रविवार, 17 जून 2018
सामान्य काळातील अकरावा रविवार, वर्ष ब

येशू जमलेल्या लोकांना म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे: एखादा मनुष्य जमिनीवर बी पेरतो. दिवस-रात्र तो झोपतो आणि उठतो. दरम्यान बी उगवते आणि वाढते; पण हे कसे घडते, ते त्याला माहीत नसते.” मार्क 4:26-27
आपल्यामध्ये देवाचे राज्य कसे अंकुरते, वाढते आणि फळ देते, याचे हे किती सुंदर चित्र आहे!
आपले राज्य यावे, अशी देवाची इच्छा आहे. प्रभूच्या प्रार्थनेत आपण हीच विनंती करतो. त्याचे राज्य यावे अशी प्रार्थना आपण करतो, तेव्हा तिचा अर्थ काय? पहिला अर्थ असा की, देवाला आपल्या अंतर्यामी येऊन राहायचे आहे आणि आपल्या हृदयात व आत्म्यात त्याचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. आपण त्याच्या राज्याचे जिवंत सदस्य झाले पाहिजे आणि तोच आपला शासक व मार्गदर्शक असला पाहिजे.
दुसरे म्हणजे, देवाचे नियम आपल्या जगात प्रस्थापित व्हावेत आणि त्याची इच्छा येथे पूर्ण व्हावी, असा याचा अर्थ आपण घेतो. यासाठी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे देवाच्या कृपेने परिवर्तन झाले पाहिजे, जेणेकरून ती त्याच्या राज्यात सहभागी होईल आणि त्या राज्याचे फळ देईल. यात आपल्यालाही काम करायचे आहे!
तिसरा अर्थ असा की, येशू वैभवाने आणि प्रतापाने पुन्हा येईल, तेव्हा त्याचे राज्य अंतिमतः गौरवाने प्रकट होईल, याची आपण वाट पाहतो. शेवटी सर्व गोष्टींचे रूपांतर होईल. देव जगाचा अंतिम न्याय करील आणि सर्व काही नव्याने घडवील.
पण हे ‘कसे’ घडेल, हे विशेषतः वरील उतारा आपल्याला दाखवतो. देवाचे राज्य हळूहळू, अलगद आणि चमत्कारिक रीतीने रुजेल, हे त्यातून दिसते. हे आपल्या जीवनात घडेल. आपण ख्रिस्ती या कार्याला स्वतःला वाहून घेऊ, तसे हे आपल्या जगातही घडेल. आणि काळाच्या शेवटी येशू पुन्हा येईल, तेव्हा हे चमत्कारिक रीतीने घडेल.
येशूने आपल्यासमोर उभे केलेले हे चित्र मनात आणा. शेतकरी बी पेरतो आणि ते हळूहळू उगवते, वाढते आणि त्याला फळ येते. हे ‘कसे घडते, ते त्याला माहीत नसते.’
देव कोणकोणत्या गूढ मार्गांनी आपले राज्य प्रस्थापित करतो, यावर आज चिंतन करा. या कार्याची धुरा सर्वप्रथम त्याच्याच हाती आहे. पण तुम्हीही तुमच्या वाट्याचे काम केले पाहिजे. तुमचे हृदय आणि तुमच्या सभोवतालचे जग सुपीक जमीन बनले पाहिजे. बी पेरा, गरजेप्रमाणे त्याला पाणी द्या आणि मग देवाला त्याचे कार्य करू द्या. तुमच्या जीवनात आणि जगात आपले राज्य बहरावे, अशी देवाची इच्छा आपल्यापैकी कोणाच्याही इच्छेपेक्षा कितीतरी अधिक प्रबळ आहे. तुम्ही तुमच्या वाट्याचे काम केले, तर त्याच्या कृपेचे हे वैभवशाली कार्य बहरताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
हे प्रभू, माझे हृदय तुझ्या राज्यासाठी सुपीक जमीन होऊ दे. माझ्या हृदयात तुझे राज्य वाढवण्याचे कार्य तुला करू देण्यास मला मदत कर. या जगात तुझ्या राज्याचे साधन होण्यासही मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.


