16 नोव्हेंबर 2020
सामान्य काळातील तेहतीसाव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने
स्कॉटलंडची संत मार्गारेट—ऐच्छिक स्मरणदिन
संत गर्ट्रूड महान, कुमारी—ऐच्छिक स्मरणदिन

तो आणखी मोठ्याने हाक मारत राहिला, “दावीदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर!” लूक 18:39c
शाबास त्याची! या आंधळ्या भिकाऱ्याला अनेक जण वाईट वागणूक देत असत. जणू तो काही कामाचा नाही आणि पापी आहे, अशा रीतीने ते त्याच्याशी वागत. येशूकडे दया मागण्यासाठी त्याने हाक मारायला सुरुवात केली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याला गप्प बसायला सांगितले. पण त्या आंधळ्या माणसाने काय केले? त्यांच्या दबावाला आणि थट्टेला तो बळी पडला का? मुळीच नाही. उलट, “तो आणखी मोठ्याने हाक मारत राहिला!” येशूने त्याचा विश्वास पाहिला आणि त्याला बरे केले.
या माणसाच्या जीवनातून आपल्या सर्वांना एक मोलाचा धडा मिळतो. जीवनात अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागते, ज्या आपल्याला खचवतात, आपला धीर खच्ची करतात आणि निराशेला शरण जाण्याचा मोह पाडतात. अनेक गोष्टींचा आपल्यावर जाचक दबाव येतो आणि त्यांना तोंड देणे कठीण जाते. मग आपण काय करावे? संघर्षापुढे हार मानून स्वतःची कीव करत बसावे का?
आपण काय करावे, याचा उत्तम आदर्श हा आंधळा माणूस आपल्यासमोर ठेवतो. आपल्याला दबलेले, खचलेले किंवा वैतागलेले वाटते, आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटते, किंवा अशाच इतर भावना मनात येतात, तेव्हा आपण ती संधी मानून अधिक कळकळीने आणि धैर्याने येशूकडे वळावे आणि त्याची दया मागावी.
जीवनातील अडचणींचा आपल्यावर दोनपैकी एक परिणाम होऊ शकतो. एकतर त्या आपल्याला खचवतात किंवा अधिक खंबीर बनवतात. देवाच्या दयेवरचा आपला भरवसा वाढवून आणि त्या दयेवर अधिक विसंबून राहायला शिकवून त्या आपल्या आत्म्याला खंबीर बनवतात.
आज तुम्हाला सर्वांत जास्त खचवणाऱ्या गोष्टीचा विचार करा. कोणत्या गोष्टीचा जाच तुम्हाला जाणवतो आणि कशाला तोंड देणे तुम्हाला कठीण जाते? त्या संघर्षाचा उपयोग देवाची दया आणि कृपा आणखी कळकळीने आणि उत्कटतेने मागण्याची संधी म्हणून करा.
हे प्रभू, माझ्या दुर्बलतेत आणि संघर्षात आणखी कळकळीने तुझ्याकडे वळायला मला मदत कर. जीवनात दुःख आणि वैफल्याचे प्रसंग येतात, तेव्हा तुझ्यावर अधिक विसंबून राहायला मला मदत कर. या जगातील दुष्टपणा आणि कठोरपणा यांमुळे प्रत्येक बाबतीत तुझ्याकडे वळण्याचा माझा निर्धार अधिक दृढ होवो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आजचे संत –स्कॉटलंडची संत मार्गारेट तसेच संत गर्ट्रूड महान, कुमारी




