(टीप: काही धर्मप्रांतांत कॉर्पस ख्रिस्ती हा महासण आज साजरा केला जातो. अमेरिकेत कॉर्पस ख्रिस्ती हा महासण रविवारी साजरा केला जातो.)
11 जून 2020
सामान्य काळातील दहाव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

“तुझ्या फिर्यादीबरोबर न्यायालयात जात असतानाच त्याच्याशी लवकर समेट कर. नाहीतर तुझा फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हवाली करील, न्यायाधीश तुला पहारेकऱ्याच्या हवाली करील, आणि तुला तुरुंगात टाकले जाईल. आमेन, मी तुला सांगतो, शेवटची पै चुकती केल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही.” मत्तय 5:25-26
किती भीतीदायक विचार आहे हा! पहिल्यांदा ऐकताना या कथेत दयेचा लवलेशही नाही, असे वाटू शकते. “शेवटची पै चुकती केल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही.” पण प्रत्यक्षात ही मोठ्या प्रेमाची कृती आहे.
इथे महत्त्वाची गोष्ट अशी की, आपण त्याच्याशी आणि एकमेकांशी समेट करावा, अशी येशूची इच्छा आहे. विशेषतः, आपल्या अंतःकरणातून सर्व राग, कटुता आणि मनात धरलेला आकस नाहीसा व्हावा, असे त्याला वाटते. म्हणूनच तो म्हणतो, “तुझ्या फिर्यादीबरोबर न्यायालयात जात असतानाच त्याच्याशी लवकर समेट कर.” म्हणजेच, दैवी न्यायाच्या आसनासमोर उभे राहण्याची वेळ येण्यापूर्वी क्षमा मागा आणि समेट करा.
आपण नम्र होऊन आपल्या चुकांबद्दल क्षमा मागतो आणि त्या चुका सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा देवाच्या न्यायाची पूर्ण पूर्तता होते. असे केल्यावर प्रत्येक “पै” आधीच चुकती झालेली असते. पण आपला हट्टीपणा देवाला मान्य नाही. हट्टीपणा हे गंभीर पाप आहे. तो सोडल्याशिवाय त्या पापाची क्षमा मिळू शकत नाही. एखाद्या वादात आपली चूक मान्य करण्यास हट्टाने नकार देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. तसेच, आपले वर्तन बदलण्यास हट्टाने नकार देणे हीदेखील फार गंभीर बाब आहे.
याची शिक्षा अशी की, जोपर्यंत आपण पश्चात्ताप करून देवाकडे वळत नाही, तोपर्यंत देव आपल्यावर आपला न्याय लागू करील. ही देवाच्या प्रेमाची आणि दयेची कृती आहे, कारण त्याच्या न्यायाचा रोख विशेषतः आपल्या पापावर असतो. देवावर आणि इतरांवर प्रेम करण्याच्या आड येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आपले पाप.
शेवटची पै चुकती करणे ही शुद्धिस्थानाची प्रतिमाही मानता येईल. येशू आपल्याला सांगतो की, आपण आत्ताच आपले जीवन बदलावे, आत्ताच क्षमा करावी आणि पश्चात्ताप करून देवाकडे वळावे. तसे केले नाही, तर मृत्यूनंतरही आपल्याला त्या पापांना सामोरे जावे लागेल. पण ते आत्ताच करणे कितीतरी चांगले आहे.
आज “तुझ्या फिर्यादीशी समेट कर” हे वचन तुमच्या कोणत्या वादाला लागू होते, यावर चिंतन करा. तुमचा विरोधक कोण आहे? आज तुमच्या मनात कोणाविषयी तक्रार आहे? खऱ्या स्वातंत्र्याचा आनंद तुम्हाला घेता यावा म्हणून, या ओझ्यातून मुक्त होण्याचा मार्ग देवाने तुम्हाला दाखवावा, अशी प्रार्थना करा!
हे प्रभू, क्षमा करण्यास आणि झालेल्या गोष्टी विसरण्यास मला मदत कर. तुझ्यावर आणि माझ्या सर्व शेजाऱ्यांवर पूर्णपणे प्रेम करण्याच्या आड जे काही येते, ते ओळखण्यास मला मदत कर. हे प्रभू, माझे हृदय शुद्ध कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
येशूच्या पवित्र हृदयाची नोव्हेना
नोव्हेनाचा कालावधी: १०–१८ जून २०२०
१९ जून २०२०: येशूच्या पवित्र हृदयाचा महोत्सव
आजचे संत – संत बर्णबा प्रेषित
ख्रिस्ताच्या परमपवित्र शरीर आणि रक्ताचा महासण
चित्र: फ्रा आंजेलिको यांचे ‘अंतिम न्याय’




