियमाकडे जाणारा निर्णायक टप्पा दाखवतो. येशूच्या बाप्तिस्म्यापूर्वी योहानाचे कार्य जोमाने सुरू होते. येशूच्या बाप्तिस्म्याने जुन्या करारातील संदेष्ट्यांचे कार्य पूर्णत्वास येते आणि कृपेच्या नव्या धर्मनियमाची सुरुवात होते.
येशू बाप्तिस्म्याच्या पाण्यात का उतरला? तो निष्पाप होता आणि त्याला पश्चात्तापाची गरज नव्हती. तरीही, आपल्या दैवी ज्ञानाने येशूने बाप्तिस्मा घेण्याचे निवडले. त्याने ते पाणी पवित्र केले आणि आपल्या मागे येणाऱ्या सर्वांसाठी कृपेचे दार उघडले. बाप्तिस्म्याच्या पाण्यात उतरून येशूने आपल्याला मार्ग दाखवला. बाप्तिस्म्याच्या पाण्यात उतरणाऱ्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला तिथे आपल्या प्रभूची भेट होते आणि त्याच्या कृपामय जीवनात सहभागी होता येते.
आज ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचे चिंतन करताना आपल्याला स्वतःच्या बाप्तिस्म्याचाही विचार करण्याचे आमंत्रण आहे. आपल्यापैकी बहुतेकांचा बाप्तिस्मा तान्हेपणी झाला, त्यामुळे तो प्रसंग आपल्याला आठवत नाही. काहींनी मात्र पुढे आयुष्यात, आपल्याला मिळणाऱ्या कृपेची पूर्ण जाणीव असताना, बाप्तिस्मा घेतला. बाप्तिस्मा कधीही झाला असला, तरी त्याचे परिणाम खोलवर रुजतात आणि टिकून राहतात. पवित्र होण्याच्या त्या एका क्षणाने आपल्याला कायमचे बदलले, आणि त्याचे परिवर्तन घडवणारे सामर्थ्य आजही आपल्यामध्ये कार्यरत आहे.
बाप्तिस्म्यात येशू आपल्याला पाण्याखाली भेटतो. बाप्तिस्मा घेताना संपूर्ण शरीर पाण्यात बुडवले जाते, तेव्हा या भेटीचे वास्तव प्रभावीपणे व्यक्त होते. योहान देत असे त्या पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याप्रमाणे आपण पाण्यात उतरतो; पण पाण्यातून बाहेर येताना आपण ख्रिस्ताशी एकरूप झालेले असतो. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पित्याची वाणी झाली, “तू माझा प्रिय पुत्र आहेस…” त्याचप्रमाणे, आपल्या बाप्तिस्म्यानंतरही पिता आपल्याशी सतत बोलत राहतो आणि आपण त्याची प्रिय मुले आहोत, याची खात्री देतो. पवित्र आत्मा आपल्यावर उतरतो आणि आपली अंतःकरणे खुली राहिली, तर आत्म्याची सर्व दाने आपल्याला देऊ केली जातात.
बाप्तिस्मा आपल्या आयुष्यात एकदाच होतो आणि आपल्या आत्म्यावर “अमिट आध्यात्मिक ठसा (मुद्रा)” उमटवतो (पाहा कॅथलिक धर्मसभेची धर्मशिक्षणसंहिता #1272 आणि 1274). हा ठसा आपल्याला ख्रिस्ताच्या स्वरूपाशी अनुरूप करतो आणि आपण कायमचे त्याचे व त्याच्या धर्मसभेचे आहोत, हे दर्शवतो. मरणकारक पापानेही हा ठसा नाहीसा होत नाही किंवा पुसला जात नाही. मात्र ही मुद्रा कायम राहिली, तरी मरणकारक पापामुळे आपल्या आत्म्यातील पवित्र करणारी कृपा आपण गमावू शकतो. अशा वेळी समेटाच्या संस्काराद्वारे बाप्तिस्म्याची कृपा आपल्याला पुन्हा मिळते. या संस्कारात आपले आत्मे पुन्हा शुद्ध होतात आणि देवाशी आपले पूर्ण ऐक्य पुन्हा प्रस्थापित होते. ख्रिस्ताच्या देहाचे अवयव म्हणून आपल्यावर हा ठसा उमटला आहे. त्यामुळे जोवर आपण कृपेच्या अवस्थेत राहतो, तोवर इतर संस्कारांद्वारे पवित्र करणारी कृपा स्वीकारण्यास आपण सदैव सिद्ध असतो. बाप्तिस्माच आपल्याला असे सिद्ध करतो, जेणेकरून ख्रिस्तापासून वाहणाऱ्या कृपामय जीवनात आपल्याला पूर्णपणे सहभागी होता येईल.
प्रभूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करताना आज स्वतःच्या बाप्तिस्म्याचे चिंतन करा. तुम्ही देवाचे लेकरू आहात, असा ठसा तुमच्यावर कायमचा उमटला आहे. बाप्तिस्म्याच्या पाण्याखाली तुम्हाला आपल्या प्रभूची भेट झाली, तुमच्या सर्व पापांपासून तुम्ही शुद्ध झालात आणि पवित्र करणाऱ्या कृपेने भरून गेलात. पापामुळे ही कृपा कमी होते आणि मरणकारक पापामुळे ती पूर्णपणे नाहीशी होते. पण समेटाच्या संस्काराने ती पुन्हा मिळते, तर पवित्र युकरिस्त आणि इतर संस्कारांनी ती वाढते. आपल्या बाप्तिस्म्याच्या कृपेकडे सदैव परत वळा. या पवित्र ठशाला साजेसे असे देवाचा पुत्र किंवा कन्या म्हणून जगण्याचा प्रयत्न करा.
हे माझ्या पवित्र करणाऱ्या प्रभू, बाप्तिस्म्याच्या पाण्यात मला तुझी भेट झाली आणि तू मला विपुल कृपा दिलीस. माझा आत्मा पापापासून मुक्त ठेवण्यास आणि देवाच्या लेकराला शोभेल अशा खऱ्या प्रतिष्ठेने जगण्यास मला मदत कर. त्या पाण्याखाली मला भेटलास, याबद्दल मी तुझे आभार मानतो. सर्व संस्कारांच्या निरंतर देणगीमुळे मी तुझ्याबरोबर राहावे आणि तुझ्या अधिकाधिक जवळ यावे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
अधिक वाचन – प्रभूचा बाप्तिस्मा




