मराठी

नाकारले जाण्याचे रूपांतर

13 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळातील दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

बांधणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला आहे.  मत्तय 21:42

युगानुयुगे अनेकांना नाकारले गेले आहे; पण या सगळ्यांत एक प्रसंग ठळकपणे उठून दिसतो. तो म्हणजे देवाच्या पुत्राला नाकारले जाणे. येशूच्या हृदयात निर्मळ आणि परिपूर्ण प्रेमाशिवाय दुसरे काहीही नव्हते. ज्यांची ज्यांची त्याच्याशी भेट झाली, त्या प्रत्येकाचे सर्वोत्तम हित व्हावे, अशी त्याची इच्छा होती. त्याच्या जीवनाचे दान स्वीकारायला जो कोणी तयार होता, त्याला ते द्यायला येशू तयार होता. अनेकांनी ते स्वीकारले, तरी अनेकांनी ते नाकारलेही.

नाकारले गेल्यामुळे येशूला किती खोल वेदना आणि दुःख सहन करावे लागले, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्यक्ष क्रुसावर खिळले जाणे तर निःसंशय अतिशय वेदनादायक होते. पण इतक्या लोकांनी त्याला नाकारल्यामुळे त्याच्या हृदयाला जी जखम झाली, तिची वेदना सर्वांत तीव्र होती आणि तिच्यामुळेच त्याला सर्वाधिक दुःख सहन करावे लागले.

अशा प्रकारे दुःख सोसणे ही दुर्बलतेची नव्हे, तर प्रेमाची कृती होती. येशूच्या अंतरीचे दुःख अहंकारातून आले नव्हते, किंवा स्वतःबद्दल त्याला कमीपणा वाटत होता म्हणूनही ते आले नव्हते. उलट, त्याचे प्रेम इतके गहिरे होते म्हणून त्याचे हृदय दुखावले. आणि ते प्रेम नाकारले गेले तेव्हा, धन्यवचनांत सांगितलेल्या पवित्र दुःखाने त्याचे हृदय भरून गेले («जे शोक करतात ते धन्य…» मत्तय 5:4). हे दुःख म्हणजे निराशा नव्हती; दुसऱ्या व्यक्तीचे प्रेम गमावल्याची ती खोल अनुभूती होती. ते दुःख पवित्र होते आणि सर्वांवरच्या त्याच्या उत्कट प्रेमातून जन्मले होते.

आपल्याला नाकारले जाते तेव्हा मनात उठणाऱ्या वेदनेचा अर्थ लावणे कठीण जाते. आपल्या मनातील दुखावलेपण आणि राग यांचे रूपांतर «पवित्र दुःखात» होऊ देणे फार कठीण असते. पण असे दुःख आपल्याला ज्यांच्यासाठी आपण शोक करतो त्यांच्यावर अधिक गहिरे प्रेम करण्याची प्रेरणा देते. हे कठीण असले, तरी आपल्या प्रभूने नेमके हेच केले. येशूच्या या कृतीतून जगाचे तारण झाले. कल्पना करा, येशूने सरळ हार मानली असती तर? त्याला अटक झाली तेव्हा त्याने असंख्य देवदूतांना आपल्या सुटकेसाठी बोलावले असते तर? «या लोकांसाठी इतके करण्याची काहीच गरज नाही!» असा विचार करून त्याने तसे केले असते तर? मग त्याच्या मृत्यूने आणि पुनरुत्थानाने मिळालेले तारणाचे शाश्वत दान आपल्याला कधीच लाभले नसते. दुःखाचे प्रेमात रूपांतर झाले नसते.

आज या गहन सत्यावर चिंतन करा: नाकारले जाणे ही दुष्टतेविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला लाभलेल्या सर्वांत मोठ्या देणग्यांपैकी एक ठरू शकते. ती तशी «ठरू शकते», कारण शेवटी आपण त्याला कसा प्रतिसाद देतो, यावर सारे अवलंबून आहे. «पित्या, त्यांना क्षमा कर; ते काय करतात हे त्यांना कळत नाही,» अशी आर्त हाक देऊन येशूने परिपूर्ण प्रेमाने प्रतिसाद दिला. त्याला सर्वांत कठोरपणे नाकारले गेले, त्याच वेळी केलेल्या या परिपूर्ण प्रेमाच्या कृतीमुळे तो ख्रिस्तसभेची «कोनशिला» आणि म्हणूनच नवजीवनाची कोनशिला झाला! या प्रेमाचे अनुकरण करण्यास आणि केवळ क्षमाच नव्हे, तर दयेतून व्यक्त होणारे पवित्र प्रेमही देण्याच्या त्याच्या सामर्थ्यात सहभागी होण्यास आपल्याला बोलावले आहे. आपण असे केले, तर ज्यांना प्रेमाची आणि कृपेची सर्वाधिक गरज आहे, त्यांच्यासाठी आपणही प्रेमाची आणि कृपेची कोनशिला होऊ.

हे प्रभू, मला ती कोनशिला होण्यास मदत कर. प्रत्येक वेळी माझे मन दुखावले जाते तेव्हा मला केवळ क्षमा करायलाच नव्हे, तर त्याबदल्यात प्रेम आणि दयाही दाखवायला मदत कर. तू या प्रेमाचे दैवी आणि परिपूर्ण उदाहरण आहेस. याच प्रेमात मला सहभागी होऊ दे, म्हणजे तुझ्याबरोबर मलाही आर्तपणे म्हणता येईल, «पित्या, त्यांना क्षमा कर; ते काय करतात हे त्यांना कळत नाही.» हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस – सोळावे चिंतन – सर्वांत मोठा चमत्कार

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय