4 फेब्रुवारी 2026
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने
त्याने त्यांना अधिकाराने शिकवले याचे निर्माते लॉरेन्स ओपी, परवाना CC BY-NC-ND 2.0.
येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याला त्याच्या गावात, त्याच्या नातलगांमध्ये आणि त्याच्या स्वतःच्या घरातच मान मिळत नाही; इतरत्र त्याला मान मिळतो.” म्हणून तेथे काही आजारी लोकांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याखेरीज त्याला कोणतेही सामर्थ्याचे कार्य करता आले नाही. त्यांच्यात श्रद्धा नव्हती, याचे त्याला आश्चर्य वाटले. मार्क 6:4–6
‘अति परिचयात अवज्ञा’ अशी एक जुनी म्हण आहे. आपल्या सर्वांत जवळच्या माणसांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांना मनातल्या मनात तुच्छ लेखणे अनेकदा सोपे जाते. नातेवाईक, शेजारी आणि मित्र यांच्यात असे वारंवार दिसून येते. ही तुच्छतेची भावना अगदी सूक्ष्म असू शकते; ती उघडपणे दिसेलच असे नाही. तरीही, आपल्या जवळच्या व्यक्तीचा गौरव होतो तेव्हा तिच्या कौतुकात सहभागी होण्यापेक्षा तिचे दोष आठवणे आपल्याला अनेकदा सोपे जाते. या भावनांना वेळीच आवर घातला नाही, तर आपल्या नात्यांना हानी पोहोचतेच, पण आपल्या जवळच्या माणसांच्या जीवनात देवाची कृपा कशी कार्य करते, हेही आपल्याला दिसेनासे होते.
आजचे शुभवर्तमान सांगते की येशू आपले सार्वजनिक सेवाकार्य सुरू केल्यानंतर नाझरेथ या आपल्या गावी परतला. बाप्तिस्मा घेतल्यानंतर आणि वाळवंटातून परतल्यावर लवकरच येशूने शिष्यांना एकत्र करायला, अधिकाराने उपदेश करायला आणि चमत्कार करायला सुरुवात केली. नाझरेथच्या ईशान्येला सुमारे वीस मैलांवर असलेल्या कफर्णहूम येथे त्याचे सेवाकार्य सुरू झाले, तरी त्याच्याविषयीची बातमी झपाट्याने पसरली. त्याच्याविषयी काय समजावे, हे नाझरेथच्या लोकांना कळेना.
येशू पहिल्यांदा नाझरेथला परतला तेव्हा तो सभास्थानात गेला. तिथे त्याने यशया संदेष्ट्याच्या ग्रंथातून वाचले आणि ‘प्रभूचा आत्मा’ आपल्यावर आहे, असे जाहीर केले (पाहा लूक 4:18). आज आपण वाचत असलेल्या मार्कच्या वर्णनानुसार, ‘त्याचे बोलणे ऐकणाऱ्या अनेकांना आश्चर्य वाटले.’ ते एकमेकांना विचारू लागले, ‘हा तोच सुतार नाही का, मरियेचा मुलगा…?’ आणि त्यांना त्याचा अडखळा झाला (मार्क 6:2–3).
त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, त्याचे कारण येशूमध्ये नव्हते. येशू म्हणजे आपल्या गावातला एक सुतार, अशी त्यांची समजूत होती. आता तो दैवी ज्ञानाने आणि अधिकाराने बोलत होता; या दोन गोष्टींचा मेळ त्यांना घालता आला नाही. नाझरेथच्या लोकांची प्रतिक्रिया एक धोका दाखवून देते: इतरांविषयीच्या आपल्या पूर्वकल्पनांना आपण घट्ट धरून राहिलो, तर साध्यासुध्या गोष्टींमधले देवाचे सान्निध्य आपल्याला दिसत नाही.
तुमच्या ओळखीच्या माणसांचा विचार करता, तुमच्यातही अशीच प्रवृत्ती दिसते का? आपल्या कुटुंबीयांमध्ये, मित्रांमध्ये किंवा अगदी स्वतःमध्येही ख्रिस्त कसा कार्य करतो, हे ओळखणे तुम्हाला कठीण जाते का? जवळच्या परिचयामुळे आपण एखाद्याला सहज कमी लेखू शकतो. पण हाच परिचय आपल्याला अधिक खोलवर पाहण्याची आणि जे साधे व रोजचे वाटते त्यातही देवाचे सान्निध्य शोधण्याची संधी देतो. आपल्या ओळखीच्या प्रत्येकाकडे आपण श्रद्धेच्या नजरेने पाहिले पाहिजे आणि त्यांच्या कमतरता व पापे असूनही त्यांच्यात ख्रिस्ताचे सान्निध्य शोधले पाहिजे. येशू आपल्याला आठवण करून देतो, ‘शोधा, म्हणजे तुम्हाला सापडेल’ (मत्तय 7:7). आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये, विशेषतः आपल्या सर्वांत जवळच्या माणसांमध्ये ख्रिस्ताचा शोध घेण्याचे आवाहनही या शब्दांत आहे.
हे कठीण असू शकते. इतरांमधील चांगुलपणापेक्षा त्यांच्या दोषांकडे लक्ष देण्याचा मोह आपल्याला अनेकदा होतो. समाजमाध्यमांवर ही प्रवृत्ती ठळकपणे दिसते. उभारी देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या पोस्टपेक्षा खळबळजनक व धक्कादायक पोस्ट आपले लक्ष कितीतरी अधिक वेधून घेतात. नाझरेथच्या लोकांप्रमाणेच चांगुलपणा आणि आपल्याला पाहण्यास बोलावलेले अधिक खोल सत्य नाकारण्याकडे आपल्या पतित मानवी स्वभावाचा कल असतो, हे यातून दिसते. स्वतःविषयी बरे वाटावे म्हणून इतरांना अपयश यावे, असेही आपल्याला अनेकदा वाटते. येशू परिपूर्ण असूनही नाझरेथमध्ये त्याला ओळखणाऱ्यांनी आपल्या पूर्वग्रहांमुळे सत्याकडे डोळेझाक केली आणि त्याला मशीहा म्हणून नाकारले. त्यांची ही प्रतिक्रिया आपल्यालाही स्वतःचे अंतःकरण तपासण्याचे आव्हान देते. आपल्या सर्वांत जवळच्या माणसांमधील ख्रिस्ताचे सान्निध्य ओळखण्यात आपण कितीदा कमी पडतो?
आज आपल्या सर्वांत जवळच्या माणसांचा विचार करा. त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा शोध घेणे आणि त्याला ओळखणे तुम्हाला कितपत सहज जमते, यावर चिंतन करा. तुमच्या ओळखीची प्रत्येक व्यक्ती पापी आहे; तुम्ही स्वतःही त्याला अपवाद नाही. दोष शोधणे आणि त्याचाच विचार करत राहणे सोपे असते. कधीकधी दोष नसतानाही आपण असे करतो, जसे नाझरेथच्या लोकांनी येशूच्या बाबतीत केले. प्रार्थनेतून आपल्या पतित मानवी स्वभावाची ही प्रवृत्ती नाकारा आणि इतरांमध्ये ख्रिस्ताचा शोध घेण्याचे कार्य स्वीकारा, कारण ‘जो शोधतो, त्याला सापडते.’ सर्वत्र येशूचा शोध घ्या. तो आपल्या जगात, विशेषतः आपल्या सर्वांत जवळच्या माणसांच्या जीवनात, आजही उपस्थित आहे, या सुवार्तेचा आनंद साजरा करा.
हे माझ्या सर्वव्यापी प्रभू, तू असंख्य मार्गांनी मला स्वतःची ओळख करून देतोस—संस्कारांद्वारे, तुझ्या पवित्र वचनाद्वारे आणि माझ्या सभोवतालच्या, विशेषतः माझ्या सर्वांत जवळच्या माणसांच्या जीवनाद्वारे. दररोज श्रद्धेने आणि प्रेमाने तुझा शोध घेण्याची कृपा मला दे, जेणेकरून तू माझ्या जीवनात आणलेल्या माणसांच्या अंतःकरणात आणि कृतींत मला तू सापडावास. प्रभू, माझी दृष्टी बदल, म्हणजे साध्यासुध्या गोष्टींतही मला तुझे सान्निध्य दिसेल आणि मी नम्रपणे, कृतज्ञतेने व विश्वासाने तुला प्रतिसाद देईन. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन




