सोमवार, १९ ऑगस्ट २०१९
सामान्य काळातील विसाव्या आठवड्याचा सोमवार
संत जॉन युड्स, धर्मगुरू – ऐच्छिक स्मृतिदिन

“तुला परिपूर्ण व्हायचे असेल, तर जा, तुझ्याजवळ जे आहे ते विक आणि त्यातून मिळालेले धन गरिबांना दे. मग स्वर्गात तुला संपत्ती मिळेल. त्यानंतर ये, माझ्यामागे चल.” हे ऐकून तो तरुण दुःखी होऊन निघून गेला, कारण त्याच्याकडे पुष्कळ मालमत्ता होती. मत्तय 19:21-22
बरे झाले, येशूने हे तुम्हाला किंवा मला सांगितले नाही! नाही का? पण खरेच त्याने आपल्याला हे सांगितले नाही का? आपल्याला परिपूर्ण व्हायचे असेल, तर हे आपल्या सर्वांनाही लागू होते का? या प्रश्नाचे उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हे खरे आहे की येशू काही जणांना आपली सर्व मालमत्ता प्रत्यक्ष विकून टाकण्याचे आणि त्यातून मिळालेले धन वाटून देण्याचे आवाहन करतो. जे या आवाहनाला प्रतिसाद देतात, त्यांना सर्व भौतिक वस्तूंची आसक्ती सोडण्यात मोठे स्वातंत्र्य लाभते. त्यांना लाभलेले हे पाचारण आपल्यापैकी प्रत्येकाला अंतरंगात किती आमूलाग्र बदल घडवण्यास बोलावले आहे, याची खूण आहे. पण बाकीच्या आपले काय? आपल्या प्रभूने आपल्याला अंतरंगात कोणता आमूलाग्र बदल घडवण्यास बोलावले आहे? त्याने आपल्याला आध्यात्मिक दारिद्र्य स्वीकारण्यास बोलावले आहे. ‘आध्यात्मिक दारिद्र्य’ याचा अर्थ असा की प्रत्यक्ष दारिद्र्य स्वीकारण्यास ज्यांना बोलावले आहे, त्यांच्याइतकीच या जगातील वस्तूंची आसक्ती सोडण्यास आपल्यापैकी प्रत्येकाला बोलावले आहे. फरक इतकाच की एका पाचारणात अंतरंगातील आणि बाह्य जीवनातील अशा दोन्ही प्रकारच्या त्यागाची मागणी आहे, तर दुसऱ्यात केवळ अंतरंगातील त्यागाची मागणी आहे. पण तो त्याग तितकाच आमूलाग्र असला पाहिजे.
अंतरंगातील दारिद्र्य म्हणजे नेमके काय? प्रभूच्या धन्यवचनांपैकी एक वचन याविषयी आहे. संत मत्तय म्हणतात, “जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य,” आणि संत लूक म्हणतात, “गरीब धन्य आहेत.” आध्यात्मिक दारिद्र्य म्हणजे या जगातील भौतिक मोहांची आसक्ती सोडताना आध्यात्मिक संपत्तीचा आशीर्वाद अनुभवणे. भौतिक ‘वस्तू’ मुळात वाईट नाहीत. म्हणून स्वतःच्या मालकीच्या वस्तू असण्यात काही गैर नाही. पण या जगातील वस्तूंशी आपले मन घट्ट जडणेही अगदी सामान्य आहे. आपल्याला कितीतरीदा अधिकाधिक वस्तू हव्या असतात आणि आणखी ‘वस्तू’ मिळाल्या की आपण सुखी होऊ, या भ्रमाच्या सापळ्यात आपण अडकतो. हे खरे नाही, हे आपल्याला मनोमन माहीत असते. तरीही अधिक पैसा आणि मालमत्ता मिळाली की आपले समाधान होईल, अशा समजुतीने आपण वागतो आणि पुन्हा त्याच सापळ्यात अडकतो. एका जुन्या रोमन धर्मशिक्षण ग्रंथात म्हटल्याप्रमाणे, “ज्याच्याजवळ पैसा आहे, त्याला तो कधीच पुरेसा वाटत नाही.”
या जगात राहताना इथल्या वस्तूंच्या आहारी न जाण्याचे जे स्पष्ट पाचारण तुम्हाला मिळाले आहे, त्यावर आज चिंतन करा. पवित्र जीवन जगण्यासाठी आणि तुमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी मालमत्ता हे केवळ एक साधन आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे गरजेपुरते असेल; पण त्याचबरोबर अतिरेक टाळण्याचा आणि विशेषतः ऐहिक मालमत्तेत मन न गुंतवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.
हे प्रभू, माझ्याजवळ जे काही आहे आणि माझ्या मालकीचे जे काही आहे, त्या सर्वाचा मी स्वेच्छेने त्याग करतो. हे सर्व मी आध्यात्मिक यज्ञ म्हणून तुला अर्पण करतो. माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व स्वीकार आणि त्याचा उपयोग केवळ तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला मदत कर. ही आसक्ती सोडताना, तू माझ्यासाठी ठेवलेली खरी संपत्ती मला सापडू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत – संत जॉन युड्स




