मराठी

अंतरंगातून लाभणारे आध्यात्मिक ज्ञान

१४ एप्रिल २०२४
पुनरुत्थानकाळातील तिसरा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

व्हिडिओ

“तुम्ही अस्वस्थ का झाला आहात? आणि तुमच्या मनात प्रश्न का उठतात? माझे हात आणि पाय पाहा; मी स्वतःच आहे. मला स्पर्श करून पाहा, कारण मला जसे मांस आणि हाडे आहेत हे तुम्ही पाहता, तसे भुताला मांस आणि हाडे नसतात.” लूक 24:38–39

कल्पना करा, येशू तुमच्यासमोर प्रकट झाला तर? तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून त्याने आपल्या हातापायांवरच्या जखमा तुम्हाला दाखवल्या आणि ‘मला स्पर्श करून पाहा’ असे म्हटले, तर? तुम्ही विश्वास ठेवाल का? बहुधा काही प्रमाणात तरी ठेवाल. जसा त्या शिष्यांचा जीवन बदलून टाकणारा अनुभव सुरू झाला, तशीच ही तुमच्याही जीवनाला कलाटणी देणाऱ्या अनुभवाची सुरुवात ठरू शकेल. आपल्या प्रभूने शिष्यांना दर्शन दिले तेव्हा गोंधळलेले आणि साशंक असलेले ते शिष्य बदलून गेले; ते आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले. पुढे ते येशूच्या मृत्यूचे आणि पुनरुत्थानाचे साक्षीदार म्हणून धैर्याने त्याच्याविषयी सुवार्ता सांगायला निघाले. आपले बोलणे ऐकणाऱ्या प्रत्येकाने आपला तारणारा म्हणून येशूकडे वळावे, अशी त्यांची इच्छा होती.

आजच्या मिस्साच्या पहिल्या वाचनात संत पेत्र नेमके हेच करताना दिसतो. त्याने मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एका पांगळ्या माणसाला बरे केले. ते पाहून आश्चर्यचकित झालेले लोक तेथे जमले आणि पेत्राने त्यांना येशूविषयी सांगितले. आपल्या उपदेशाचा शेवट करताना तो म्हणाला, “आपल्या ख्रिस्ताला दुःख सहन करावे लागेल, असे देवाने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने आधीच सांगितले होते. ते त्याने अशा रीतीने पूर्ण केले आहे. म्हणून पश्चात्ताप करा आणि देवाकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसली जातील.”

आपल्या प्रभूने आपल्या शिष्यांवर सोपवलेले कार्य आज आपल्यावरही सोपवले आहे. त्यांनी ज्या उत्साहाने, धैर्याने आणि दृढ विश्वासाने सुवार्ता सांगितली, तशीच ती आपणही सांगितली पाहिजे. सर्वप्रथम, येशूने पाप आणि मृत्यू यांच्यावर विजय मिळवला आहे, याची त्यांना जशी खात्री होती, तशीच खात्री आपल्यालाही असली पाहिजे. आपण सर्व पापांपासून दूर वळले पाहिजे आणि जीवनाची परिपूर्णता केवळ ख्रिस्त येशूमध्येच लाभते असा विश्वास ठेवला पाहिजे. मग हा विश्वास जाहीर करण्यासाठी आपण स्वतःला सर्वस्वी वाहून घेतले पाहिजे.

येशू हा जगाचा तारणारा आहे, यावर तुमचा किती दृढ विश्वास आहे, याचा प्रथम विचार करा. येशूने तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन दिले, तर त्याच्यावरचा तुमचा विश्वास अधिक दृढ होईल, असे तुम्हाला वाटू शकते. पण पहिल्या शिष्यांची खात्री होण्याचे मुख्य कारण येशूने त्यांना देहाने दर्शन दिले हे नव्हते. उलट, त्यांच्या मनाला झालेल्या आध्यात्मिक स्पर्शातूनच त्यांना ही देणगी मुख्यतः लाभली. येशूने शिष्यांना देहाने दर्शन दिल्यावर “पवित्र शास्त्र समजावे म्हणून त्यांची मने उघडली,” असे आपण वाचतो. इतर कशाहीपेक्षा समजुतीच्या या आध्यात्मिक देणगीनेच त्यांची खात्री पटली. येशूच्या पहिल्या अनुयायांना देऊ केलेली ही देणगी आज तुम्हालाही देऊ केली जाते.

संत थॉमस अक्विनास सांगतात की, समजुतीची ही आध्यात्मिक देणगी आपल्याला देवाच्या मूळ स्वरूपाची ओळख करून देते. आपल्या पाच ज्ञानेंद्रियांतून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा हे ज्ञान कितीतरी अधिक सखोल आहे, असे ते स्पष्ट करतात. म्हणून एखादी गोष्ट केवळ डोळ्यांनी पाहणे, तिला स्पर्श करणे किंवा तिचा आवाज ऐकणे यांपेक्षा समजुतीच्या आध्यात्मिक देणगीतून मिळणारे ज्ञान आपली अधिक दृढ खात्री पटवते. या देणगीमुळे आपण “अंतरंगात वाचू” शकतो आणि एखाद्या गोष्टीचे मूळ स्वरूप जाणू शकतो. म्हणून येशूचे देहाने झालेले दर्शन हे विश्वासाकडे नेणारे पहिले पाऊल ठरले असेल. पण जेव्हा याच शिष्यांना आपल्या आत्म्याच्या अंतरंगात प्रभूची भेट झाली आणि त्याच्या पुनरुत्थानाचे मर्म त्यांना आतून उमगले, तेव्हाच ते कायमचे बदलले. अशा ज्ञानामुळेच तारणाचा संदेश जाहीर करण्यासाठी पुढे जाण्याची त्यांची खात्री पक्की होऊ शकली.

आज तुम्हाला येशूची किती ओळख आहे आणि त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य तुमच्या जीवनात कसा बदल घडवते, यावर चिंतन करा. तुमच्या आत्म्याच्या गाभ्यात देव तुमच्याशी बोलला आहे का? हे ज्ञान तुम्हाला अंतर्यामी उमगले आहे का? ते समजून घेण्यासाठी तुमचे मन उघडले आहे का? आपल्या प्रभूचे लक्षपूर्वक ऐका—केवळ कानांनी नव्हे, तर मुख्यतः आपल्या आत्म्याने. तुमच्या अंतरंगातच, पहिल्या शिष्यांप्रमाणे, तुम्हाला ख्रिस्ताचे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान यांचे मर्म कळेल आणि त्यांवर तुमचा विश्वास बसेल. मग ही सत्ये इतरांना सांगण्यासाठी पुढे जाण्याचे सामर्थ्य तुम्हाला मिळेल.

हे माझ्या प्रभू, तू आपल्या शिष्यांना केवळ देहाने दर्शन दिले नाहीस, तर आध्यात्मिक रीतीनेही स्वतःला प्रकट केलेस आणि त्यांच्या अंतरंगात त्यांना तुझ्या मूळ स्वरूपाची ओळख करून दिलीस. हे प्रिय प्रभू, ही देणगी मलाही दे. मला तुझी ओळख होऊ दे आणि संपूर्ण अंतःकरणाने तुझ्यावर विश्वास ठेवू दे. अशा रीतीने तुझ्यावर विश्वास ठेवताना, तुझी दया इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा साधन म्हणून उपयोग कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

पुनरुत्थानकाळासाठी पवित्र शास्त्रावरील मनन

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील प्रमुख चित्रे: येशू शिष्यांना दर्शन देतो, इटलीतील मांतुआ येथील संत आंद्रियाच्या बॅसिलिकातील भित्तिचित्र, अ‍ॅडोबीच्या सौजन्याने