मराठी

येशूकडे ओढले जाणे

५ मे २०२२
पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

व्हिडिओ

येशू लोकसमुदायाला म्हणाला: “ज्या पित्याने मला पाठवले, त्याने एखाद्याला माझ्याकडे ओढल्याशिवाय तो माझ्याकडे येऊ शकत नाही; आणि शेवटच्या दिवशी मी त्याला उठवीन.”  योहान 6:44

पवित्र शास्त्रातील हा उतारा आपल्याला एक सुंदर आध्यात्मिक तत्त्व उलगडून दाखवतो. देवाच्या अधिक जवळ जायचे असेल, तर हे तत्त्व समजून घेऊन त्यानुसार जगणे आवश्यक आहे. ते तत्त्व असे की, पिता आपल्याला येशूकडे ओढतो.

सर्वप्रथम, येशूच्या वचनाचा पहिला भाग समजून घेणे महत्त्वाचे आहे: “…शिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही.”  यावरून आपल्याला कळते की, श्रद्धेने येशूकडे येणे, त्या श्रद्धेत वाढणे आणि देवावरचे आपले प्रेम वाढणे, हे केवळ आपल्या स्वतःच्या बळावर घडत नाही. श्रद्धेकडे येणे हा आपल्या जीवनातील देवाच्या कार्याला दिलेला प्रतिसाद आहे.

ख्रिस्ताशी खरेखुरे नाते जोडायचे असेल, तर ही गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. कारण या नात्यात पहिले पाऊल देवाला उचलू द्यायचे आहे, हे त्यातून आपल्याला कळते. आपण त्याला पहिले पाऊल उचलू दिल्यावर, त्याला प्रतिसाद देण्याची जबाबदारी आपली आहे.

अर्थात, देवाने आपल्याकडे वळावे म्हणून आपण निष्क्रियपणे वाट पाहत बसावे, असा याचा अर्थ नाही. देव सतत आपल्या दिशेने हात पुढे करतो, आपल्याशी बोलतो आणि आपल्याला स्वतःकडे ओढतो. म्हणून प्रेमाने जवळ बोलावणाऱ्या देवाच्या त्या हळुवार हाकेकडे लक्ष देणे ही आपली पहिली जबाबदारी आहे. ही हाक त्याच्या कृपेच्या सौम्य प्रेरणांतून आपल्यापर्यंत पोहोचते. त्या प्रेरणा आपल्याला दररोज अधिक पूर्णपणे त्याच्याकडे वळण्याचे आणि अधिक पूर्णपणे त्याला स्वतःला समर्पित करण्याचे आमंत्रण देतात.

आपल्या धावपळीच्या जगात, आपले लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक आवाजांमुळे आपण सहज विचलित होतो. जग आणि त्यातील प्रलोभने आपल्याला कशी खेचतात, प्रसंगी कशी ढकलतातही, हे सहज जाणवते. क्षणभरच टिकणारे आपले लक्ष वेधून घेण्यात आणि झटपट समाधान देण्यात जग तरबेज झाले आहे. पण असे समाधान शेवटी आपल्या मनात रिकामेपणाच ठेवते.

पण देवाचा आवाज आणि त्याचे आमंत्रण अगदी वेगळे आहे. अंतःकरणाच्या शांततेत त्याचा आवाज ऐकू येतो आणि त्याचे आमंत्रण जाणवते. ही आंतरिक शांतता अनुभवण्यासाठी मठात राहण्याची गरज नाही. दररोज निष्ठेने प्रार्थनेसाठी वेळ दिल्याने आणि प्रत्येक गोष्टीत देवाकडे वळण्याची सवय लावल्याने ती शांतता लाभते. देवाच्या हाकेला पुन्हा पुन्हा प्रतिसाद देत राहिलो की ती शांतता लाभते. अशा रीतीने देवाला आपल्याला ओढू देण्याची, त्याची हाक ऐकण्याची आणि तिला प्रतिसाद देण्याची सवय लागते. मग तो आपल्याला आणखी जवळ ओढतो आणि आपण पुन्हा त्याला प्रतिसाद देतो.

आज तुम्ही देवाचे किती लक्षपूर्वक ऐकता, यावर चिंतन करा. आज निदान काही मिनिटे तरी, आणि शक्य असेल तर त्याहून अधिक वेळ, शांततेत घालवण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटा आणि ऐका. देव तुमच्याशी काय बोलतो ते ऐका. तो तुम्हाला आपल्याकडे ओढतो तेव्हा त्याला उदार अंतःकरणाने प्रतिसाद द्या. दररोज तुम्ही करू शकता ती हीच सर्वांत चांगली निवड आहे!

हे प्रभू, तुझ्या मौनातून मला आधार मिळतो. मला तुझ्याकडे ओढून घे, मला तुझ्या जवळ घे आणि तुझा आवाज ओळखायला मला मदत कर.  तुझी हाक ऐकू येताच उदार अंतःकरणाने तुला प्रतिसाद द्यायला मला मदत कर.  हे प्रिय प्रभू, माझे जीवन तुझेच आहे.  तुझी ओढ माझ्या मनात अधिकाधिक वाढू दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील निवडक चित्रे: मुलांना माझ्याकडे येऊ द्या — अँथनी व्हॅन डाइक यांचे चित्र, विकिमीडिया कॉमन्समार्फत