मराठी

देवाच्या परिपालनावर विसंबून राहणे

11 जुलै 2021
सामान्य काळातील पंधरावा रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

व्हिडिओ

त्याने त्यांना सांगितले की प्रवासासाठी हातातल्या काठीशिवाय काहीही घेऊ नका—अन्न नको, झोळी नको, कमरेच्या पट्ट्यात पैसेही नकोत.  मार्क 6:8

तुमच्या जीवनातल्या अगदी लहानसहान गोष्टींचीही देव काळजी घेतो का?  तुम्हाला योग्य अन्न आणि निवारा मिळावा, याची त्याला काळजी आहे का?  तुम्हाला भावनिक, भौतिक आणि आध्यात्मिक आधार मिळावा, याचीही त्याला काळजी आहे का?  हो, नक्कीच आहे!

देव आपली किती पूर्णपणे काळजी घेतो, हे कधी कधी आपल्या लक्षात येत नाही.  रोजच्या विवंचनांमुळे निर्माण होणाऱ्या भीतीत आणि चिंतेत आपण गुरफटून जाऊ शकतो.  उद्यासाठी, किंवा अगदी आजसाठीही, आपल्याकडे पुरेसे असेल की नाही, अशी काळजी आपल्याला वाटू शकते.  नातेसंबंध, भावना, भौतिक गरजा, आध्यात्मिक बळ अशा जीवनाच्या सर्व अंगांबद्दल ही चिंता आपल्याला भेडसावू शकते.  

एक गोष्ट आपण निःसंशयपणे जाणून घेतली पाहिजे: देवाचे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते.  त्याला सर्व काही माहीत आहे आणि तो आपल्यावर इतके पूर्ण प्रेम करतो की तो आपल्याला कधीही सोडून देणार नाही.  परिपूर्ण आणि फलदायी जीवन जगण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, त्यांची उणीव तो आपल्याला कधीही पडू देणार नाही.

तुम्हाला हे पटते का?  कधीकधी यावर विश्वास ठेवणे कठीण जाते.  कधीकधी आपण इतके गलबलून जातो की सगळे काही आपण स्वतःच सांभाळले पाहिजे, असे आपल्याला वाटते.  आपली सर्व शक्ती आणि सर्व गुण देवाला अर्पण करण्याचे आवाहन आपल्याला आहे, हे खरे आहे. अशा रीतीने देव आपल्याला आपल्या सेवेत घेऊ शकतो आणि आपल्याद्वारे कार्य करू शकतो.  पण शेवटी आपली काळजी घेणारा देवच आहे आणि आपल्या प्रत्येक गरजेकडे सर्वांत जास्त लक्ष त्याचेच असते, हे आपण कधीही विसरू नये.  

आज चिंतन करा: देवाच्या परिपालनावर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःला त्याच्या हाती कितपत सोपवता?  खालील प्रार्थना म्हणा आणि ती तुम्ही किती पूर्णपणे आपलीशी करू शकता, यावर विचार करा.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पूर्ण आत्मसमर्पणाची प्रार्थना

हे पित्या,
मी स्वतःला तुझ्या हाती सोपवतो;
तुझ्या इच्छेप्रमाणे माझे कर.
तू काहीही केलेस तरी मी तुझे आभार मानतो:
माझी सर्व गोष्टींसाठी तयारी आहे; मी सर्व काही स्वीकारतो.

माझ्या ठायी आणि तुझ्या सर्व सृष्टीत
केवळ तुझीच इच्छा पूर्ण होवो –
हे प्रभू, याहून अधिक काहीही मला नको.

माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो:
माझ्या अंतःकरणातील सर्व प्रेमाने तो मी तुला अर्पण करतो,
कारण हे प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे; म्हणूनच मला स्वतःला तुला अर्पण करणे आवश्यक आहे,
काहीही राखून न ठेवता तुझ्या हाती स्वतःला सोपवणे आवश्यक आहे,
तेही अमर्याद विश्वासाने,
कारण तू माझा पिता आहेस.

शार्ल द फुको

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत – संत बेनेडिक्ट, मठाधिपती
या वर्षी हा दिवस रविवारी येत असल्याने त्यांचे उपासनाविधीतील स्मरण साजरे केले जात नाही

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य चित्र: लॉस एंजेलिसच्या कॅथेड्रलमधील समाधिगृहाच्या काचेच्या खिडकीवरील ‘पेत्राला सोपवलेले कार्य’ या चित्राचा तपशील. खिडकी: फ्रांझ बोर्गियास मायर यांची कार्यशाळा; छायाचित्र: आंद्रेयास प्रेफ्के, विकिमीडिया कॉमन्समार्फत