मराठी

देवाच्या प्रेरणा

गुरुवार, 15 डिसेंबर 2016

आगमनकाळाच्या तिसऱ्या आठवड्यातील गुरुवारची वाचने

आजचे संत

(ज्यांनी हे ऐकले आणि योहानाचा बाप्तिस्मा घेतला होता, त्या सर्व लोकांनी, जकातदारांनीही, देवाचे न्यायीपण मान्य केले; पण परुशी आणि धर्मशास्त्राचे पंडित यांनी त्याच्याकडून बाप्तिस्मा घेतला नव्हता आणि त्यांनी आपल्यासाठी असलेली देवाची योजना नाकारली.) लूक 7:29-30

श्रद्धेत वाढण्यासाठी श्रद्धेने एक पाऊल पुढे टाकावे लागते. आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला ही शिकवण मिळू शकते. कारण ज्यांनी श्रद्धेने पुढे येऊन योहानाकडून बाप्तिस्मा घेतला, त्यांनी “देवाचे न्यायीपण मान्य केले.” ज्यांनी योहानाचा बाप्तिस्मा स्वीकारण्यास नकार दिला, त्यांनी “आपल्यासाठी असलेली देवाची योजना नाकारली.”

हेच सत्य आपल्या जीवनाला लावून पाहिले, तर ते अनेक प्रकारे लागू पडते हे आपल्या लक्षात येईल. सर्वप्रथम, आपण बाप्तिस्म्याद्वारे आधीच ख्रिस्ताशी जोडले गेलो आहोत. त्यामुळे योहानाचा बाप्तिस्मा प्रत्यक्ष घ्यावा, असे आवाहन आपल्याला केलेले नाही. पण “योहानाचा बाप्तिस्मा” हे आपल्या जीवनात पवित्र आत्मा आपल्याला देत असलेल्या पहिल्या आमंत्रणाचे प्रतीक म्हणूनही पाहता येईल.

उदाहरणार्थ, “हे पुस्तक वाच,” असे देव आपल्याला सांगत आहे असे जाणवले, पण आपण त्या प्रेरणेकडे दुर्लक्ष केले, तर आपल्या जीवनासाठी देवाने आखलेल्या योजनेचा आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी मोठा भाग आपण नाकारत असू. किंवा एखाद्या व्यक्तीला क्षमा करावी, प्रार्थनेत अधिक वेळ घालवावा, कुटुंबासाठी जास्त वेळ द्यावा किंवा असेच काही करावे, असे देव आपल्याला सुचवत आहे असे जाणवले, आणि त्याप्रमाणे आपण वागलो, तर त्यामुळे आपल्या जीवनात आणखी अनेक अद्भुत कृपांचे दार उघडते, असा अनुभव आपल्याला येऊ शकतो.

देव तुम्हाला काय करण्यास किंवा त्याच्याकडून आलेले म्हणून काय स्वीकारण्यास बोलावत आहे, यावर आज चिंतन करा. ते अगदी क्षुल्लक वाटले तरी ते पहिले आमंत्रण नाकारू नका; उलट ते मनापासून स्वीकारा. ते स्वीकारल्यावर कदाचित तुम्हाला जाणवेल की, तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती अशा रीतीने देव तुम्हाला विपुल आशीर्वाद देतो.

हे प्रभू, माझ्या जीवनात तू रोज देत असलेल्या आमंत्रणांना प्रतिसाद देण्यास मला मदत कर. तुझी पवित्र इच्छा मला नेहमी ओळखता येवो आणि कोणताही आडपडदा न ठेवता मला तिच्याप्रमाणे जगता येवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

हेही पाहा: दैवी दयेवरील दैनिक चिंतन