28 जून 2022
सामान्य काळाच्या तेराव्या आठवड्यातील मंगळवार
आजची वाचने
संत इरेनियस, बिशप आणि रक्तसाक्षी—स्मृतिदिन

ते येशूजवळ आले आणि त्याला जागे करून म्हणाले, “प्रभू, आम्हाला वाचव! आम्ही बुडत आहोत!” तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पश्रद्धावानांनो, तुम्ही एवढे का घाबरता?” मग त्याने उठून वाऱ्यांना आणि समुद्राला दटावले, आणि सर्वत्र नीरव शांतता पसरली. मत्तय 8:25-26
कल्पना करा की तुम्ही प्रेषितांबरोबर समुद्रात आहात. तुम्ही मच्छीमार आहात आणि आयुष्यातले असंख्य तास तुम्ही समुद्रावर घालवले आहेत. काही दिवशी समुद्र विलक्षण शांत असे, तर काही दिवशी मोठमोठ्या लाटा उसळत. पण हा दिवस वेगळाच होता. प्रचंड लाटा होडीवर आदळत होत्या आणि यातून आपण सुखरूप बाहेर पडणार नाही, अशी भीती तुम्हाला वाटली. म्हणून घाबरून तुम्ही होडीतल्या इतरांबरोबर येशूला जागे केले, या आशेने की तो तुम्हाला वाचवील.
या परिस्थितीत प्रेषितांनी काय करणे सर्वांत योग्य ठरले असते? बहुधा येशूला झोपू देणेच योग्य ठरले असते. खरे तर, त्यांनी त्या भीषण वादळाला विश्वासाने आणि आशेने तोंड द्यायला हवे होते. आपल्याला अगदी हतबल करून सोडणारी ‘वादळे’ क्वचितच येत असली, तरी ती येणार हे नक्की. ती येतील तेव्हा आपल्याला हतबल झाल्यासारखे वाटेल.
प्रेषित घाबरले नसते आणि त्यांनी येशूला झोपू दिले असते, तर कदाचित त्यांना आणखी थोडा वेळ वादळाला तोंड द्यावे लागले असते. पण अखेरीस वादळ ओसरले असते आणि सर्व काही शांत झाले असते.
येशू अत्यंत करुणामय आहे. होडीतल्या प्रेषितांनी जशी त्याला हाक मारली, तशी आपणही अडचणीत त्याला हाक मारली, तर त्याला त्याचे वावगे वाटत नाही. आपण घाबरून त्याच्याकडे वळलो आणि त्याची मदत मागितली, तरी त्याला ते चालते. रात्री घाबरून जाग आलेल्या मुलाच्या जवळ जसे त्याचे आई किंवा वडील असतात, तसाच तोही आपल्या जवळ असेल. पण आपण वादळाला विश्वासाने आणि आशेने तोंड देणे अधिक योग्य ठरेल. हेही ओसरेल, हे आपण लक्षात ठेवावे आणि त्याच्यावर भरवसा ठेवून धीर सोडू नये. या प्रसंगातून आपल्याला घेता येईल असा हा सर्वांत योग्य बोध वाटतो.
आज चिंतन करा: जीवनात अडचणी आणि समस्या आल्या की तुम्ही कशी प्रतिक्रिया देता? त्या लहान असोत वा मोठ्या, येशूला तुमच्याकडून अपेक्षित असलेल्या विश्वासाने, शांतपणे आणि आशेने तुम्ही त्यांना तोंड देता का? सतत भीतीत घालवण्याइतके आयुष्य मोठे नाही. रोज तुमच्यासमोर काहीही आले, तरी प्रभूवर भरवसा ठेवा. तो झोपलेला वाटत असेल, तर त्याला झोपू द्या. तो काय करतो हे त्याला ठाऊक आहे. तुमच्या सहनशक्तीपलीकडचे काहीही तो तुमच्यावर येऊ देणार नाही, याची खात्री बाळगा.
हे माझ्या निद्रिस्त प्रभू, माझ्यावर कोणताही प्रसंग आला तरी माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू नेहमी माझ्यासोबत आहेस आणि मला झेपणार नाही असे ओझे तू माझ्यावर कधीही घालणार नाहीस, हे मला ठाऊक आहे. हे येशू, माझा तुझ्यावर खरोखर विश्वास आहे.
जीवनाच्या रक्षणासाठी प्रार्थना
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रार्थनेत सहभागी व्हा
आजचे संत – संत इरेनियस, बिशप आणि रक्तसाक्षी — स्मरणदिन
वरील मुख्य चित्र: रिस्टोर्ड ट्रेडिशन्स




