मराठी

उपदेश, क्षमा आणि चमत्कार

16 जानेवारी 2025
शुक्रवार (सामान्य काळातील पहिला आठवडा)
आजची वाचने

© झुझे लुईझ बेर्नार्देश रिबेरू

व्हिडिओ

“या पक्षाघात झालेल्या मनुष्याला ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे म्हणणे सोपे, की ‘ऊठ, आपली चटई उचल आणि चालू लाग’ असे म्हणणे सोपे? पण पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्यपुत्राला आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून”—ते त्या पक्षाघात झालेल्या मनुष्याला म्हणाले, “मी तुला सांगतो, ऊठ, आपली चटई उचल आणि घरी जा.” मार्क 2:9–11

मार्कच्या शुभवर्तमानानुसार, येशूंनी आपल्या सेवाकार्याची सुरुवात कफर्णहूम येथे केली. आपल्या पहिल्या प्रेषितांना बोलावल्यानंतर थोड्याच काळात येशूंनी सभास्थानात उपदेश केला. तो ऐकून अनेक जण थक्क झाले. येशूंनी एका भूतबाधित मनुष्याला आणि पेत्राच्या सासूला बरे केले. त्यानंतर येशू ज्या घरात उतरले होते, तेथे नगरातील सर्व लोक जमले. “त्यांनी निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या अनेकांना बरे केले आणि पुष्कळ भुते घालवून दिली. ती त्यांना ओळखत असल्यामुळे त्यांनी त्यांना बोलू दिले नाही” (मार्क 1:34).

यानंतर, येशूंच्या चमत्कारांचे लोकांना अधिकाधिक आकर्षण वाटत होते, तरीही येशू प्रार्थना करण्यासाठी एका निर्जन ठिकाणी गेले. प्रेषितांना ते सापडले तेव्हा त्यांनी आपल्या कार्याचा मुख्य हेतू सांगितला: “चला, आपण जवळच्या गावांत जाऊ या, म्हणजे मलाही तेथे उपदेश करता येईल. यासाठीच मी आलो आहे” (मार्क 1:38). तेथून येशू आपल्या प्रेषितांसह इतर नगरांत गेले. पश्चात्ताप करण्याची आणि देवाशी समेट साधण्याची सुवार्ता सांगणे, हेच त्यांचे मुख्य कार्य होते आणि ते त्यांनी पार पाडले.

यापैकी एका नगरात येशूंना एका कुष्ठरोग्याची फार करुणा आली आणि त्यांनी त्याला बरे केले. पण या चमत्कारामुळे लोकांचे लक्ष त्यांच्या उपदेशाऐवजी रोग बरे करण्याच्या त्यांच्या सामर्थ्यावर अधिकच केंद्रित झाले. चमत्कारांच्या अपेक्षेने लोकांचे घोळके त्यांच्या मागे येऊ लागले तेव्हा ते कफर्णहूमला परतले. आजच्या शुभवर्तमानातील प्रसंग तिथेच घडतो.

कफर्णहूममध्ये येशूंनी आपले मुख्य कार्य पुन्हा सुरू केले: “त्यांनी लोकांना देवाचे वचन सांगितले” (मार्क 2:2). पण त्यांच्या चमत्कारांकडे अधिक लक्ष असलेल्या लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. येशू बहुधा पेत्राच्या घरात उपदेश करत असताना काही जण पक्षाघात झालेल्या एका मनुष्याला घेऊन आले. गर्दीमुळे त्यांना आत जाता आले नाही. म्हणून ते छपरावर चढले, त्यांनी छपरात उघडी जागा केली आणि त्या मनुष्याला खाली उतरवले.

पुढे जे घडते त्याला खोल अर्थ आहे. येशू त्या मनुष्याकडे पाहून म्हणतात, “बाळा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे” (मार्क 2:5). येशू प्रथम त्याचा पक्षाघात बरा करत नाहीत. त्याऐवजी, ते त्याच्या अधिक खोल गरजेकडे लक्ष देतात: त्याला आध्यात्मिकरीत्या बरे होण्याची गरज आहे. येशूंनी त्या मनुष्याची आणि त्याला घेऊन आलेल्यांची श्रद्धा पाहिली आणि त्याच्या पापांची क्षमा केली. येशू असे का करतात? कारण शरीर बरे होण्यापेक्षा आत्म्याचे आरोग्य अधिक महत्त्वाचे आहे. पाप्यांना पश्चात्ताप करण्यास बोलावणे आणि त्यांचा देवाशी समेट घडवून आणणे, हे येशूंचे मुख्य कार्य होते. शरीर बरे करणे नेहमीच दुय्यम होते.

शास्त्री येशूंच्या पापक्षमा करण्याच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा येशू केवळ चमत्कार करणारे नाहीत, तर देवाचे पुत्र आहेत, हे त्यांना उमगत नाही. पापांची क्षमा करण्याचा आपला अधिकार त्यांना समजावा म्हणून येशू म्हणतात: “‘पण पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्यपुत्राला आहे, हे तुम्हाला कळावे म्हणून’—ते त्या पक्षाघात झालेल्या मनुष्याला म्हणाले, ‘मी तुला सांगतो, ऊठ, आपली चटई उचल आणि घरी जा.’” सर्वांच्या डोळ्यांदेखत त्या मनुष्याने तसेच केले आणि जमलेले लोक थक्क झाले. त्या मनुष्याचे शरीर बरे होणे हे येशूंच्या पापक्षमा करण्याच्या अदृश्य सामर्थ्याचे दृश्य चिन्ह आहे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानातील चमत्कार दुय्यम महत्त्वाचा असला, तरी येशूंनी तो लोकांना आपले मुख्य कार्य समजावे म्हणून केला.

आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनात येशूंना आपले मुख्य कार्य पूर्ण करायचे आहे. त्यांना आपल्या पापांची क्षमा करून आपला पित्याशी आणि स्वतःशी समेट घडवून आणायचा आहे. हे सर्वप्रथम समेटाच्या संस्काराद्वारे घडते. या संस्कारात आपले जीवन बदलण्याचे सामर्थ्य आहे. या संस्काराद्वारे येशूंच्या कार्याचा मूळ हेतू साध्य होतो, तरीही अनेक जण या कृपेचा लाभ घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्याऐवजी, आपणच ठरवलेल्या इतर गोष्टी देवाकडे मागणे ते पसंत करतात.

समेटाच्या संस्काराकडे तुम्ही कसे पाहता, यावर आज चिंतन करा. तुम्ही नियमितपणे श्रद्धेने आपली पापे येशूंसमोर मांडता का, जेणेकरून ते तुम्हाला बरे करतील आणि तुमचा पित्याशी समेट घडवून आणतील? आजच्या शुभवर्तमानावर चिंतन करताना स्वतःला त्या पक्षाघात झालेल्या मनुष्याच्या जागी ठेवा. येशू तुम्हाला जसे पाहतात तसे स्वतःकडे पाहा: तुम्हाला त्यांच्या दयेची आणि कृपेची गरज आहे. ते आपल्याला अनेक आशीर्वाद देत असले, तरी आपल्या पापांची क्षमा हीच ते आपल्याला देऊ इच्छित असलेली सर्वांत मोठी देणगी आहे. समेटाच्या संस्कारात त्यांचे हे शब्द आपल्या हृदयात घुमावेत, अशी आस धरा: “बाळा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

हे परमदयाळू प्रभू, क्षमेची सुवार्ता सांगण्यासाठी आणि आमचा पित्याशी समेट घडवून आणण्यासाठी तू आलास. तेव्हा हेच तुझे कार्य होते आणि आजही तेच आहे. या देणगीची आस मला सदैव लागून राहावी आणि तिला माझ्या जीवनात मध्यवर्ती स्थान देता यावे, अशी कृपा मला दे, जेणेकरून तुझे कार्य माझ्यामध्ये पूर्ण होईल. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

जीवनासाठी नऊ दिवसांची नोव्हेना
‘जीवनासाठी ९ दिवस’ ही मानवी जीवनाच्या रक्षणासाठीची नोव्हेना आहे. प्रत्येक दिवसाच्या प्रार्थनेच्या हेतूसोबत एक छोटे चिंतन आणि जीवनाचा आदर करणारी संस्कृती घडवण्यासाठी काही कृती सुचवल्या आहेत. 

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय