रविवार, 12 जून 2022

“स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या आणि मी तुम्हाला दिलेल्या सर्व आज्ञा पाळायला त्यांना शिकवा. आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्याबरोबर आहे.” मत्तय 28:18-20
त्रैक्य! देवाचे अंतर्जीवन! आपल्या श्रद्धेचे सर्वांत महान रहस्य!
देव एकच आहे, ही गोष्ट आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. आणि हाच एक देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे, हे आपण पूर्णपणे मानतो. वरवर पाहता हा विरोधाभास वाटतो. देव एकच असून त्याच वेळी तीन व्यक्ती कसा असू शकतो? या रहस्याचा खोलवर विचार करणे आणि त्यावर मनन करणे मोलाचे आहे.
सर्वप्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या तीन दैवी व्यक्ती आहेत. त्या एकमेकींपासून भिन्न आहेत. प्रत्येक व्यक्तीची बुद्धी परिपूर्ण आहे आणि प्रत्येक व्यक्तीला इच्छास्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण रीतीने जाणू शकते आणि प्रेम करू शकते.
पण जाणण्याच्या आणि प्रेम करण्याच्या त्यांच्या क्षमतेतील हीच ‘परिपूर्णता’ त्यांना एक करते. तिघांचे दैवी स्वरूप एकच आहे आणि त्या एकाच दैवी स्वरूपात त्यांचे ऐक्य परिपूर्ण आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती इतर दोन्ही व्यक्तींना परिपूर्ण रीतीने जाणते आणि त्यांच्यावर परिपूर्ण प्रेम करते. हे ज्ञान (त्यांच्या परिपूर्ण बुद्धीची कृती) आणि हे प्रेम (त्यांच्या परिपूर्ण इच्छाशक्तीची कृती) यांतून इतके गहन ऐक्य घडते की ते एकच देव म्हणून जगतात आणि कार्य करतात.
आणखी एक प्रेरणादायी गोष्ट अशी की, एकमेकांना जाणण्यातून आणि एकमेकांवर प्रेम करण्यातून त्यांच्यात जे ऐक्य आहे, त्यात प्रत्येक दैवी व्यक्तीला व्यक्ती म्हणून परिपूर्णता लाभते. यावरून दिसते की ऐक्यातच ‘व्यक्ती असण्याला’ पूर्णता येते. आपल्यापैकी प्रत्येकासाठी हा किती सुंदर धडा आहे!
आपण देव नाही, पण आपली निर्मिती देवाच्या प्रतिमेत आणि त्याच्यासारखी झाली आहे. म्हणून देवाला ज्या प्रकारे परिपूर्णता लाभते, त्याच प्रकारे आपल्यालाही ती लाभते. म्हणजेच, इतरांवर प्रेम करण्यात आणि आपल्या स्वतंत्र इच्छेने प्रत्येक व्यक्तीला जाणून घेऊन तिच्याशी ऐक्याचे नाते जोडण्यात आपल्याला जीवनाची परिपूर्णता लाभते. आपल्या नात्यांनुसार या ऐक्याचे स्वरूप बदलते. देवाच्या जीवनाचे अनुकरण करत पती-पत्नींना सर्वांत गहन ऐक्यात सहभागी होण्याचे आवाहन आहे. पण प्रत्येक नात्यालाही आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण रीतीने देवाच्या जीवनात सहभागी होण्याचे आवाहन आहे.
आज त्रैक्याचा रविवार साजरा करताना, देवाने तुम्हाला ज्या नात्यांसाठी बोलावले आहे, त्यांवर मनन करा. तुमच्या नात्यांमध्ये तुम्ही त्रैक्याच्या प्रेमाचे कितपत अनुकरण करता? आपल्यापैकी प्रत्येकाला नात्यांमध्ये कुठे वाढण्याची गरज आहे, हे नक्कीच दिसेल. तुमच्या नात्यांतील प्रेम अधिक गहिरे करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्याचा निर्धार करा. प्रेमाने उचललेल्या त्या पावलातून देवाला तुमचे जीवन अधिक परिपूर्ण करू द्या.
हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्या, तुम्हाला ओळखण्यास आणि तुमच्यावर प्रेम करण्यास मला मदत करा. तुमच्या स्वतःच्या दैवी जीवनात तुम्ही एकमेकांवर जे प्रेम करता, ते मला उमगू द्या. ते प्रेम उमगल्यावर तुमच्याच हृदयाने इतरांवरही प्रेम करण्यास मला मदत करा. हे पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे.
रविवारच्या शुभवर्तमानावरील आणखी चिंतन-व्हिडिओ
अधिक वाचन – परमपवित्र त्रैक्याचा महोत्सव
वरील मुख्य चित्र: अंतोनियो दे पेरेदा यांचे ‘पवित्र त्रैक्य’ — विकिमीडिया कॉमन्सवरून




