मराठी

घाईघाईने दोष ठरवण्याच्या सवयीवर मात

30 ऑक्टोबर 2026
सामान्य काळातील तिसाव्या आठवड्याचा शुक्रवार
आजची वाचने

मंदिरात आजाऱ्यांना बरे करणारा ख्रिस्त, बेंजामिन वेस्ट यांचे चित्र

व्हिडिओ

एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परुश्याच्या घरी जेवायला गेला. तिथले लोक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्याच्यासमोर जलसूजेने पीडित एक मनुष्य होता. तेव्हा येशूने धर्मशास्त्रज्ञांना आणि परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी एखाद्याला बरे करणे नियमाला धरून आहे की नाही?” लूक 14:1–3

आज आपण येशूच्या प्रश्नाचे उत्तर सहज आणि खात्रीने देऊ शकतो: “होय, शब्बाथ दिवशी एखाद्याला बरे करणे नियमाला धरून आहे!” पण धर्मशास्त्रज्ञांना आणि परुश्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही, किंवा ते उत्तर द्यायला तयार नव्हते. शरीरात द्रव साचल्यामुळे येणाऱ्या जलसूजेने तो मनुष्य पीडित होता. येशूने शब्बाथ दिवशी त्याला बरे केले, तरीही ते गप्पच राहिले.

चमत्कार पाहूनही ते गप्प का राहिले? बहुधा त्यांनी आठव्या आज्ञेविरुद्ध पाप केले होते: घाईघाईने दुसऱ्याचा दोष ठरवण्याचे पाप. कॅथलिक ख्रिस्तसभेची धर्मशिक्षणसंहिता असे स्पष्ट करते: “जो कोणी पुरेसा आधार नसताना आपल्या शेजाऱ्याचा नैतिक दोष खरा मानतो, मग तो तसे उघडपणे बोलत नसला तरी, तो घाईघाईने दोष ठरवण्यास दोषी ठरतो” (धर्मशिक्षणसंहिता 2477). पुढे ती म्हणते, “घाईघाईने दोष ठरवणे टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याचे विचार, शब्द आणि कृती यांचा शक्य तितका चांगला अर्थ लावण्याची काळजी घ्यावी” (धर्मशिक्षणसंहिता 2478).

त्या भोजनाला उपस्थित असलेल्या धर्मनेत्यांनी येशूविषयी आधीच सर्वांत वाईट ते गृहीत धरले होते, असे दिसते. त्याच्यात काही दोष सापडतो का, हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते असे वाटते. अशा वृत्तीची सुरुवातच समोरची व्यक्ती दोषी आहे असे गृहीत धरण्यापासून होते. त्यामुळे अंतःकरण कठोर होते आणि सत्य दिसेनासे होते. नियमांच्या बाबतीत परुश्यांनी जशी पापे केली, तशी पापे आपण कदाचित करत नसू, विशेषतः मशीहाच्या बाबतीत. पण इतरांचा दोष घाईघाईने ठरवणे ही आपल्यात सहज आढळणारी उणीव आहे. ती दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

तुमच्या सर्वांत जवळच्या व्यक्तींचा आणि ज्यांच्याशी तुमचा नेहमी संबंध येतो अशा लोकांचा विचार करा. काही लोकांविषयी तुम्ही सर्वांत वाईट तेच गृहीत धरता का? कदाचित एखाद्याने तुम्हाला दुखावले असेल किंवा त्या व्यक्तीचे वागणे तुम्हाला वारंवार खटकले असेल. अशा वेळी मनात राग धरून ठेवणे आणि त्या व्यक्तीत दोष शोधत राहणे सहज घडते. घाईघाईने दोष ठरवण्यातली अडचण अशी की आपला निष्कर्ष आपल्यालाच योग्य वाटू शकतो. काही गोष्टी आपल्याला माहीत आहेत, म्हणून ती व्यक्ती कशी आहे हेही आपल्याला माहीत आहे, अशी आपण स्वतःची समजूत घालतो. पण असा तर्क चुकीचा आहे.

खरे तर प्रत्येक व्यक्तीचे अंतरंग अतिशय गुंतागुंतीचे असते. केवळ देवाचे स्वरूपच सरल आहे. संत थॉमस अक्विनास स्पष्ट करतात त्याप्रमाणे, देव अविभाज्य आहे, त्याच्या ठायी कोणतीही विसंगती नाही आणि त्याची प्रत्येक कृती परिपूर्ण प्रेमातून घडते. याउलट, भूतकाळातील जखमा, भावनिक व मानसिक संघर्ष, पापाची आसक्ती आणि अंतर्मनातील द्वंद्व यांचे ओझे आपण वाहत असतो. अनेकदा या गोष्टी आपल्यालाही पूर्णपणे समजत नाहीत.

ही जाणीव आपल्याला इतरांविषयी उदार मनाने विचार करण्यास प्रवृत्त करायला हवी. “आपल्या शेजाऱ्याचे विचार, शब्द आणि कृती यांचा शक्य तितका चांगला अर्थ लावण्याची काळजी घ्यावी,” असे आवाहन आपल्याला केले आहे. यासाठी मोठ्या प्रेमाची गरज असते, विशेषतः जेव्हा आपल्याला दुखावले गेले असते.

घाईघाईने दोष ठरवण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी आपण जोपासू शकतो अशा सर्वांत मुक्तिदायी वृत्तींपैकी एक म्हणजे क्षमाशीलता. प्रभूच्या प्रार्थनेतील पाचवी विनंती आठवा: “जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर.” कोणी आपल्याविरुद्ध पाप केले असेल, किंवा तसे केल्याचे आपल्याला वाटत असेल, तरीही आपल्याला क्षमा करण्याचे आवाहन आहे. ज्याने आपल्याला दुखावले त्याच्याविरुद्ध आपण मनात काहीही ठेवू नये.

मनापासून आणि पूर्णपणे क्षमा करण्याची वृत्ती घाईघाईने दोष ठरवण्याची सवय मुळासकट उपटून टाकते. प्रत्येक न्यायनिवाडा देवावर सोपवणे चांगले आणि पवित्र आहे, याची आपण स्वतःला आठवण करून दिली पाहिजे. आपला निकाल योग्य वाटतो, तेव्हा तर हे विशेष महत्त्वाचे असते. देवच एकमेव न्यायाधीश आहे. न्यायनिवाडा करण्यापासून दूर राहून आपण दुसऱ्याच्या पापाचे समर्थन करत नाही; न्याय करणे हे आपले काम नाही, एवढेच मान्य करतो. तो अधिकार केवळ देवाचा आहे.

आज चिंतन करा: तुम्ही इतरांविषयी मनात काही ठाम निकाल धरून बसला आहात का? तुमचे अंतःकरण मृदू करावे, तुम्हाला स्पष्ट दृष्टी द्यावी आणि प्रभू जसा इतरांकडे पाहतो तसे त्यांच्याकडे पाहण्यासाठी लागणाऱ्या प्रेमाने तुम्हाला भरून टाकावे, अशी त्याच्याकडे विनंती करा. क्षमा करा, दया दाखवा आणि ज्याच्या दृष्टीला सर्व काही पूर्णपणे दिसते, त्याच्यावर सगळा न्यायनिवाडा सोपवा. या पापावर मात करणे हे केवळ ज्या व्यक्तीविरुद्ध आपण पाप करतो तिच्या भल्याचे नाही, तर आपल्या स्वतःच्या आत्म्याच्याही भल्याचे आहे. कारण त्यामुळे देव जसे प्रेम करतो तसे प्रेम करण्यास आपण मोकळे होतो.

हे परिपूर्ण प्रभू, तू पूर्णपणे निर्दोष होतास आणि तुझे प्रेम दैवी होते, तरीही तुझ्या काळातील अनेक धर्मनेत्यांनी घाईघाईने तुला दोषी ठरवले. तुझ्याशी आणि इतरांशी असलेल्या माझ्या नात्यात हे पाप टाळण्याची कृपा मला दे. सर्वांत वाईट तेच मी कधीही गृहीत धरू नये, विशेषतः तू माझ्या प्रार्थना ऐकत नाहीस असे मला वाटते तेव्हा. त्याऐवजी, तुझ्या दैवी इच्छेवर अधिक दृढ विश्वास ठेवण्यास मला मदत कर. इतरांमधील चांगुलपणा मी नेहमी शोधत राहावे आणि जेव्हा कोणी माझा अपराध करील तेव्हा मी त्याला लगेच क्षमा करावी. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सदस्य व्हा — आमच्या यूट्यूब चॅनेलचे!
नवीन सामग्री प्रकाशित झाल्यावर सूचना मिळवा.

ऑक्टोबर महिना आहे पवित्र जपमाळेचा

जॉर्जियाच्या हुतात्म्यांच्या धन्यपदाची घोषणा: 31 ऑक्टोबर 2026
जॉर्जिया, अमेरिका

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्साच्या वाचनांचे पर्याय