मराठी

वेदनादायी विश्वासघात

१२ एप्रिल २०२२
पवित्र सप्ताहातील मंगळवार
आजची वाचने

व्हिडिओ

आपल्या शिष्यांसोबत भोजनास बसले असताना येशू मनातून फार व्याकूळ झाले आणि त्यांनी साक्ष देत म्हटले, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील.”  योहान 13:21

येशू “मनातून फार व्याकूळ झाले” हे येथे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. यातून त्यांचे मानवत्व दिसून येते. येशूंचे हृदय मानवी होते, आणि त्या मानवी हृदयाने त्यांनी यहूदावर दैवी प्रेम केले. यहूदावर असलेल्या या परिपूर्ण प्रेमामुळे येशूंचे हृदय फार व्याकूळ झाले. त्यांच्या या व्याकुळतेचा अर्थ असा की, यहूदाचे मन आणि हृदय बदलावे म्हणून जे काही करणे शक्य होते ते येशूंनी आधीच केले होते; याहून अधिक ते काही करू शकत नव्हते. यहूदाच्या विश्वासघातामुळे येशूंना स्वतःचा अपमान झाल्यासारखे वाटले किंवा त्यांना राग आला, असे नव्हे. उलट, ज्याच्यावर त्यांनी परिपूर्ण प्रेम केले, तो यहूदा दुरावल्यामुळे येशूंचे हृदय तीव्र दुःखाने होरपळले.

यहूदाला इच्छास्वातंत्र्य होते. ते नसते, तर यहूदाला स्वतःच्या इच्छेने येशूंवर प्रेम करता आले नसते. पण त्याच इच्छास्वातंत्र्याचा वापर करून यहूदाने येशूंचा विश्वासघात करण्याचे निवडले. आपल्या बाबतीतही हेच खरे आहे. आपल्यालाही इच्छास्वातंत्र्य आहे. येशूंचे प्रेम स्वीकारण्याची किंवा नाकारण्याची जी मुभा यहूदाला होती, तीच आपल्यालाही दिली आहे. येशू प्रेमाने देत असलेल्या तारणाचा आणि कृपेचा आपण आपल्या जीवनात स्वीकार करू शकतो किंवा ती देणगी नाकारू शकतो. हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.

आपण कोणत्या वाटेने चाललो आहोत, याचा गांभीर्याने विचार करण्यासाठी पवित्र सप्ताह हा उत्तम काळ आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी देव आपल्याला आमंत्रण देतो की आपण सर्व शक्तीनिशी आणि पूर्ण प्रेमाने त्याची निवड करावी. पण येशूंचा क्रूस आपलासा करून त्यांच्यासोबत पवित्र सप्ताहात प्रवेश करण्यास आपण कितीतरी वेळा नकार देतो आणि अशा रीतीने यहूदाप्रमाणे त्यांचा विश्वासघात करतो. त्या पवित्र सप्ताहात आपल्या प्रभूंनी जसे त्यागपूर्वक आणि उदारपणे आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, तसे करण्यात आपण कितीतरी वेळा कमी पडतो.

येशूंचे यहूदावर किती प्रेम होते, यावर आज चिंतन करा. यहूदाच्या पापापेक्षाही त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे येशूंच्या हृदयाला इतक्या वेदना झाल्या. येशूंचे त्याच्यावर प्रेम नसते, तर त्याच्या नकाराने त्यांना वेदना झाल्या नसत्या. येशू तुमच्यावर जे प्रेम करतात, त्यावरही चिंतन करा. तुमच्या जीवनातील कृतींमुळे त्यांचे हृदयही व्याकूळ होते का, याचा विचार करा. स्वतःशी प्रामाणिक राहा आणि सबबी सांगू नका. तुमच्या कृतींमुळे आणि निवडींमुळे येशूंना काहीही व्याकुळता होत असेल, तरी यहूदाप्रमाणे निराश होण्याचे ते कारण नाही. उलट, तुम्हाला स्वतःच्या दुर्बलतेची, पापाची आणि मर्यादांची जाणीव झाली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. हे सर्व येशूंच्या हाती सोपवा. तुम्ही स्वतःवर करता त्याहून अधिक प्रेम ते तुमच्यावर करतात. असे केल्याने तुमच्या हृदयाला खूप दिलासा आणि शांती लाभेल. आपल्या दैवी प्रभूंच्या हृदयालाही खूप दिलासा आणि शांती लाभेल. ते तुमच्यावर प्रेम करतात आणि या पवित्र सप्ताहात तुम्ही त्यांच्याकडे यावे म्हणून ते तुमची वाट पाहत आहेत.

हे माझ्या प्रिय प्रभू, तू दुःख सोसलेस आणि लोकांनी तुला नाकारले. माझे तुझ्यावर खरोखर प्रेम आहे, पण माझ्या विश्वासघाताने तुझे हृदय व्याकूळ होते, हेही मला माहीत आहे.  या पवित्र सप्ताहात माझ्या पापाकडे प्रामाणिकपणे पाहण्यास मला मदत कर.  माझे पाप मला दिसल्यावर, तुझ्यावर अधिक गाढ प्रेम करण्याच्या आड येणाऱ्या गोष्टी मी सोडून द्याव्यात, जेणेकरून तुझ्यासोबत क्रूसापर्यंत चालत जाऊन मला तुझ्या गौरवशाली विजयात सहभागी होता येईल.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ नजर
चिंतन ३९ – पिएता
(पवित्र सप्ताहातील मंगळवार)

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने

पवित्र सप्ताहासाठी प्रार्थना

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: ‘शेवटचे भोजन’ — चित्रकार व्हॅलँतँ द बुलोन्य, स्रोत: विकिमीडिया कॉमन्स