मराठी

तुमचा खजिना आणि तुमचे हृदय

शुक्रवार, २१ जून २०१९

सामान्य काळातील अकराव्या आठवड्याचा शुक्रवार

आजची वाचने

संत अलॉयशियस गोन्झागा, व्रतस्थ – स्मृतिदिन

“पृथ्वीवर स्वतःसाठी खजिना साठवू नका. येथे कसर लागून आणि वस्तू कुजून खजिना नष्ट होतो, आणि चोर घर फोडून तो चोरून नेतात. त्याऐवजी स्वर्गात खजिना साठवा. तेथे कसर लागत नाही, वस्तू कुजत नाहीत आणि चोर घर फोडून खजिना चोरून नेत नाहीत. कारण जिथे तुमचा खजिना आहे, तिथेच तुमचे हृदयही असेल.”  मत्तय 6:19-21

मग तुमचे हृदय कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर वर दिले आहे. जिथे तुमचा खजिना आहे, तिथेच तुमचे हृदय आहे. यावरून असा प्रश्न पडतो, “तुमचा खजिना काय आहे?”

या उताऱ्यात भौतिक संपत्तीची अतिआसक्ती किती धोकादायक आहे, हे दाखवले आहे. पण या जीवनात ज्या कशाची आपल्याला आसक्ती जडू शकते, त्या सर्वांनाही हेच लागू होते. तुम्हाला कशाची आसक्ती आहे? तुमचा खजिना काय आहे?

खरे तर, ज्या गोष्टींशी आपले मन जडावे अशी देवाची इच्छा आहे, त्यांच्याशीच ते जडलेले असावे. तसे असेल, तर आपण ज्या गोष्टींवर प्रेम करतो, तोच देवाच्या इच्छेनुसार आपण जपायचा ठेवा आहे. त्या गोष्टींवर प्रेम करून आपण त्या देणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करायला आपल्याला बोलावणाऱ्या देवावरच प्रेम करतो.

आपले कुटुंब आणि ज्यांच्यावर विशेष ममतेने प्रेम करण्यास व ज्यांची काळजी घेण्यास आपल्याला पाचारण आहे, अशा इतर व्यक्तींचा आपल्या खजिन्यात नक्कीच समावेश असावा. आपले प्रार्थनेचे आणि उपासनेचे जीवन हाही आपला खजिना असावा. या जगात देवावर प्रेम व्यक्त करण्याचा हा सर्वांत थेट मार्ग आहे. जी सेवाकार्ये करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते, ती किंवा देवाच्या इच्छेत जे काही सामावले आहे, तेही आपला खजिना असू शकते.

या गोष्टींवर तुमचे प्रेम आहे का? हाच तुमचा ठेवा आहे का? अडचण अशी आहे की, देव ज्या गोष्टींवर प्रेम करायला आपल्याला बोलावतो, त्यांव्यतिरिक्त इतर कितीतरी गोष्टींवरही आपण फार वेळा प्रेम करतो. श्रीमंत होण्याच्या आणि पुष्कळ वस्तू बाळगण्याच्या कल्पनेत आपले मन अगदी गुंतून जाते. पण आपले हे अयोग्य ‘प्रेम’ केवळ धनसंपत्ती आणि भौतिक वस्तूंपुरतेच मर्यादित राहते असे नाही.

आज, तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टींना तुम्ही ‘खजिना’ मानून प्रमाणाबाहेर महत्त्व दिले आहे, यावर मनन करा. या नश्वर जगात तुम्हाला कशाची अतिआसक्ती आहे? पैशाची? की आणखी कशाची? ती आसक्ती कोणती आहे हे देवाला तुम्हाला दाखवू द्या आणि मग त्याला तुम्हाला तिच्यापासून मुक्त करू द्या. खऱ्या अर्थाने सर्वांत श्रीमंत जीवनाकडे नेणारे हे पहिले पाऊल आहे!

हे प्रभू, माझे मन तुझ्यावर स्थिर ठेवायला मला मदत कर. तू आणि तुझी इच्छा हाच माझा सर्वांत मौल्यवान ठेवा मानायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत – संत अलॉयशियस गोन्झागा