४ मे २०२२
पुनरुत्थानकाळातील तिसऱ्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

“माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी नाकारणार नाही.” योहान 6:37
ही छोटीशी ओळ आपल्या प्रभूच्या दैवी दयेविषयी बरेच काही सांगते. संत फॉस्टिनाच्या दैवी दयेची दैनंदिनी या ग्रंथात ही ओळ वारंवार येते, आणि ती अनेकांनी ऐकण्याची गरज आहे.
हे ऐकणे का महत्त्वाचे आहे? कारण अनेकदा आपण नाकारले गेल्याचे ओझे मनात बाळगतो. अनेकांना आपल्या आयुष्यात नकाराचा अनुभव आलेला असतो. त्याचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. पुन्हा दुखावले जाऊ या भीतीने ते नात्यात मन मोकळे करायला घाबरतात. एखाद्या नात्यात एकदा दुखापत झाली की पुढची पावले आपण जपून टाकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती, जोडीदार, मित्र किंवा ज्याच्याशी आपण प्रेमाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला अशी कुणीही व्यक्ती आपल्याला दुखावू शकते. आपण प्रेमाने जवळ जातो, पण बदल्यात आपल्या वाट्याला दुःख आणि नकार येतो. आणि त्याची वेदना होते.
येशूचे हे शब्द विशेष महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यावर आपण भरवसा ठेवू शकतो, अशी खात्री ते आपल्याला देतात. आपण त्याच्याकडे जाऊ शकतो, त्याच्यासमोर आपले मन उघडू शकतो आणि मनातले काहीही न लपवता त्याच्यासमोर उभे राहू शकतो. तो आपल्याशी अत्यंत मृदूपणे, आदराने, सदयतेने आणि काळजीपूर्वक वागेल. आपण स्वतःची जितकी काळजी घेतो, त्याहूनही अधिक काळजी येशू आपली घेईल!
आज येशूच्या या शब्दांवर मनन करा. ते पुन्हा पुन्हा म्हणा: “माझ्याकडे येणाऱ्या कोणालाही मी नाकारणार नाही.” तुम्ही त्याच्याकडे यावे आणि त्याच्यासमोर आपले मन पूर्णपणे उघडावे, अशी त्याची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. असे केल्याने त्याला तुमच्यावरील प्रेम प्रकट करता येईल आणि त्याच्यावर इतका भरवसा ठेवणे शक्य आहे, अशी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, इतका भरवसा तुम्ही त्याच्यावर ठेवू शकाल.
हे मला आपलेसे करणाऱ्या प्रभू, दुःखात आणि इतरांनी मला नाकारले असतानाही मला तुझ्याकडे यायचे आहे. तू दैवी वैद्य आहेस आणि माझ्या आत्म्याला दिलासा देशील, हे मला माहीत आहे. तुझ्यावर विश्वास ठेवायला आणि तुझे प्रेम स्वीकारायला मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
दैवी दयेवरील दैनंदिन चिंतन:
संत फॉस्टिनासोबत ३६५ दिवस
अॅमेझॉन – बार्न्स अँड नोबल – गूगल प्ले – आयट्यून्स





