मराठी

हे पवित्र आत्म्या, ये!

19 मे 2020
पुनरुत्थानकाळातील सहाव्या आठवड्याचा मंगळवार
आजची शास्त्रवाचने

“पण मी तुम्हाला खरे सांगतो, मी जाणे तुमच्या हिताचे आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. पण मी गेलो, तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.”  योहान 16:7

प्रेषितांच्या मनात द्वंद्व होते. त्यांची अंतःकरणे दुःखाने भरून गेली होती, तरीही येशूने त्यांना जे सांगितले त्यावर विश्वास ठेवण्याचा ते प्रयत्न करत होते. आपण आपल्या पित्याकडे जात आहोत आणि आपले जाणे त्यांच्या हिताचे आहे, असे येशूने त्यांना सांगितले. का? कारण तो गेला तर पवित्र आत्म्याला त्यांच्याकडे पाठवील.

मानवी दृष्टीने पाहता, येशूचा रोजचा सहवास संपणार हे स्वीकारणे प्रेषितांना फार कठीण गेले असेल. येशूला आपल्या डोळ्यांनी पाहण्याची, त्याला स्पर्श करण्याची आणि त्याची वाणी ऐकण्याची उणीव त्यांना नक्कीच भासली. पण आपण जात असलो तरी सदैव त्यांच्याबरोबर राहू, हे येशूने स्पष्ट केले. त्यांना मार्ग दाखवण्यासाठी, धैर्य देण्यासाठी आणि संपूर्ण सत्य शिकवण्यासाठी तो त्यांच्यावर पवित्र आत्माही पाठवणार होता. यापुढे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांच्याद्वारे येशू जगात उपस्थित राहणार होता.

प्रेषितांनी येशूला जसे पाहिले, तसे पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले नाही. पण त्यांच्याप्रमाणेच येशू सदैव आपल्याबरोबर असण्याचे भाग्य आपल्यालाही लाभले आहे. पवित्र आत्म्याला त्याच्या पूर्णतेने स्वीकारण्याचे भाग्यही आपल्याला लाभले आहे. ही चांगली गोष्ट आहे, फारच चांगली. पण अनेकदा या देणगीकडे आपले लक्ष जात नाही. आपण दृढीकरणाचा संस्कार स्वीकारला असेल, तरीही पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात येऊ देण्यात आणि आपले जीवन बदलू देण्यात आपण कमी पडू शकतो.

दोन आठवडे पूर्ण होण्याआधीच आपण पेन्टेकॉस्टचा महासण साजरा करू. येशूने दिलेले हे वचन पूर्ण झाले, याचा हा वार्षिक उत्सव आहे. पवित्र आत्मा आला आहे आणि आता आपण पवित्र आत्म्याच्या युगात जगत आहोत, याचे स्मरण आपण त्या दिवशी करतो.

आज आणि येत्या दोन आठवड्यांत पवित्र आत्म्याविषयी चिंतन करा. तुमच्या जीवनात पवित्र आत्म्याची उपस्थिती अधिक जिवंत होऊ देण्याची गरज असेल, तर ते स्वतःशी नम्रपणे कबूल करा. तुम्ही पवित्र आत्म्याला त्याच्या पूर्णतेने स्वीकारावे, अशी येशूची इच्छा आहे, यावर विश्वास ठेवा. आणि पवित्र आत्म्याशी हे ऐक्य घडू द्यायला भिऊ नका.

हे पवित्र आत्म्या, कृपा करून माझ्याकडे ये. माझ्या जीवनात तुझ्या उपस्थितीची ज्योत अधिक तेजाने पेटवायला मला मदत कर. येशूने ज्याचे वचन दिले, त्या तुला तुझ्या पूर्णतेने मला स्वीकारता येवो. हे पवित्र आत्म्या, हे दैवी येशू, हे दयाळू पित्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे.

पवित्र आत्म्याची नोवेना
पेन्टेकॉस्टच्या तयारीसाठी केली जाणारी प्रार्थना
शुक्रवार, 22 मेपासून सुरू

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

 


तू मला येऊ दिलेस तर मी तुझ्या जीवनात येऊ शकतो
आध्यात्मिक चिंतन