30 मार्च 2022
प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

येशूंनी यहुद्यांना उत्तर दिले: “माझा पिता आजवर कार्य करत आहे, म्हणून मीही कार्य करत आहे.” यामुळे ते त्यांना जिवे मारण्याचा अधिकच प्रयत्न करू लागले, कारण त्यांनी केवळ शब्बाथचा नियम मोडला असे नव्हे, तर देवाला आपला स्वतःचा पिता म्हटले आणि अशा रीतीने स्वतःला देवाच्या बरोबरीचे ठरवले. योहान 5:17–18
येशूंना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मते, येशू गंभीर पापांसाठी दोषी होते, यात शंकाच नव्हती. शब्बाथचे नियम त्यांनी ज्या प्रकारे पाळावेत अशी त्या लोकांची अपेक्षा होती, त्या प्रकारे त्यांनी ते पाळले नाहीत. शिवाय, आपण पित्याच्या बरोबरीचे आहोत, हेही त्यांनी प्रकट केले. येशूंचे म्हणणे चुकीचे असते, तर ते त्यांच्याकडून घडलेले गंभीर पाप ठरले असते; पण साहजिकच, त्यांचे म्हणणे चुकीचे नव्हते.
पिता आणि पुत्र यांचे ऐक्य हा या उताऱ्याचा गाभा आहे. यानंतरची वचने आणखी स्पष्टपणे दाखवतात की पिता आणि पुत्र एक आहेत आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यातच येशूंचे संपूर्ण जीवन सामावलेले आहे. त्यांच्या इच्छेतील या एकरूपतेतूनच त्यांचे ऐक्य साकार होते.
यातून पिता आणि पुत्र यांच्या परस्पर नात्याविषयी आपल्याला बरेच काही समजते. तसेच, पिता आणि पुत्र यांच्याशी असलेल्या आपल्या स्वतःच्या नात्याविषयीही बरेच काही उमगते. सर्वप्रथम, पिता आणि पुत्र या दोन भिन्न व्यक्ती आहेत. प्रत्येकाची बुद्धी आणि इच्छाशक्ती परिपूर्ण आहे. तरीही, त्यांची मने पूर्ण सुसंवादात असल्यामुळे त्यांच्यात ऐक्य आहे: दोघांनाही सर्व गोष्टी सारख्याच ज्ञात आहेत आणि जे काही त्यांना ज्ञात आहे, त्यावर त्या दोघांचाही पूर्ण विश्वास आहे. या दोघांचेही ज्ञान समान आणि परिपूर्ण असल्यामुळे, जगाच्या स्थापनेपासून पित्याने आखलेल्या योजनेतील प्रत्येक तपशीलाचा दोघांनीही स्वीकार केला.
पिता आणि पुत्र यांचे ऐक्य समजून घेतल्यावर, देवाशी ऐक्यात आपण कसे प्रवेश करतो, याचा एक उदात्त धडा आपल्याला मिळतो. याची सुरुवात देवाचे मन जाणून घेण्यापासून होते. त्याच्या मनातील गौरवशाली रहस्यांचा आपण सखोल शोध घेतला पाहिजे आणि ती स्वतः समजून घेतली पाहिजेत. दुसरे म्हणजे, जे आपल्याला समजते त्यावर आपण जाणूनबुजून विश्वास ठेवला पाहिजे. सत्य जसजसे उलगडत जाते, तसतसे आपण ते आपल्या जीवनासाठी निवडले पाहिजे. अडचण अशी आहे की अनेक परस्परविरोधी आवाज आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. या आवाजांत विवेकाने भेद करून देव जे प्रकट करतो तेवढेच आपण निवडतो, तेव्हा देवाचे मन आणि इच्छा यांच्याकडे आपण सहजपणे ओढले जातो आणि त्याचा विचार व इच्छा आपण आपलेसे करतो. असे करताना आपणही देवाशी एक होतो.
पिता आणि पुत्र यांच्याशी ऐक्यात जगण्याचे जे पाचारण तुम्हाला मिळाले आहे, त्यावर आज चिंतन करा. हेच ऐक्य तुमच्या जीवनाला परिपूर्णता देते. यासाठीच तुम्हाला निर्माण करण्यात आले आहे. याऐवजी दुसरे काही शोधणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि त्याचा स्वीकार करणे म्हणजे असत्याच्या आधारावर जगणे होय. प्रत्येक बाबतीत देवाचे मन आणि इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करा; मग तुमचे संपूर्ण अस्तित्व देवाशी अधिक गाढ ऐक्याकडे ओढले जाईल.
हे स्वर्गीय पित्या, येशू हा तुझा पुत्र तू मला दिलास, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुमच्या दोघांमधील ऐक्याबद्दलही मी तुझे आभार मानतो. तुमच्या मनांच्या आणि इच्छांच्या एकरूपतेतून साकारलेल्या त्या गौरवशाली ऐक्यात मला सामावून घे. मला तुझ्याशी एक कर, म्हणजे तू माझाही पिता होशील. हे स्वर्गीय पित्या आणि हे येशू, देवाच्या पुत्रा, माझा तुमच्यावर विश्वास आहे.
चिंतन सव्वीस – पवित्र स्त्रिया आणि वेरोनिका
(प्रायश्चित्तकाळातील चौथ्या आठवड्याचा बुधवार)
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने




