मराठी

स्वर्गप्राप्तीची फाजील खात्री

२६ ऑक्टोबर २०२२
सामान्य काळातील तिसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

व्हिडिओ

“तेव्हा तो तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर जा!’” लूक 13:27

येशू स्पष्ट करतो की काही जण स्वर्गात आपल्याला प्रवेश मिळणारच असे गृहीत धरून त्याच्याकडे येतील; पण त्यांच्या या फाजील खात्रीला पुढील भयावह शब्दांनी उत्तर मिळेल: “तुम्ही कोठून आला आहात, हे मला माहीत नाही.  माझ्यापासून दूर जा.”  

अशी फाजील खात्री बाळगणे हे धोकादायक पाप आहे. ते दोन कारणांनी धोकादायक आहे. पहिले म्हणजे, अशी खात्री बाळगणारे लोक सत्य नाकारून जगतात. देवाशी असलेल्या नात्याच्या बाबतीत, अशी फाजील खात्री बाळगणे म्हणजे प्रत्यक्षात देवाशी नाते नसतानाही ते असल्यासारखे वागणे. ते भक्तिभावाने बोलतील, पवित्र असल्यासारखे वागतील, इतकेच नव्हे तर आपण पवित्र आहोत असे त्यांना वाटेलही; पण प्रत्यक्षात ते आपल्या प्रभूला अजिबात ओळखत नाहीत. अशा प्रकारे सत्य नाकारून जगणे म्हणजेच फाजील खात्री बाळगणे.

दुसरे म्हणजे, अशी फाजील खात्री धोकादायक आहे, कारण ती बाळगणारी व्यक्ती स्वतःच्या पापाबद्दल पश्चात्ताप करत नाही. सत्य नाकारल्यामुळे तिला आपले पाप मान्य करणे अशक्य होते. आपले पाप मान्य केल्याशिवाय आपल्याला बदलण्याची गरज आहे, हेही तिला मान्य करता येत नाही. ती आपल्या चुकीच्या समजुतीत आणि पापात गुरफटलेलीच राहते.

अशी फाजील खात्री बाळगणाऱ्यांशी आपण कठोरपणे वागतो हे दाखवण्यासाठी येशू ही शिकवण देत नाही; उलट, या पापात अडकलेल्यांवर मोठी दया करून तो ही शिकवण देतो.  या पापातून एखाद्या व्यक्तीला खडबडून जागे करून मुक्त करण्यासाठी सत्याचा असा धक्कादायक उलगडा आवश्यक असतो.  या बाबतीत, एके दिवशी येशूच्या तोंडून हे शब्द ऐकावे लागतील, ही भीतीच फाजील खात्री बाळगणाऱ्यांना त्या पापातून मुक्त होण्यास आणि सत्याला सामोरे जाण्यास मदत करेल.  

आज चिंतन करा: कोणत्या बाबतीत तुम्ही स्वतःशी किंवा इतरांशी प्रामाणिक राहत नाही? तुमच्या जीवनात अशी काही फाजील खात्री असेल, तर तिचा शेवट काय होऊ शकतो, या जाणिवेच्या धक्क्याने तुम्हाला या पापातून बाहेर पडण्यास मदत होऊ द्या. म्हणजे फार उशीर होण्यापूर्वी, आताच तुम्ही देवासमोर नम्र होऊ शकाल. आपला प्रभू तुमच्यावर किती गाढ प्रेम करतो, हे लक्षात ठेवा आणि त्या प्रेमाच्या बळावर आपल्या जीवनाला प्रामाणिकपणे आणि सचोटीने सामोरे जा.

माझ्या प्रेमळ प्रभू, माझे तुझ्यावर गाढ प्रेम आहे. माझे प्रेम नेहमी प्रामाणिक, खरे आणि पूर्ण असावे, अशी मी प्रार्थना करतो.  माझ्या जीवनात मी कुठे कुठे तुझ्यावर पूर्ण अंतःकरणाने प्रेम करण्यात कमी पडतो, हे मला दिसू दे.  प्रिय प्रभू, काहीही राखून न ठेवता मी माझे जीवन तुला अर्पण करतो.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

संत ज्यूड यांची नोव्हेना
निराशाजनक परिस्थिती आणि मार्ग न दिसणाऱ्या अडचणींसाठी
ही प्रार्थना वर्षात कधीही करता येते, विशेषतः 19–27 ऑक्टोबरदरम्यान

संत मदर तेरेसांवरील माहितीपट—२ & ३ नोव्हेंबर!

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

प्रमुख चित्र: ख्रिस्ताचा न्यायनिवाडा. चित्रकार: आंत्वान व्हिर्ट्झ, विकिमीडिया कॉमन्सवरून