31 ऑगस्ट 2025
सामान्य काळातील बाविसावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने
छायाचित्र सौजन्य: अडोबी स्टॉक
“तू दुपारचे किंवा रात्रीचे जेवण देशील तेव्हा तुझे मित्र, भाऊ, नातेवाईक किंवा श्रीमंत शेजारी यांना बोलावू नकोस; नाहीतर तेही तुला परत बोलावतील आणि तुझी परतफेड होईल. उलट, तू मेजवानी देशील तेव्हा गरिबांना, व्यंग असलेल्यांना, लंगड्यांना आणि आंधळ्यांना बोलाव. त्यांना तुझी परतफेड करता येत नाही, म्हणून तू खरोखर धन्य होशील. कारण नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुला प्रतिफळ मिळेल.” लूक 14:12–14
शुभवर्तमानातील हा उतारा आपल्या जीवनातील कृतींमागच्या हेतूंना थेट हात घालतो. आपल्या पतित मानवी स्वभावामुळे आपण सहजपणे स्वार्थापोटी वागतो. आपल्या श्रमांचा मोबदला मिळावा आणि आपण केलेल्या चांगुलपणाची दखल घेतली जावी, असे आपल्याला वाटते. जीवनात पुढे जावे आणि इतरांपेक्षा वरचढ ठरावे, अशी आपली धडपड असते. पण येशू स्पष्ट सांगतो की आपण जे काही करतो, त्यामागे देवाचे गौरव करणे आणि इतरांवर प्रेम करणे एवढेच हेतू असले पाहिजेत.
या उताऱ्यातील गरीब, व्यंग असलेले, लंगडे आणि आंधळे म्हणजे ज्यांना आपल्या प्रेमाची गरज आहे असे लोक. त्यांत आपले मित्र आणि कुटुंबीय यांचाही नक्कीच समावेश होतो. गरजू व्यक्ती भेटतात तेव्हा आपण त्यांना प्रेम दिले पाहिजे. त्यातून आपल्याला काही मिळेल म्हणून नव्हे, तर तसे करणे योग्य आहे म्हणून. अशा वेळी आपल्याला मिळणारे प्रतिफळ थेट देवाकडूनच येते. ते समाजाची मान्यता किंवा प्रशंसा या रूपाने मिळत नाही. ते भौतिक वस्तूंच्या रूपानेही मिळत नाही. जीवनात पुढे जाण्यासाठीही त्याचा उपयोग होत नाही. ते प्रतिफळ म्हणजे आपल्याला पवित्र करणारी देवाची कृपा. देवावर आणि इतरांवर प्रेम करून देवाचे गौरव करावे आणि अशा रीतीने पवित्र व्हावे, हीच आपल्या जीवनाची एकमेव प्रेरणा असली पाहिजे.
तुमच्या जीवनात तुम्हाला कशाची प्रेरणा मिळते, याचा विचार करा. तुम्ही दररोज जे करता ते का करता? उपजीविका करणे, घराची आणि कुटुंबाची काळजी घेणे, नाती अधिक दृढ करणे अशा काही जबाबदाऱ्या आपल्या सर्वांनाच पार पाडाव्या लागतात, हे खरे आहे. पण तुम्ही या गोष्टी का करता? तुमची प्रेरणा कुठून येते? तिचा आधार निर्मळ प्रेम आहे का?
आपले प्रेम निर्मळ असते तेव्हा एखादी कृती करणे हे देवाप्रती आपले पवित्र कर्तव्य आहे किंवा त्या कृतीने दुसऱ्याचे भले होईल, हे जाणून आपण ती करतो. उदाहरणार्थ, प्रेमळ आणि पवित्र आई किंवा वडील उपजीविकेसाठी कष्ट करतात ते श्रीमंत होऊन या जगातील सुखोपभोगांत रमण्यासाठी नव्हे, तर त्यांचे आपल्या कुटुंबावर प्रेम असते, त्यांना कुटुंबाची काळजी असते आणि त्याच्या भौतिक गरजा भागवायच्या असतात म्हणून. तसेच, एखादी व्यक्ती आपल्या मित्राच्या पाठीशी उभी राहते आणि त्याचे म्हणणे ऐकून घेते, ते स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे, तर त्या मित्रावर तिचे प्रेम असते आणि त्याला गरज असताना त्याचे म्हणणे मन लावून ऐकावे असे तिला वाटते म्हणून. खरे प्रेम नेहमी दुसऱ्याचे भले पाहते. दुसरी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या कुठे गरीब आहे, कुठे व्यंग आहे, कुठे ती लंगडी किंवा आंधळी आहे, हे ते ओळखते, जेणेकरून देवाच्या इच्छेनुसार तिला मदत करता येईल. जिथे उणीव आहे, तिथे त्या क्षणी ज्याची गरज आहे ते देऊन ती भरून काढण्याचा खरे प्रेम नेहमी प्रयत्न करते.
आपल्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की आपले हेतू निर्मळ आणि निःस्वार्थ असतील आणि देवाचे गौरव करणे व इतरांची काळजी घेणे एवढेच आपले ध्येय असेल, तर देव आपल्यावर शाश्वत प्रतिफळांचा वर्षाव करील. ती प्रतिफळे आपल्याला आतापासूनच मिळू लागतील. आपण सद्गुणांनी आणि पवित्र आत्म्याच्या फळांनी समृद्ध होऊ. आपल्याला आनंद, शांती, बळ, धैर्य, प्रेम, चांगुलपणा आणि आणखी कितीतरी काही लाभेल. हेच जीवनातील खरे धन आहे. ज्याच्या जीवनातील हेतू निर्मळ, निःस्वार्थ, त्यागमय आणि दयाळूपणाने भरलेले असतात, अशा आत्म्याला हे धन केवळ देवच देऊ शकतो.
दररोज तुम्हाला कशाची प्रेरणा मिळते, यावर आज चिंतन करा. कृती करताना तुम्ही स्वतःचा अधिक विचार करता की देवाचा आणि इतरांचा? तुम्ही जे काही करता त्यातून इतरांची सेवा करण्याची आणि देवाचे गौरव करण्याची उत्कट इच्छा तुमच्या मनात तुम्हाला दिसून येवो. पण जिथे तुम्हाला स्वार्थ दिसतो, तिथे हे लक्षात ठेवा की स्वार्थातून तुम्हाला कधीच खरे समाधान मिळणार नाही. नम्र व्हा, देवावरील प्रेमाकडे आणि इतरांच्या गरजांकडे लक्ष द्या आणि देवाची व इतरांची सेवा करणे हेच तुमचे एकमेव ध्येय ठेवा. असे केल्याने देव तुमच्या कल्पनेपलीकडचे दान तुमच्यावर उदारपणे करील.
हे माझ्या दयाळू प्रभू, तू सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आणि परम निर्मळ व पवित्र प्रेमाने इतरांसाठी आपले जीवन अर्पण करण्यासाठी या पृथ्वीवर आलास. तुझ्या दैवी प्रेमाचे हे दान स्वीकारण्यासाठी मी माझे हृदय उघडतो. तुझे प्रेम स्वीकारताना मला तुझ्यावर आणि इतरांवर त्याच निःस्वार्थ भावनेने प्रेम करता यावे, अशी मी प्रार्थना करतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




