27 फेब्रुवारी 2020
राखेच्या बुधवारनंतरचा गुरुवार
आजची वाचने

“एखाद्या माणसाने सारे जग मिळवले, पण स्वतःचाच नाश करून घेतला किंवा स्वतःलाच गमावले, तर त्याला काय लाभ?” लूक 9:25
अनेक लोक लॉटरी जिंकण्याचे स्वप्न पाहतात. बहुतेकदा लाखो डॉलर्स जिंकण्याचे ते स्वप्न असते. कल्पना करा, एका क्षणात तुम्ही कोट्यधीश किंवा अब्जाधीश झालात, तर काय कराल? तुम्हीही अशी दिवास्वप्ने पाहता का?
असे असेल, तर वरच्या प्रश्नावर विचार करायला हवा. तुम्ही आजवरची सर्वांत मोठी लॉटरी जिंकली आणि पृथ्वीवरचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती झालात, पण तुमच्या जीवनात देवाची कृपा नाही आणि तुमच्याजवळ श्रद्धाही नाही, तर त्याचा काय उपयोग? अफाट संपत्ती आणि सारे जग मिळवण्यासाठी तुम्ही तुमची श्रद्धा सोडून द्याल का? बहुधा अनेक जण तसे करतील; नाहीतर येशूने हा प्रश्न विचारलाच नसता.
जीवनात अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देतो. शाश्वत परिपूर्णतेपेक्षा तात्काळ मिळणारे सुख आणि समाधान आपण शोधतो. शाश्वत जीवन डोळ्यांसमोर ठेवून जगणे अनेकांना कठीण जाते.
काही जण म्हणतील, “मी तर दोन्ही निवडतो! मला सारे जगही हवे आणि माझ्या आत्म्याचे तारणही हवे!” पण येशूच्या प्रश्नामागे हे गृहीत आहे की आपल्याला दोन्ही मिळू शकत नाहीत. यांपैकी कशासाठी प्रयत्न करायचे, हे आपण ठरवले पाहिजे. श्रद्धेचे जीवन आणि आपल्या आत्म्यांचे तारण निवडायचे असेल, तर या जगातल्या अनेक गोष्टी सोडून द्याव्या लागतात. देवाने आपल्याला या जगात भरभरून दिले, तरी आपण असे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपल्या शाश्वत तारणासाठी किंवा इतरांच्या तारणासाठी ते हिताचे ठरले, तर ते सर्व “सोडून द्यायला” आपण मनापासून तयार असू. हे करणे कठीण आहे आणि त्यासाठी देवावर अत्यंत गाढ प्रेम असावे लागते. पावित्र्याच्या मार्गावर चालणे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाचे आहे, अशी आपल्या अंतःकरणात खोलवर खात्री असली पाहिजे.
आज येशूच्या या खोल अर्थ असलेल्या प्रश्नावर चिंतन करा. तो हा प्रश्न तुम्हालाच विचारत आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही काय उत्तर द्याल? देवाला आणि त्याच्या अपार दयेला तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवण्यास संकोच करू नका. आपल्या अंतःकरणातील सर्वांत मूलभूत इच्छा आणि ध्येय यांचा गांभीर्याने विचार करण्यासाठी वर्षातील सर्वांत अनुकूल काळांपैकी एक म्हणजे उपवासकाळ. सर्व गोष्टींपेक्षा देवाला प्राधान्य द्या. या निवडीबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल.
हे प्रभू, आम्ही या उपवासकाळात प्रवेश करत असताना, माझ्या जीवनात मी कशाला प्राधान्य देतो, हे पाहण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. माझ्या जीवनाला चालना देणारी सर्वांत मूलभूत आणि मध्यवर्ती प्रेरणा कोणती आहे, हे प्रामाणिकपणे ओळखण्यास मला मदत कर. सर्व गोष्टींपेक्षा तुझी निवड करण्यास मला मदत कर, म्हणजे माझ्या जीवनातील सर्व गोष्टी तुझ्या पवित्र इच्छेनुसार घडाव्यात म्हणून तू मला साहाय्य करशील. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
क्रुसाच्या पायाशी 40 दिवस: पहिले चिंतन – आईचे प्रेम
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य





