मराठी

हे येशू, दया कर!

रविवार, 28 ऑक्टोबर 2018

सामान्य काळातील तिसावा रविवार, वर्ष ब

आजची वाचने

संत सिमोन व संत युदा, प्रेषित – सण

तो नाझरेथचा येशू आहे हे ऐकताच [बार्तिमय] मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “हे येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर.” मार्क 10:47

अंध बार्तिमयाचे हे शब्द काही कारणांनी आपल्यासमोर एका परिपूर्ण प्रार्थनेचा नमुना ठेवतात.

पहिली गोष्ट म्हणजे, या प्रार्थनेतून बार्तिमयाची गाढ नम्रता दिसून येते. आपल्याला जे हवे आहे ते येशूकडूनच मिळू शकते आणि आपण स्वतःच्या बळावर काही करू शकत नाही, याची त्याला जाणीव होती. ती या प्रार्थनेतून व्यक्त होते. आपण दुर्बळ आहोत, पण येशू सामर्थ्याने परिपूर्ण आहे, हे बार्तिमयाला ठाऊक होते. म्हणूनच, आपल्या गरजेच्या वेळी जे हवे ते येशूकडूनच मिळेल हे ओळखून तो नम्रपणे त्याच्याकडे वळला.

दुसरी गोष्ट म्हणजे, या प्रार्थनेत तो “दया” मागत आर्त हाक मारतो. दुसऱ्याचे दुःख पाहून मनात उठणारी कळवळ आणि करुणा म्हणजे दया. दया ही कृपाळूपणाची अभिव्यक्ती आहे; दुसऱ्यावर प्रेम करण्याचे कोणतेही बंधन नसताना त्याच्यावर केलेले प्रेम म्हणजे दया. अशा देणगीला आपण पात्र नाही, तरीही सर्वसमर्थ प्रभूने आपल्याशी दयाळूपणे वागावे आणि आपल्यावर दया करावी, अशी विनंती बार्तिमय या प्रार्थनेत करतो. आपल्या प्रभूकडून मदत मिळण्यास आपण पात्र नाही, हे त्याला ठाऊक होते, असे या प्रार्थनेतून दिसते. तरीही येशू मदत करील या आशेने त्याने आर्त हाक मारली. आणि खरोखरच, येशू त्याला मदत करतो.

तिसरी गोष्ट म्हणजे, या प्रार्थनेतून त्याची खोल तळमळ दिसून येते. ही देवाकडे मदतीसाठी केलेली केवळ विनंती नाही; ही मदतीसाठी मारलेली आर्त हाक आहे. तो कळकळीने विनवतो, मदतीची भीक मागतो. आपला कमकुवतपणा उघड होईल, इतर लोक ते पाहतील किंवा ते काय विचार करतील, याची चिंता न करता तो देवापुढे आपले अंतःकरण उघडे करतो. या अंध माणसाची प्रार्थना किती खोलवरून आली होती, हे यातून दिसते.

बार्तिमयच्या छोट्याशा प्रार्थनेतून मिळणाऱ्या या तीन शिकवणींवर आज चिंतन करा. आपण नम्र असले पाहिजे, दयेची याचना केली पाहिजे आणि ती अंतःकरणातील उत्कटतेने व तळमळीने केली पाहिजे. अशी प्रार्थना केल्याने देवाची कृपा आणि दया स्वीकारण्यास आपले अंतःकरण नक्कीच तयार होईल.

हे प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. तू माझ्यावर दया करावी आणि मला करुणा दाखवावी, अशी मी अगदी मनापासून नम्र विनवणी करतो. मी पात्र नसलो तरी तुझी कृपा मागतो आणि तुझ्या चांगुलपणावर भरवसा ठेवतो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

अधिक वाचा>>>

आजचे संत – संत सिमोन व संत युदा, प्रेषित