28 ऑगस्ट 2022
सामान्य काळातील बाविसावा रविवार (वर्ष क)
आजची वाचने
एका शब्बाथ दिवशी येशू परुश्यांतील एका प्रमुख व्यक्तीच्या घरी भोजनासाठी गेला. तेथे जमलेले लोक त्याच्याकडे बारकाईने पाहत होते. लूक 14:1
किती लक्षवेधी वाक्य आहे हे! त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण त्यातून येशूबद्दल काही लोकांची नेहमी दिसणारी प्रतिक्रिया लक्षात येते. ती प्रतिक्रिया कोणती? दुरूनच येशूचे बारकाईने निरीक्षण करण्याची प्रवृत्ती.
हे वाक्य कोणत्या प्रसंगी आले आहे, ते पाहा. एका प्रमुख परुश्याच्या घरी येशूला आमंत्रण होते आणि तेथे इतरही बरेच लोक उपस्थित होते. त्या काळच्या समाजातील ‘वजनदार मंडळी’ म्हणून ते ओळखले जात असावेत. ते समाजातील प्रभावशाली, श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोक होते. त्यांच्यापैकी अनेकांना स्वतःच्या प्रतिष्ठेची बरीच काळजी असावी. लोकांमध्ये येशूची लोकप्रियता एवढी वाढत असल्याने त्याच्याविषयीही त्यांना बरेच कुतूहल असावे. म्हणून ते सर्व ‘त्याच्याकडे बारकाईने पाहत होते.’
येशूबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रियेच्या या वर्णनातून काय सूचित होते, ते लक्षात घ्या. त्या काळी ज्यांचे पाप उघड होते, अशा लोकांप्रमाणे ते येशूकडे आले नाहीत, त्याच्या पाया पडले नाहीत आणि त्यांनी दयेची याचनाही केली नाही. उलट, इतर लोक येशूचा कसा स्वीकार करतील, तो काय म्हणेल आणि आपण त्याच्याविषयी काय मत ठेवावे, याचीच त्यांना विशेष उत्सुकता होती असे दिसते. ते सर्व जण पूर्णपणे श्रद्धेने येशूकडे वळत नाहीत, हे खेदजनक आहे. तरी निदान ते येशूकडे लक्ष देतात आणि तो इतरांपेक्षा वेगळा आहे हे ओळखतात, ही चांगली गोष्ट आहे.
त्यांचे हे कुतूहल अगदीच वाईट नाही. खरे तर, ते त्यांच्यापैकी काहींना तारणाकडे नेऊ शकते. येशूचे निरीक्षण करताना ते त्याच्याविषयी, त्याच्या शब्दांविषयी आणि त्याच्या कृतींविषयी विचार करत आहेत, हे स्पष्ट आहे. पण हे तेव्हाच चांगले ठरेल, जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण श्रद्धेने त्याच्याकडे वळेल आणि इतरांना काय वाटेल याची पर्वा न करता आपल्या प्रभूचा स्वीकार करील. लोकांच्या नजरेत आपली प्रतिमा कशी आहे, याचीच सतत काळजी करणाऱ्यांसाठी ही जोखीम आहे. पण ती पत्करण्यासारखी आहे. आपल्या निरीक्षणाचे रूपांतर खऱ्या श्रद्धेत होऊ देण्यास जे नम्रपणे तयार असतील, त्यांचे जीवन बदलेल. पण त्यासाठी इतरांना काय वाटेल, ही भीती त्यांनी सोडून दिली पाहिजे.
आज चिंतन करा: येशूचे आणि त्याच्या इच्छेचे दुरूनच केवळ ‘निरीक्षण’ करण्याची प्रवृत्ती तुमच्यात आहे का? आपल्या आजूबाजूला असलेल्या देवाच्या उपस्थितीविषयी तुम्हाला कुतूहल आणि आस्था वाटत असेल, तर त्या कुतूहलातून पुढचे पाऊल उचलायला संकोच करू नका. त्याच्या शब्दांना आणि उपस्थितीला तुमचे जीवन बदलू द्या. इतरांना काय वाटेल, याची काळजी करू नका. निःसंकोचपणे आपले जीवन त्याला अर्पण करा; असे केल्याबद्दल तुम्ही सदैव कृतज्ञ राहाल.
हे प्रभू, माझ्या जीवनात तुझी उपस्थिती मला जाणवते तेव्हा तिला प्रतिसाद देण्यासाठी लागणारे धैर्य मला दे. तुझ्याकडे वळताना समाजाचा दबाव किंवा माझा अहंकार यांना मी कधीही आड येऊ देऊ नये. हे प्रिय प्रभू, माझे तुझ्यावर प्रेम आहे. कोणतीही आडकाठी न ठेवता तुझ्यावर प्रेम करण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
रविवारच्या चिंतनांचे आणखी व्हिडिओ
आजचे संत – हिप्पोचे संत ऑगस्टीन, बिशप आणि ख्रिस्तसभेचे धर्मपंडित — स्मृतिदिन
या वर्षी हा दिवस रविवारी येत असल्यामुळे उपासनेत हा स्मृतिदिन साजरा केला जात नाही
वर दिलेले चित्र: परुशी शिमोनाच्या घरी ख्रिस्त — चित्रकार: लुका सिग्नोरेली




