मराठी

पित्याचे अढळ प्रेम

14 मार्च 2020
प्रायश्चित्तकाळाच्या दुसऱ्या आठवड्यातील शनिवार
आजची शास्त्रवाचने

“लवकर, सर्वांत उत्तम झगा आणा आणि त्याला घाला. त्याच्या बोटात अंगठी घाला आणि पायांत पादत्राणे घाला. पुष्ट केलेले वासरू आणा आणि कापा. मग आपण मेजवानी करून आनंद साजरा करूया. कारण माझा हा मुलगा मेला होता आणि पुन्हा जिवंत झाला आहे; तो हरवला होता आणि आता सापडला आहे.” मग त्यांनी आनंदोत्सव सुरू केला.  लूक 15:22–24

उधळ्या पुत्राच्या या परिचित कथेत, आपल्या पित्याकडे परतण्याचा निर्णय घेण्यात मुलाचे धैर्य दिसते.  अगतिकतेपोटीच तो मुख्यतः परतला, तरीही त्याचे परतणे महत्त्वाचे आहे.  होय, तो नम्रपणे आपल्या चुका कबूल करतो आणि आपल्याला क्षमा करावी व आपल्या मजुरांपैकी एकाप्रमाणे वागवावे, अशी विनंती पित्याला करतो.  पण तो परतला, हे महत्त्वाचे!  आता प्रश्न असा आहे: “तो का परतला?”

मुलगा पित्याकडे परतला, याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या पित्याचा चांगुलपणा तो मनोमन जाणत होता, असे म्हणणे योग्य ठरेल.  त्याचा पिता खरोखरच चांगला होता.  मुलाच्या आयुष्यभर त्याने त्याच्यावर प्रेम केले होते आणि त्याची काळजी घेतली होती.  मुलाने पित्याला नाकारले, तरी पित्याचे आपल्यावर प्रेम आहे हे त्याला नेहमीच माहीत होते.  ही जाणीव आपल्या मनात किती खोलवर रुजली होती, याची कदाचित त्यालाही कल्पना नव्हती.  पण मनातली हीच खात्री त्याला पित्याच्या न संपणाऱ्या प्रेमाची आशा बाळगून त्याच्याकडे परतण्याचे धैर्य देऊन गेली.

यातून दिसते की खरे प्रेम कधीच व्यर्थ जात नाही.  त्याचा परिणाम नेहमीच होतो.  आपण देऊ केलेले पवित्र प्रेम कोणी नाकारले, तरी त्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होतोच.  खऱ्या, निरपेक्ष प्रेमाकडे दुर्लक्ष करणे कठीण असते आणि ते झिडकारणेही कठीण असते.  मुलाला हे उमगले; आपल्यालाही ते उमगले पाहिजे.  

प्रार्थनेत थोडा वेळ घालवून त्या पित्याच्या अंतःकरणाचे चिंतन करा.  त्याला किती वेदना झाल्या असतील, याचा विचार करूया; पण मुलगा परत येईल अशी आशा तो सतत बाळगून होता, हेही लक्षात घेऊया.  आपला मुलगा परत येताना दुरून दिसताच पित्याच्या अंतःकरणात कसा आनंद ओसंडून आला असेल, याचे चिंतन करूया.  तो मुलाकडे धावत गेला, त्याची नीट काळजी घेण्याची आज्ञा दिली आणि त्याच्यासाठी मेजवानी दिली.  मावेनाशा झालेल्या प्रेमाची ही सारी चिन्हे आहेत.

स्वर्गातील पिता आपल्यापैकी प्रत्येकावर असेच प्रेम करतो.  तो रागीट किंवा कठोर देव नाही.  आपल्याला पुन्हा जवळ घेण्याची आणि आपल्याशी समेट करण्याची त्याला आस आहे.  गरजेच्या वेळी आपण त्याच्याकडे वळतो, त्या क्षणी त्याला आनंद साजरा करावासा वाटतो.  आपल्या मनात शंका असल्या, तरी त्याला आपल्या प्रेमाची पूर्ण खात्री आहे. तो नेहमीच आपली वाट पाहत असतो, आणि हे आपण सगळे मनोमन जाणतो.

स्वर्गातील पित्याशी समेट करण्याचे महत्त्व काय आहे, यावर आज चिंतन करा.  समेटाचा संस्कार स्वीकारण्यासाठी प्रायश्चित्तकाळ हा उत्तम काळ आहे.  या कथेत जे घडते, तेच या संस्कारात घडते.  आपण आपले पाप घेऊन पित्याकडे जातो, आणि तो आपल्यावर आपल्या दयेचा वर्षाव करतो.  पापांची कबुली देण्यास जाण्याची भीती किंवा धाक वाटू शकतो. पण प्रामाणिकपणे आणि मनापासून आपण हा संस्कार स्वीकारला, तर आपल्याला एक आनंददायी आश्चर्य अनुभवायला मिळेल.  देव आपल्याकडे धावत येईल, आपली ओझी उचलेल आणि ती मागे टाकील.  समेटाच्या संस्काराची ही अद्भुत देणगी स्वीकारल्याशिवाय हा प्रायश्चित्तकाळ जाऊ देऊ नका.

हे पित्या, मी पाप करतो, हे मी कबूल करतो.  मी तुझ्यापासून दूर गेलो आणि मनाला येईल तसे वागलो.  आता उघड्या आणि प्रामाणिक अंतःकरणाने तुझ्याकडे परतण्याची वेळ आली आहे.  समेटाच्या संस्कारात तुझे प्रेम स्वीकारण्यासाठी मला धैर्य दे.  तुझ्या अढळ आणि परिपूर्ण प्रेमाबद्दल मी तुझे आभार मानतो.  हे स्वर्गातील पित्या, हे पवित्र आत्म्या आणि हे माझ्या प्रभू येशू, माझा तुमच्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायाशी 40 दिवस – सतरावे चिंतन – यरुशलेममध्ये प्रवेश.

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय