बुधवार, २९ जून २०२२
संत पेत्र आणि संत पौल या प्रेषितांचा महोत्सव

“म्हणून मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी माझी ख्रिस्तसभा उभारेन. अधोलोकाच्या द्वारांचे तिच्यावर काही चालणार नाही.” मत्तय 16:18
युगानुयुगे लोकांनी ख्रिस्तसभेचा द्वेष केला, तिच्याविषयी गैरसमज करून घेतले, तिची बदनामी आणि थट्टा केली, इतकेच नव्हे तर तिच्यावर हल्लेही केले. कधीकधी तिच्या सदस्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे ख्रिस्तसभेला उपहास आणि टीका सहन करावी लागते. पण बहुतेकदा तिचा छळ झाला आहे, आणि आजही होत आहे, कारण स्वतः ख्रिस्ताच्या वाणीने सत्याची स्पष्टपणे, करुणेने, ठामपणे आणि अधिकाराने घोषणा करण्याचे कार्य आपल्यावर सोपवले आहे. हे सत्य सर्वांना मुक्त करते, जेणेकरून ते देवाची मुले म्हणून एकोप्याने जगू शकतील.
यातील दुःखद विडंबना अशी की, या जगात अनेक जण सत्य स्वीकारण्यास नकार देतात. ख्रिस्तसभा आपले दैवी कार्य पार पाडत असताना, उलट अनेकांच्या मनात राग आणि कटुता वाढत जाते.
ख्रिस्तसभेचे हे दैवी कार्य नेमके काय आहे? स्पष्टपणे आणि अधिकाराने शिकवणे, संस्कारांद्वारे देवाची कृपा आणि दया विपुलपणे देणे, आणि मेंढपाळाप्रमाणे देवाच्या लोकांची काळजी घेत त्यांना स्वर्गाकडे नेणे, हे तिचे कार्य आहे. हे कार्य देवानेच ख्रिस्तसभेला दिले आहे, आणि ते धैर्याने, निर्भीडपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचे बळही देवच ख्रिस्तसभेला आणि तिच्या सेवकांना देतो.
आजचा महोत्सव या पवित्र कार्यावर चिंतन करण्याची अतिशय योग्य संधी आहे. संत पेत्र आणि संत पौल हे ख्रिस्तसभेच्या कार्याची केवळ दोन सर्वोत्तम उदाहरणे नाहीत; ख्रिस्ताने ज्या पायावर हे कार्य उभे केले, तो पायाही तेच आहेत.
सर्वप्रथम, आजच्या सुवार्तेत येशू स्वतः पेत्राला म्हणाला, “म्हणून मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस, आणि या खडकावर मी माझी ख्रिस्तसभा उभारेन. अधोलोकाच्या द्वारांचे तिच्यावर काही चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. तू पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, आणि तू पृथ्वीवर जे काही सोडशील ते स्वर्गात सोडले जाईल.”
सुवार्तेच्या या उताऱ्यात ख्रिस्तसभेच्या पहिल्या पोपला “स्वर्गराज्याच्या किल्ल्या” दिल्या जातात. पृथ्वीवरील ख्रिस्तसभेचे दैवी नेतृत्व ज्यांच्यावर सोपवले गेले, त्या संत पेत्रांना स्वर्गप्राप्तीसाठी आपल्याला जे काही जाणून घेणे आवश्यक आहे ते सर्व शिकवण्याचा अधिकार देण्यात आला. ख्रिस्तसभेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून हे स्पष्ट दिसते की पेत्रांनी या “राज्याच्या किल्ल्या”, म्हणजेच “अधिकाराने बांधण्याची आणि सोडण्याची क्षमता”, ही दैवी देणगी आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे सोपवली. या देणगीला आज ‘अचूकता’ असे म्हणतात. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याने ती आपल्या उत्तराधिकाऱ्याकडे सोपवली, आणि हा क्रम आजपर्यंत चालू आहे.
ख्रिस्तसभा सुवार्तेतील मुक्तिदायी सत्य स्पष्टपणे, आत्मविश्वासाने आणि अधिकाराने घोषित करते म्हणून अनेक जण तिच्यावर रागावतात. नैतिकतेच्या बाबतीत हे विशेषतः दिसून येते. ही सत्ये घोषित केली जातात, तेव्हा अनेकदा ख्रिस्तसभेवर हल्ले होतात आणि तिची बदनामी करण्यासाठी तिला वाटेल ती नावे ठेवली जातात.
यात सर्वांत दुःखाची गोष्ट ख्रिस्तसभेवर हल्ले होतात ही नाही; छळ सहन करण्यासाठी आवश्यक ती कृपा ख्रिस्त आपल्याला नेहमी देईल. खरे दुःख याचे आहे की, ज्यांना सर्वांत जास्त राग येतो, त्यांनाच बहुतेकदा त्या मुक्तिदायी सत्याची सर्वांत जास्त गरज असते. केवळ ख्रिस्त येशूमध्ये मिळणाऱ्या स्वातंत्र्याची आणि सुवार्तेच्या संपूर्ण व अपरिवर्तित सत्याची प्रत्येकाला गरज आहे. हे सत्य त्याने पवित्र शास्त्रात आधीच आपल्यावर सोपवले आहे आणि पोपच्या रूपाने पेत्राद्वारे तो ते आजही आपल्याला स्पष्ट करून देतो. शिवाय, सुवार्ता कधीच बदलत नाही; बदलते ती फक्त आपली समज, जी अधिक सखोल आणि स्पष्ट होत जाते. पेत्र आणि ही अत्यावश्यक भूमिका पार पाडून ख्रिस्तसभेची सेवा करणारे त्यांचे सर्व उत्तराधिकारी यांच्याबद्दल देवाचे आभार मानूया.
आज आपण ज्यांचा सन्मान करतो ते दुसरे प्रेषित, संत पौल, यांच्यावर खुद्द पेत्रांच्या किल्ल्या सोपवण्यात आल्या नव्हत्या. मात्र ख्रिस्ताने त्यांना बोलावले, आणि अभिषेकाद्वारे त्यांना परराष्ट्रीयांचे प्रेषित होण्याचे बळ मिळाले. संत पौलांनी मोठ्या धैर्याने संपूर्ण भूमध्यसागरी प्रदेशात प्रवास केला आणि भेटलेल्या प्रत्येकापर्यंत सुवार्तेचा संदेश पोहोचवला. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्या प्रवासांविषयी म्हणतात, “प्रभू माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याने मला बळ दिले, जेणेकरून माझ्याद्वारे सुवार्तेची घोषणा पूर्ण व्हावी आणि सर्व परराष्ट्रीयांना ती ऐकता यावी.” त्यांनी दुःख सोसले, मार खाल्ला, तुरुंगवास भोगला आणि उपहास सहन केला. अनेकांनी त्यांचा गैरसमज करून घेतला आणि त्यांचा द्वेष केला. तरीही अनेकांना खरे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे साधन ते ठरले. त्यांच्या शब्दांना आणि उदाहरणाला प्रतिसाद देऊन अनेकांनी आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताला अर्पण केले. अनेक नव्या ख्रिस्ती समुदायांची स्थापना संत पौलांच्या अथक प्रयत्नांमुळे झाली. जगाच्या विरोधाला सामोरे जाताना पौल आजच्या पत्रात म्हणतात, “सिंहाच्या जबड्यातून माझी सुटका झाली. प्रभू प्रत्येक दुष्ट संकटातून माझी सुटका करील आणि मला आपल्या स्वर्गीय राज्यात सुरक्षितपणे नेईल.”
संत पौल आणि संत पेत्र या दोघांनीही आपापल्या सेवाकार्याशी एकनिष्ठ राहण्याची किंमत आपल्या प्राणांनी चुकवली. पहिल्या वाचनात पेत्राच्या तुरुंगवासाविषयी सांगितले होते; तर पत्रांमधून पौलाने सोसलेल्या हालअपेष्टा दिसून येतात. अखेरीस दोघेही रक्तसाक्षी झाले. सुवार्तेसाठी रक्तसाक्षी होणे ही वाईट गोष्ट नाही.
येशू सुवार्तेत म्हणतो, “जो तुमचे हातपाय बांधू शकतो त्याला भिऊ नका; उलट, जो तुम्हाला गेहेन्नात टाकू शकतो त्याला भ्या.” आणि तुम्हाला गेहेन्नात टाकू शकणारे दुसरे कोणी नाही; तुम्ही स्वतःच्या इच्छेने केलेल्या निवडींमुळे स्वतःच तिथे पडू शकता. शेवटी, आपल्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण सुवार्तेच्या सत्यापासून दूर जाऊ नये, याचीच भीती आपण बाळगली पाहिजे.
सत्य प्रेमाने आणि करुणेने जाहीर केले पाहिजे; पण श्रद्धेचे जीवन आणि नीतिमान आचरण यांविषयीचे सत्य त्यात नसेल, तर ते प्रेम खरे प्रेम नाही आणि ती करुणाही खरी करुणा नाही.
संत पेत्र आणि संत पौल यांच्या या सणाच्या दिवशी, जगाला मुक्त करण्याचे साधन म्हणून कार्य करत राहण्यासाठी लागणारे धैर्य, ईश्वरावरील व शेजाऱ्यावरील प्रेम आणि सुज्ञपणा ख्रिस्त आम्हा सर्वांना व संपूर्ण ख्रिस्तसभेला देवो.
हे प्रभू, तुझ्या ख्रिस्तसभेच्या देणगीबद्दल आणि ती घोषित करीत असलेल्या मुक्तिदायी सुवार्तेबद्दल मी तुझे आभार मानतो. तुझ्या ख्रिस्तसभेद्वारे तू प्रकट करीत असलेल्या सत्यांशी सदैव निष्ठावान राहण्यास मला मदत कर. आणि ज्यांना त्या सत्याची गरज आहे, त्या सर्वांपर्यंत ते पोहोचवण्याचे साधन होण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
जीवनाच्या रक्षणासाठी प्रार्थना
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रार्थनेत सहभागी व्हा
आजचे संत – संत पेत्र व पौल
वरील प्रमुख चित्र: संत पेत्र व पौल (स्रोत: विकिमीडिया कॉमन्स)




