19 मे 2023
पुनरुत्थानकाळातील सहाव्या रविवारनंतरचा शुक्रवार
आजची वाचने

“प्रसूतीच्या वेळी स्त्रीला क्लेश होतात, कारण तिची वेळ आलेली असते; पण बाळाला जन्म दिल्यावर, जगात एक मूल जन्माला आले या आनंदामुळे तिला त्या वेदनांची आठवण राहत नाही.” योहान 16:21
एखाद्या चांगल्या कारणासाठी आपण जे कोणतेही क्लेश सोसतो, त्यांनाही हे सत्य नक्कीच लागू होते. लक्षात घ्या की प्रसूतीच्या वेदना एका चांगल्या आणि पवित्र कारणासाठी सोसाव्या लागतात. म्हणून आई आपल्या नवजात बाळाला पाहते आणि कुशीत घेते, तेव्हा एका अर्थाने ती त्या वेदना विसरते. मूल जन्माला आल्यामुळे त्या दुःखाचे रूपांतर आनंदात होते, या अर्थाने ते दुःख विसरले जाते.
जीवनात अनेक गोष्टींमुळे क्लेश होऊ शकतात. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना पुढे म्हणतो: “त्याचप्रमाणे आताच्या घडीला तुम्हालाही क्लेश होत आहेत.” तो असे म्हणतो, कारण आपण लवकरच पित्याकडे जाणार आहोत आणि त्या सर्वांना छळ सोसावा लागेल, असे त्याने नुकतेच त्यांना सांगितले होते. पण मग तो त्यांना सांगतो की तो निघून गेल्यावर तो त्यांना दिसणार नाही; मात्र ते त्याला पुन्हा पाहतील आणि आनंदित होतील. तो म्हणतो, “त्या दिवशी तुम्ही मला काहीही विचारणार नाही.” हे वाक्य नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे.
क्लेश किंवा कोणत्याही प्रकारचे दुःख यांमुळे आपल्याला आपल्या जीवनाविषयी प्रश्न पडू शकतात; इतकेच नव्हे, तर देवालाही जाब विचारण्याचा मोह होऊ शकतो. येशूला ठार मारण्यात आल्यानंतर शिष्यांच्या मनात सगळ्याच गोष्टींविषयी प्रश्न उभे राहिले, हे स्पष्ट आहे. ते गोंधळले होते आणि घाबरले होते. सर्व काही संपले आहे, असे त्यांना वाटत होते. नंतर, येशू स्वर्गात आरोहित झाल्यावर आणि त्याने पवित्र आत्म्याला पाठवण्यापूर्वीच्या काळातही शिष्य काही प्रमाणात गोंधळले असतील. येशू त्यांना सोडून का गेला? तो आणखी काही काळ का थांबला नाही? आता त्यांचे नेतृत्व कोण करणार होते? असे कितीतरी प्रश्न त्यांच्या मनात उठले असतील.
आपलेही असेच होते. गोष्टी ठरवल्याप्रमाणे घडत नाहीत किंवा आपल्या जीवनाला एखादे दुःखद वळण लागते, तेव्हा देवाच्या परिपूर्ण योजनेविषयी आपल्या मनात लगेच प्रश्न उभे राहू शकतात, इतकेच नव्हे तर शंकाही येऊ शकते. आपल्या पापामुळे घडी विस्कटली असेल, तर पश्चात्ताप हाच उपाय आहे. पण घडी विस्कटली म्हणजे केवळ जीवन कठीण झाले असेल, तर आजचे येशूचे शब्द आपण विशेष लक्ष देऊन ऐकायला हवेत.
देवाची इच्छा पूर्ण करताना जीवनात क्लेश सोसावे लागले, तर त्यांच्याकडे कितीतरी मोठ्या भल्याकडे नेणारे साधन म्हणून आपण पाहिले पाहिजे. जशा प्रसूतीवेदनांनंतर बाळाची देणगी लाभते, तशाच आपल्या जीवनात देवाची इच्छा प्रत्यक्षात आणताना सोसलेल्या वेदनांनंतर खुद्द देवाच्या सान्निध्याची देणगी लाभेल. अशा वेळी धीराने सहन करण्याचा सद्गुण विशेष महत्त्वाचा असतो. व्यसनावर मात करताना होणारे क्लेश, प्रार्थना करावीशी वाटत नसतानाही प्रार्थना करण्याचे कष्ट किंवा आपल्याला दुखावलेल्या व्यक्तीला क्षमा करताना होणारी वेदना, ही क्लेशांचे रूपांतर आशीर्वादात कसे होते याची उदाहरणे आहेत. अनेकदा स्वतःच्या स्वार्थी इच्छेविरुद्ध झगडणे कठीण असते. पण या आंतरिक संघर्षाचे फळ आनंद आहे. पापावर विजय मिळवण्यात आनंद आहे. प्रार्थनेत टिकून राहण्यात आनंद आहे. देवाच्या राज्यासाठी आपण सोसलेल्या प्रत्येक अडचणीत आनंद आहे. पण हा आनंद नेहमीच सुरुवातीला जाणवत नाही. त्या परिस्थितीत धीर धरून टिकून राहिल्यावरच तो अनुभवता येतो.
देवाच्या गौरवासाठी सध्या तुम्ही कोणते क्लेश सोसत आहात, किंवा एखादी गोष्ट करणे कठीण वाटते म्हणून ती टाळत आहात का, यावर आज चिंतन करा. या अडचणींपासून मागे हटू नका. त्यांच्याकडे गौरवशाली फलप्राप्तीकडे नेणारे साधन म्हणून पाहा. देव तुम्हाला शुद्धीकरणासाठी आणि त्याने सोपवलेल्या कार्यासाठी बोलावत आहे. त्यातील ‘प्रसूतीवेदना’ धीराने सोसा आणि सुरुवातीच्या अडचणींपलीकडे पाहा, म्हणजे शेवटी कोणते फळ तुमची वाट पाहत आहे हे तुम्हाला दिसेल.
हे माझ्या गौरवशाली प्रभू, तू तुझे दुःखभोग परिपूर्ण सद्गुणाने सहन केलेस. पित्याची इच्छा पूर्ण करण्याच्या तुझ्या निश्चयापासून तू कधीही ढळला नाहीस, आणि तुझ्या या चिकाटीचे फळ पुनरुत्थानाचा गौरव होते. माझ्या जीवनातील क्रूस धीराने वाहण्यास मला मदत कर. त्यांतून तू शाश्वत आनंदाचे चांगले फळ आणशील, अशी आशा मला दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पवित्र आत्म्याची नोव्हेना
पेंटेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
पहिला दिवस – शुक्रवार, 19 मे
वरील चित्र: बाल येशूला कुशीत घेतलेली कुमारी मरिया, रंगीत काचेत साकारलेले चित्र. स्रोत: फ्लिकर




