मराठी

ख्रिस्ताचे गुलाम

१२ मे २०२२
पुनरुत्थान काळाच्या चौथ्या आठवड्यातील गुरुवार
आजची वाचने

संत नेरेउस आणि अखिल्लेउस, रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरण

संत पंक्रास, रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरण

व्हिडिओ

शिष्यांचे पाय धुतल्यावर येशू त्यांना म्हणाला, “आमेन, आमेन, मी तुम्हाला सांगतो, कोणताही गुलाम आपल्या धन्यापेक्षा मोठा नसतो आणि कोणताही संदेशवाहक त्याला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नसतो.” योहान 13:16

येशूच्या शब्दांचा गर्भित अर्थ लक्षात घेतला, तर तो आपल्याला दोन गोष्टी सांगत असल्याचे जाणवते. पहिली, आपण स्वतःला देवाचे गुलाम आणि संदेशवाहक समजणे चांगले आहे. दुसरी, सर्व गौरव आपण नेहमी देवाला दिला पाहिजे. आध्यात्मिक जीवनात या दोन्ही गोष्टी आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. चला, दोन्हींचा विचार करूया.

सहसा ‘गुलाम’ असण्याची कल्पना कुणालाही फारशी आवडत नाही. आजच्या काळात गुलामगिरीचा आपल्याला तितकासा परिचय नाही. पण गुलामगिरी हे एक वास्तव आहे आणि जगाच्या इतिहासात अनेक संस्कृतींमध्ये व अनेक काळांत तिने फार मोठी हानी केली आहे. गुलामगिरीतील सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे गुलामांना दिली जाणारी क्रूर वागणूक. त्यांना वस्तू किंवा मालमत्ता असल्यासारखे वागवले जाते. हे त्यांच्या मानवी प्रतिष्ठेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

पण अशी कल्पना करा की एखादी व्यक्ती अशा धन्याची गुलाम आहे, जो तिच्यावर परिपूर्ण प्रेम करतो. त्या ‘गुलामाला’ स्वतःमधील खरी क्षमता ओळखून ती पूर्णपणे विकसित करण्यास आणि जीवनात परिपूर्णता प्राप्त करण्यास मदत करणे, हेच त्या धन्याचे मुख्य ध्येय आहे. असा धनी आपल्या गुलामाला प्रेमाचा आणि आनंदाचा स्वीकार करण्याची ‘आज्ञा’ देईल आणि त्याच्या मानवी प्रतिष्ठेला कधीही धक्का लावणार नाही.

देवाच्या बाबतीत असेच आहे. देवाचा गुलाम होण्याच्या कल्पनेची आपण कधीही भीती बाळगू नये. हे शब्द भूतकाळात मानवी प्रतिष्ठेची झालेली पायमल्ली आठवून देत असले, तरी देवाचे गुलाम होणे हे आपले ध्येय असावे. का? कारण आपला धनी देवच असावा, अशी इच्छा आपण धरली पाहिजे. खरे तर, स्वतःचे धनी होण्याच्या इच्छेपेक्षाही देव आपला धनी असावा, ही इच्छा अधिक प्रबळ असली पाहिजे. आपण स्वतःशी ज्या रीतीने वागतो, त्यापेक्षा देव आपल्याशी अधिक चांगल्या रीतीने वागेल! पावित्र्याने आणि आनंदाने परिपूर्ण असे जीवन जगण्याची आज्ञा तो आपल्याला देईल आणि आपण त्याच्या दैवी इच्छेपुढे नम्रपणे नतमस्तक होऊ. इतकेच नव्हे, तर आपण त्याला तसे करू दिले, तर तो आपल्याला ज्या आज्ञा देतो, त्या सर्व पाळण्यासाठी आवश्यक साधनेही देईल. ‘देवाचा गुलाम’ होणे ही चांगली गोष्ट आहे आणि तेच आपल्या जीवनाचे ध्येय असावे.

आपल्या जीवनाची सूत्रे देवाच्या हाती सोपवायला आपण जसजसे शिकतो, तसतसे तो आपल्यामध्ये जे काही करतो त्याबद्दल नियमितपणे त्याचे आभार मानले पाहिजेत आणि त्याची स्तुती केली पाहिजे. त्याने आपल्याला आपल्या कार्यात सहभागी करून घेतले आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठवले आहे; यासाठी सर्व गौरव त्यालाच दिला पाहिजे. तो सर्व बाबतींत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, तरीही त्याच्या महानतेत आणि गौरवात आपण सहभागी व्हावे, अशी त्याची इच्छा आहे. म्हणून आनंदाची बातमी ही आहे: देव आपल्यामध्ये जे काही करतो आणि त्याने आपल्या नियमांद्वारे व आज्ञांद्वारे जे काही नेमून दिले आहे, त्या सर्वांबद्दल आपण त्याचा गौरव केला आणि त्याचे आभार मानले, तर तो आपल्याला उंचावून आपल्या गौरवात सहभागी करून घेईल! ख्रिस्ती जीवनाचे हे एक फळ आहे. त्यातून मिळणारा आशीर्वाद आपण स्वतः कल्पना करू शकू त्याहूनही मोठा आहे.

आज स्वतःला पूर्णपणे देवाच्या आणि त्याच्या इच्छेच्या अधीन करून त्याचे गुलाम होणे म्हणजे काय, यावर चिंतन करा. हा निश्चय तुम्हाला अपार आनंदाच्या वाटेवर नेईल.

हे माझ्या प्रभू आणि स्वामी, मी तुझी प्रत्येक आज्ञा मानण्यास स्वतःला समर्पित करतो.  माझ्या ठायी तुझीच इच्छा पूर्ण होवो, केवळ तुझीच.  सर्व बाबतींत मी तुलाच माझा स्वामी मानतो आणि माझ्यावर असलेल्या तुझ्या परिपूर्ण प्रेमावर भरवसा ठेवतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

पुनरुत्थानकाळातील प्रार्थना

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

आजचे संत –

संत नेरेउस आणि अकिल्लेउस, रक्तसाक्षी

संत पँक्रस, रक्तसाक्षी

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील चित्र: शिष्यांचे पाय धुणारा ख्रिस्त — चित्रकार: पाओलो व्हेरोनेझे, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने