मराठी

प्रेमाची आज्ञा

शनिवार, 7 जानेवारी 2023
नाताळकाळातील वारदिवस:
7 जानेवारी
आजची वाचने

पेन्याफोर्टचे संत रेमंड, धर्मगुरू—ऐच्छिक स्मरण

व्हिडिओ

त्याच्या आईने सेवकांना सांगितले, “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” योहान 2:5

काना येथील लग्नाच्या मेजवानीच्या कथेतले हे छोटेसे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. आपल्या पवित्र मातेने लग्नातील सेवकांना दिलेली ही प्रेमाची आज्ञा आहे. येशूचा पहिला चमत्कार घडावा आणि त्याच्या देवत्वाचे पहिले चिन्ह प्रकट व्हावे म्हणून तिने हे शब्द त्या सेवकांना सांगितले. पण आपली पवित्र माता हेच शब्द आपल्यापैकी प्रत्येकालाही सांगते, याची आपण खात्री बाळगू शकतो.

“तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” किती सुंदर आहे ही प्रेमाची आज्ञा! हे शब्द आपल्याला उद्देशून उच्चारलेले ऐकताना, आपली पवित्र माता आपल्याला यातून परिपूर्ण मार्गदर्शन देते आणि ते आजही देत आहे, हे आपण ओळखले पाहिजे. आयुष्यात कितीतरी वेळा आपण आपल्याला हवे तेच करतो. आपल्या आवेगांमुळे आणि अनुचित इच्छांमुळे आपण इकडे-तिकडे ओढले जातो. स्वार्थीपणावर मात करणे आपल्याला कठीण जाते आणि आपण अनेकदा आपल्या आयुष्यात चुकीचे निर्णय घेतो. हेच पापाचे साधे वास्तव आहे; त्याच्याशी आपण रोज झुंजतो. पण आपल्या पवित्र मातेचे हे शब्द तिच्या हृदयातून थेट आपल्या हृदयापर्यंत पोहोचत आहेत, अशा भावनेने आपण ते ऐकले आणि त्यांचे पालन केले, तर आपल्या आयुष्याला नवी दिशा मिळेल.

देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी सर्वप्रथम देवाचा आवाज ऐकणे आवश्यक आहे. आपला प्रभू आपल्याशी बोलतो तेव्हा आपण त्याचे ऐकले पाहिजे. तुम्ही त्याचे किती लक्षपूर्वक ऐकता? आपल्या मनात अनेकदा विचारांची गर्दी होते आणि अनेक गोष्टींचा आपल्यावर सहज प्रभाव पडतो. आपल्या अनियंत्रित वासनांमुळे, भावनांमुळे आणि आवेगांमुळे कधी कधी आपला गोंधळ उडतोच; पण जगातही कितीतरी वेगवेगळे आवाज आहेत, जे आपल्याला गोंधळात टाकतात. रोज भेटणाऱ्या लोकांचा आपल्यावर बरा किंवा वाईट प्रभाव पडतो. प्रसारमाध्यमांचा, आपण जे वाचतो किंवा पाहतो त्याचा, आणि दिवसेंदिवस आपल्याला मोहात पाडणाऱ्या सैतानाचाही आपल्यावर प्रभाव पडतो.

आपल्या जीवनात आपली दिशाभूल करणाऱ्या अनेक आवाजांकडे दुर्लक्ष करून देवाचा साधा, स्पष्ट आणि गहन आवाज ऐकण्याचा आपण रोज प्रयत्न केला, तर ते योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरेल. पण त्यानंतर देव आपल्याला जे सांगतो ते आपण प्रत्यक्षात “केले” पाहिजे. देव काय सांगतो हे ऐकणे कठीण असू शकते, पण त्याच्याकडून जे ऐकतो त्याप्रमाणे वागणे त्याहूनही कठीण असू शकते. असे म्हणतात की नरकाकडे जाणारी वाट चांगल्या हेतूंनी बांधलेली असते. केवळ चांगले हेतू पुरेसे नाहीत. आपल्या सर्व शक्तीनिशी देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे, हाच उपाय आहे.

आज या दोन प्रश्नांवर चिंतन करा. पहिला: दररोज देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो हे मला ऐकू येते का, की इतर अनेक आवाजांच्या प्रभावाखाली येऊन माझी दिशाभूल होते? दुसरा: देव माझ्याकडून काय अपेक्षा करतो हे मला समजल्यावर मी ते किती प्रामाणिकपणे कृतीत आणतो? “तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” या वाक्यावर मनन करा आणि आपल्या पवित्र मातेने दिलेली प्रेमाची खरी आज्ञा म्हणून ते ऐका.

हे परमप्रिय माते, कृपया हे शब्द मला दररोज सांग. तुझा पुत्र मला जे काही सांगतो ते मी ऐकावे आणि संपूर्ण अंतःकरणाने त्याची आज्ञा पाळावी, म्हणून तू हे शब्द मला सांगताना माझ्यासाठी प्रार्थना कर. तू देवाला दिलेल्या परिपूर्ण “होकाराबद्दल” आणि सर्व बाबतींत त्याची आज्ञा पाळल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या उदाहरणाचे अधिक पूर्णपणे अनुसरण करायला मी दररोज शिकावे. हे मरियामाते, आमच्यासाठी प्रार्थना कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

नाताळसाठीचे आमचे साहित्य पाहा!

सर्व संत / सण

आजचे संत – पेन्याफोर्टचे संत रेमंड, याजक — ऐच्छिक स्मरण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: काना येथील लग्न, फ्लिकरवरून