मराठी

राखेचा बुधवार – प्रार्थना करा, उपवास करा, दान द्या

26 फेब्रुवारी 2020
राखेचा बुधवार

आजची वाचने

“आणि गुप्तपणे केलेले पाहणारा तुझा पिता तुला प्रतिफळ देईल.”  मत्तय 6:4b

प्रायश्चित्तकाळ सुरू होतो. प्रार्थना करण्यासाठी, उपवास करण्यासाठी आणि देव व शेजारी यांच्यावरील प्रेमात वाढण्यासाठी हे 40 दिवस आहेत. थोडे थांबून आपल्या जीवनाचे पुन्हा परीक्षण करण्यासाठी, आपल्या पापांपासून दूर वळण्यासाठी आणि देव आपल्याला ज्या सद्गुणांचे दान देण्यास इतका उत्सुक आहे, त्या सद्गुणांत वाढण्यासाठी दरवर्षी आपल्याला या काळाची गरज असते. प्रायश्चित्तकाळातील हे 40 दिवस म्हणजे येशूने वाळवंटात घालवलेल्या 40 दिवसांचे अनुकरण करण्याचा काळ आहे. खरे तर, वाळवंटातील येशूच्या जीवनाचे केवळ “अनुकरण” करण्यासाठी नव्हे, तर हा काळ त्याच्याबरोबर, त्याच्यामध्ये आणि त्याच्याद्वारे जगण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे.

अधिक पवित्र होण्यासाठी येशूला स्वतः वाळवंटात 40 दिवस उपवास व प्रार्थना करण्याची गरज नव्हती. तो स्वतः पावित्र्यस्वरूप आहे! तो देवाचा पवित्र जन आहे. तो परिपूर्णतास्वरूप आहे. तो परमपवित्र त्रैक्यातील दुसरी दैवी व्यक्ती आहे. तो देव आहे. तरीही येशू उपवास व प्रार्थना करण्यासाठी वाळवंटात गेला. त्या 40 दिवसांचे दुःख सहन करताना त्याने आपल्या मानवी स्वभावात जे गुण प्रकट केले, ते आपल्याही जीवनात परिवर्तन घडवू शकतात. ते गुण आत्मसात करण्यासाठी आणि त्याच्याबरोबर राहण्यासाठी तो आपल्याला आमंत्रण देतो. आपल्या प्रभूबरोबर वाळवंटात 40 दिवस घालवण्यास तुम्ही तयार आहात का?

वाळवंटात असताना येशूने आपल्या मानवी स्वभावातील सर्व परिपूर्ण गुण प्रकट केले. स्वर्गातील पित्याशिवाय हे इतर कोणीही पाहिले नाही, तरी त्याचा वाळवंटातील काळ संपूर्ण मानवजातीसाठी विपुल फलदायी ठरला. तो आपल्यापैकी प्रत्येकासाठी विपुल फलदायी ठरला.

ज्या “वाळवंटात” प्रवेश करण्यासाठी आपल्याला पाचारण केले आहे, ते आपल्या आसपासच्या लोकांच्या नजरेआड असले तरी स्वर्गातील पित्याला दिसते. ते “गुप्त” आहे, कारण दिखावा करण्यासाठी, स्वार्थापोटी नाव कमावण्यासाठी किंवा जगाची वाहवा मिळवण्यासाठी आपण सद्गुणांत वाढत नाही. ज्या 40 दिवसांच्या वाळवंटात आपण प्रवेश करायचा आहे, ते आपल्याला अधिक सखोल प्रार्थनेकडे नेते, देवाशी ज्याचा संबंध नाही अशा सर्व गोष्टींची आसक्ती सोडायला शिकवते आणि रोज भेटणाऱ्या लोकांबद्दल आपल्या मनात प्रेम भरते. अशा रीतीने ते आपल्यात परिवर्तन घडवते.

या 40 दिवसांत आपण प्रार्थना केली पाहिजे. खऱ्या अर्थाने प्रार्थना करणे म्हणजे अंतःकरणात देवाशी संवाद साधणे. मिस्साला उपस्थित राहणे किंवा मोठ्याने प्रार्थना म्हणणे एवढ्यावरच आपण थांबत नाही. प्रार्थना ही सर्वप्रथम देवाशी अंतःकरणात साधलेला गुप्त संवाद आहे. आपण बोलतो, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपण लक्ष देऊन ऐकतो, देवाचे म्हणणे ग्रहण करतो, ते समजून घेतो आणि त्याला प्रतिसाद देतो. या चारही गोष्टी नसतील तर प्रार्थना ही प्रार्थना राहत नाही. तो “संवाद” ठरत नाही. ते केवळ आपण स्वतःशी केलेले बोलणे ठरते.

या 40 दिवसांत आपण उपवास केला पाहिजे. विशेषतः आजच्या काळात सततची धावपळ आणि गोंगाट यांचा आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांवर मारा होत असतो. टीव्ही, रेडिओ, संगणक वगैरेंच्या झगमगाटाने आणि आवाजाने आपले डोळे व कान अनेकदा दिपून जातात. रुचकर पदार्थ, मिठाया आणि मनाला सुखावणारे आवडते पदार्थ यांनी आपण सतत जिभेचे चोचले पुरवतो; अनेकदा त्याचा अतिरेकही होतो. देवाशी एकरूप होऊन जगण्यातला अधिक खोल आनंद अनुभवण्यासाठी जगातील सुखांच्या या सततच्या माऱ्यापासून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना थोडी विश्रांती हवी आहे.

या 40 दिवसांत आपण दान दिले पाहिजे. लोभाची पकड आपल्यावर किती घट्ट झाली आहे, हे अनेकदा आपल्याला कळतही नाही. आपल्याला हेही हवे असते आणि तेही हवे असते. आपण अधिकाधिक भौतिक वस्तूंचा उपभोग घेतो. कारण आपण जगात समाधान शोधतो. जे काही आपले लक्ष देवापासून दूर नेते, त्या सर्वांची आसक्ती आपण सोडली पाहिजे. ही आसक्ती सोडण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे उदारता.  

आज या तीन साध्या गोष्टींवर चिंतन करा: प्रार्थना करा, उपवास करा आणि दान द्या. या प्रायश्चित्तकाळात या गोष्टी अशा रीतीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करा की त्या फक्त देवाला ठाऊक असतील. तुम्ही असे केले, तर तुमच्या जीवनात जे घडणे शक्य आहे असे आज तुम्हाला वाटते, त्याहूनही अद्भुत गोष्टी प्रभू घडवू लागेल. आपल्याला अनेकदा जखडून ठेवणाऱ्या स्वार्थातून तो तुम्हाला मुक्त करील आणि त्याच्यावर व इतरांवर नव्या रीतीने, अधिक खोलवर प्रेम करण्यास तुम्हाला समर्थ करील.

हे प्रभू, या प्रायश्चित्तकाळात मी स्वतःला तुला अर्पण करतो. या 40 दिवसांच्या वाळवंटात प्रवेश करण्याचा निर्णय मी स्वेच्छेने घेतो. आजवर कधी केली नाही इतकी प्रार्थना करण्याचा, उपवास करण्याचा आणि स्वतःचे दान देण्याचा मी निश्चय करतो. या प्रायश्चित्तकाळात तू माझ्या अंतःकरणात परिवर्तन घडवावे, अशी मी प्रार्थना करतो. हे प्रिय प्रभू, तुझ्यावर आणि इतरांवर संपूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्यापासून मला जे काही अडवते, त्या सर्वांपासून मला मुक्त कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रूसाच्या पायथ्याशी 40 दिवस:
आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ नजर

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय


प्रायश्चित्तकाळासाठी तीन उत्तम पुस्तके
ऑनलाइन मोफत वाचा.  ई-पुस्तक & मऊ मुखपृष्ठाच्या छापील आवृत्तीतही उपलब्ध.

प्रायश्चित्तकाळ आणि पुनरुत्थानकाळातील चिंतन
कॅथलिक दैनिक चिंतनमाला

क्रुसाच्या पायथ्याशी ४० दिवस
आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ दृष्टी

दैवी दयेवरील दैनिक चिंतन
संत फौस्तिनासोबत ३६५ दिवस

प्रायश्चित्तकाळासाठी आणखी पुस्तके पाहा