२२ सप्टेंबर २०२२
सामान्य काळातील पंचविसाव्या आठवड्याचा गुरुवार
आजची वाचने

पण हेरोद म्हणाला, “योहानाचा शिरच्छेद तर मी केला. मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो, तो कोण आहे?” आणि तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत राहिला. लूक 9:9
हेरोदाच्या उदाहरणातून आपल्याला काही वाईट गुण दिसतात, तसेच काही चांगले गुणही दिसतात. त्याचे वाईट गुण अगदी उघड आहेत. हेरोद अतिशय पापी जीवन जगत होता आणि अखेर त्याच्या स्वैर जीवनामुळे त्याने संत योहान बाप्तिस्ताचा शिरच्छेद करवला. तरीही वर दिलेल्या पवित्र शास्त्रातील उताऱ्यात त्याचा एक लक्षवेधी गुण दिसतो. तो गुण आपणही अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हेरोदाला येशूविषयी कुतूहल होते. पवित्र शास्त्र सांगते, “तो येशूला पाहण्याचा प्रयत्न करत राहिला.” यातून हेरोदाने योहान बाप्तिस्ताचा मूळ संदेश स्वीकारला नाही किंवा पश्चात्ताप करून तो पापापासून देवाकडे वळलाही नाही. तरी निदान ते त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते.
याहून समर्पक शब्द सुचत नसल्याने, हेरोदाच्या या इच्छेला आपण कदाचित “पवित्र जिज्ञासा” म्हणू शकतो. येशूमध्ये काहीतरी आगळेवेगळे आहे, हे त्याला जाणवले होते आणि ते नेमके काय आहे हे त्याला समजून घ्यायचे होते. येशू कोण आहे हे त्याला जाणून घ्यायचे होते आणि येशूच्या संदेशाने त्याचे कुतूहल जागे केले होते.
सत्याच्या शोधात हेरोद जिथपर्यंत गेला, त्याहून खूप पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांना पाचारण आहे. तरीही आपल्या समाजातील अनेकांची वृत्ती हेरोदासारखी आहे, हे आपल्याला दिसते. शुभवर्तमान आणि आपली श्रद्धा आपल्यासमोर जे काही मांडते, त्याविषयी अनेकांना कुतूहल वाटते. पोप काय म्हणतात आणि जगातील अन्यायाला चर्च कसा प्रतिसाद देते, हे ते उत्सुकतेने ऐकतात. त्याच वेळी, एकंदर समाज अनेकदा आपली आणि आपल्या श्रद्धेची निंदा करतो व टीकाही करतो. तरीही देवाला काय सांगायचे आहे, विशेषतः आपल्या चर्चच्या माध्यमातून तो काय सांगतो, याविषयी समाजाला कुतूहल आहे आणि ते ऐकण्याची इच्छाही आहे, याची ही एक खूण आहे.
आज दोन गोष्टींवर चिंतन करा. प्रथम, अधिक जाणून घेण्याच्या तुमच्या स्वतःच्या इच्छेवर चिंतन करा. ही इच्छा तुमच्यात आहे हे जाणवल्यावर तिथेच थांबू नका. त्या इच्छेला तुम्हाला आपल्या प्रभूच्या संदेशाच्या अधिक जवळ नेऊ द्या. दुसरे म्हणजे, तुमच्या आसपासच्या लोकांमधील “पवित्र जिज्ञासेकडे” लक्ष द्या. कदाचित तुमच्या एखाद्या शेजाऱ्याने, कुटुंबातील व्यक्तीने किंवा सहकाऱ्याने तुमची श्रद्धा आणि आपले चर्च काय सांगते याविषयी कुतूहल दाखवले असेल. असे दिसले तर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. योहान बाप्तिस्ताच्या माध्यमातून देवाने जसा आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, तसाच तो संदेश शोधणाऱ्या सर्वांपर्यंत तो तुमच्याही माध्यमातून पोहोचवावा, अशी देवाकडे विनंती करा.
हे प्रभू, प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येक वेळी तुझा शोध घेण्यास मला मदत कर. अंधार दाटून येतो तेव्हा तू प्रकट केलेला प्रकाश मला सापडू दे. मग ज्या जगाला त्या प्रकाशाची फार गरज आहे, त्या जगापर्यंत तो पोहोचवण्यास मला मदत कर. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
पहिला दिवस: लिझियूच्या संत थेरेसची नोव्हेना – छोटे फूल
चित्र: हेरोद अंतिपाससमोर ख्रिस्त — चित्रकार निकोलाउस क्न्युप्फर, विकिमीडिया कॉमन्समार्फत




