मराठी

कल्पनेपलीकडचे वैभव!

31 मार्च 2024

पुनरुत्थान रविवार (वर्ष ब)

आजची वाचने

व्हिडिओ

“भिऊ नका! वधस्तंभावर खिळलेल्या येशूला तुम्ही शोधत आहात, हे मला माहीत आहे. तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठविला गेला आहे. या, त्याला जेथे ठेवले होते ती जागा पाहा. मग लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, ‘तो मृतांतून उठविला गेला आहे आणि तो तुमच्यापुढे गालीलात जात आहे; तेथे तुम्ही त्याला पाहाल.’ पाहा, मी तुम्हाला सांगितले आहे.” मत्तय 28:5–7

प्रभू खरोखरच उठला आहे! आलेलुया! पाप आणि मृत्यू यांचा नाश झाला आहे, आणि श्रद्धेने तारणाऱ्याला धरून राहणाऱ्या सर्वांना नवजीवन देऊ केले आहे. किती वैभवशाली दिवस आपण आज साजरा करत आहोत!

वर उद्धृत केलेला मत्तयच्या शुभवर्तमानातील उतारा पास्का जागरणाच्या मिस्साबलीत वाचला जातो. या शुभवर्तमानाच्या वाचनापूर्वी जुन्या करारातील सात वाचने असतात. प्रत्येक वाचनानंतर एक स्तोत्र असते. त्यानंतर नव्या करारातील एक वाचन, आणखी एक स्तोत्र आणि मग शुभवर्तमान असते. पास्का जागरणात एकूण सतरा वाचने असतात! म्हणूनच पास्का जागरणाला “सर्व जागरणांची जननी” असे म्हटले जाते. अनेकांना पास्का जागरणात सहभागी होण्याची संधी मिळालेली नसली, तरी हा विधी समजून घेणे उपयुक्त आहे. कारण त्याची रचना आणि कालावधी यांतून ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापुढे आपल्या मनात किती आदरयुक्त विस्मय आणि आश्चर्य असायला हवे, हे दिसून येते. 

सूर्यास्तानंतर, देवळातील सर्व दिवे विझवलेले असताना, अंधारात पास्का जागरणाच्या मिस्साबलीला सुरुवात होते. बाहेर एक नवा “धगधगता अग्नी” प्रज्वलित केला जातो आणि त्याला आशीर्वाद दिला जातो. तो सर्व अंधार दूर करणाऱ्या ख्रिस्ताच्या प्रकाशाचे प्रतीक आहे. त्या अग्नीपासून पास्का मेणबत्ती आणि देवळातील श्रद्धावंतांच्या हातांतील इतर मेणबत्त्या पेटवल्या जातात आणि त्या नव्या प्रकाशाने देऊळ उजळून निघते. मेणबत्त्या घेऊन मिरवणूक देवळात प्रवेश करते. त्यानंतर एक प्राचीन स्तोत्र गायले जाते. त्या स्तोत्राचे नाव आहे एक्सुल्टेट. या स्तोत्राद्वारे चर्च ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची घोषणा करते. त्यात गहन धर्मशास्त्रीय सत्ये तरुणाईच्या उत्साहाने आणि विस्मयाने व्यक्त केली आहेत. पवित्र साक्रामेंताची मंजूषा रिकामी ठेवली जाते. यातून श्रद्धावंतांना पवित्र युखारिस्ताच्या आगामी सोहळ्याची पुन्हा एकदा आतुरतेने वाट पाहण्याचे आमंत्रण मिळते. त्यानंतर वचनविधीचा विस्तृत भाग येतो. त्यात देवाच्या तारणयोजनेचा इतिहास सांगितला जातो. शेवटी, मिस्साबलीत ख्रिस्ती जीवनात प्रवेश देणारे संस्कार साजरे केले जातात आणि परमपवित्र युखारिस्ताच्या सोहळ्यात हा मिस्साबली परमोच्च बिंदू गाठतो.

हा सोहळा इतक्या गांभीर्याने आणि थाटाने का साजरा केला जातो? कारण पास्का सण त्यास पात्र आहे! देवपुत्राने पाप आणि मृत्यू यांच्यावर मिळवलेल्या विजयाहून अधिक वैभवशाली असे काहीही कधी घडले नाही आणि कधी घडणारही नाही. पास्का सणाने आपली मने आदरयुक्त विस्मयाने आणि आश्चर्याने भरून गेली पाहिजेत. त्याच्या मृत्यूमुळे आणि पुनरुत्थानामुळे आपले जीवन कायमचे बदलले आहे. म्हणून “सर्व जागरणांची जननी” असलेल्या या विधीत तुम्हाला सहभागी होता आले नाही, तरी या जागरणातून मिळणारे धडे शिकण्याचा प्रयत्न करा.

पास्का जागरणातून आपल्याला अनेक धडे मिळतात. त्यांपैकी एक असा की, देवाची वैभवशाली तारणयोजना काळाच्या ओघात उलगडत जाते आणि अखेरीस कल्पनेपलीकडच्या वैभवात तिची परिपूर्ती होते. हे विशेषतः वचनविधीतील अनेक वाचनांतून दिसून येते. त्या मिस्साबलीतील पहिले वाचन उत्पत्तीच्या ग्रंथातून घेतले आहे. त्यात सृष्टीच्या निर्मितीच्या सहा दिवसांचे वर्णन आहे. त्यानंतर श्रद्धेतील आपला पिता अब्राहाम याची कथा आपण वाचतो. आपला पुत्र इसहाक याचे बलिदान अर्पण करण्यास अब्राहामाला सांगण्यात आले, तेव्हा देवावरच्या त्याच्या भरवशाची परीक्षा झाली. स्वर्गातील पिता आपल्या सर्वांसाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राचे अर्पण करणार होता, याचे हे पूर्वचित्र होते. मग, मोशेने लोकांना इजिप्तमधील गुलामगिरीतून बाहेर काढून तांबड्या समुद्रातून कसे नेले, याची कथा आपण वाचतो. तांबड्या समुद्राचे पाणी हे बाप्तिस्म्याचे प्रतीक आहे. बाप्तिस्मा पापाचा नाश करतो आणि आपल्याला स्वातंत्र्याकडे नेतो. त्यानंतर यशया, बारुख आणि यहेज्केल या संदेष्ट्यांच्या ग्रंथांतून वाचने घेतली जातात. येणाऱ्या तारणाच्या देणगीविषयी देवाने दिलेले अभिवचन कसे उलगडत जाते, हे त्यांतून दिसते.

जीवनात कधीकधी आपला धीर सुटतो. आपल्याला जे हवे असते ते आपल्याला हवे तेव्हाच मिळावे, असे आपल्याला वाटते. पण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते की देवाची योजना केवळ परिपूर्णच नाही, तर देवाने ठरवलेल्या वेळीच ती पूर्ण होते. यात त्याचे परिपूर्ण ज्ञान दिसून येते. ते ज्ञान आपल्याला नेहमीच समजेल असे नाही. अखेरीस, आपण आपल्या जीवनात देवाच्या परिपूर्ण योजनेचा स्वीकार केला, तर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात आपण सहभागी होऊ. याहून अधिक चांगले काहीच असू शकत नाही. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी होण्याच्या वैभवशाली प्रतिफळाची किंचितही बरोबरी करू शकेल असे काहीही हे जग आपल्याला देऊ शकत नाही.

आज आपण प्रभूच्या पुनरुत्थानाचा महान पास्का महोत्सव साजरा करत असताना, तुमच्या जीवनासाठी देवाची योजना परिपूर्ण आहे, या सत्यावर मनन करा. देव ही योजना तुमच्यासमोर टप्प्याटप्प्याने उलगडू इच्छितो. या योजनेची परिणती पुनरुत्थानाच्या वैभवात होते! स्वर्गात देवासोबतचे ते परिपूर्ण जीवन आहे, जिथे प्रत्येक अश्रू पुसला जाईल. ही योजना सर्व पाप, दुःख आणि यातना दूर करते आणि तुम्हाला परिपूर्ण आनंदाकडे नेते. ही योजना स्वीकारण्याचा मार्ग म्हणजे देव दाखवतो त्या दिशेने एकेक पाऊल टाकणे. देव तुम्हाला हळूहळू बदलू इच्छितो, मुक्त करू इच्छितो, क्षमा करू इच्छितो, बळ देऊ इच्छितो आणि वैभवाच्या मार्गावर नेऊ इच्छितो. तुम्हाला ज्या विस्मयकारक वैभवात सहभागी होता येईल, त्यावर विश्वास ठेवा. पुनरुत्थानाच्या वचनावर विश्वास ठेवा. त्या पुनरुत्थानात सहभागी होणे हेच तुमच्या जीवनाचे एकमेव ध्येय ठेवा आणि त्या मार्गावर देवाला तुम्हाला एकेक पाऊल पुढे नेऊ द्या.

हे माझ्या पुनरुत्थित प्रभू, आज आम्ही साजरे करत असलेले तुझ्या पुनरुत्थानाचे वैभव माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. आपले जीवन तुला समर्पित करणाऱ्या सर्वांना मिळणारे नवे जीवन वैभवशाली आणि विस्मयकारक आहे. या वैभवशाली वचनावर माझे मन आणि हृदय स्थिर ठेवायला आणि त्या दिशेने तुला मला नेहमी एकेक पाऊल पुढे नेऊ द्यायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पास्का महोत्सवाचे चिंतन

तिसरा दिवस: दैवी दयेच्या रविवारच्या तयारीची नोव्हेना

ईस्टरसाठी आणखी साहित्य

ईस्टरसाठी प्रार्थनामय चिंतन

जपमाळ – गौरवाची रहस्ये (पवित्र शास्त्रातील उताऱ्यांसह)

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन

संत फॉस्टिनाची दैवी दयेची विनवणीमाला

दैवी दयेवर भरवसा

दयेच्या वर्षासाठी प्रार्थना

दैवी दयेची जपमाळ

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

आजचे संत आणि सण

वर दिलेले चित्र: ख्रिस्ताच्या कबरीपाशी तीन स्त्रिया — चित्रकर्ती इर्मा मार्टिन, स्रोत: विकिपीडिया