मराठी

अरुंद दारातून प्रवेश

२९ ऑक्टोबर २०२५
सामान्य काळातील तिसाव्या आठवड्याचा बुधवार
आजची वाचने

© झुझे लुईझ बेर्नार्देश रिबेरू

व्हिडिओ

कोणीतरी त्याला विचारले, “प्रभू, थोड्याच लोकांचे तारण होईल का?” त्याने त्यांना उत्तर दिले, “अरुंद दारातून आत जाण्यासाठी झटा. कारण मी तुम्हांला सांगतो, पुष्कळ जण आत जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यासाठी लागणारे बळ त्यांच्यात नसेल.” लूक 13:23–24

आपल्या प्रभूचे वरचे शब्द आपण नक्कीच मनावर घेतले पाहिजेत. आपले तारण होईल असे गृहीत धरणे सोपे आहे. देव दयाळू आहे, आपण मनाने चांगले आहोत आणि त्यामुळे आपले तारण निश्चित आहे, असे सहज वाटू शकते. पण येशू असे म्हणत नाही.

मग कोणाचे तारण होईल? देवाच्या इच्छेने आपण स्वर्गात पोहोचलो, तर कोणाचे तारण झाले आणि कोणाचे झाले नाही, हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटू शकते. आजच्या सुवार्तेतील हा एक स्पष्ट संदेश आहे. येशू तर असेही सांगतो की काही जण मरणानंतर आपल्याला स्वर्गात प्रवेश मिळेल असे गृहीत धरतील. पण आपल्या प्रभूचे हे शब्द त्यांना ऐकावे लागतील: “तुम्ही कोठून आलात हे मला माहीत नाही. अहो दुष्कर्म करणाऱ्यांनो, तुम्ही सगळे माझ्यापासून दूर व्हा!” हे शब्दही आपण मनावर घेतले पाहिजेत.

आपण ज्या पापांत पडू शकतो, त्यांपैकी एक अत्यंत धोकादायक पाप म्हणजे आपले तारण होणारच असे गृहीत धरणे. ही वृत्ती घातक आहे, कारण तिचा आपल्यावर दुहेरी परिणाम होतो. एक तर, या वृत्तीच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने मरणपातक केलेले असते, पण त्याबद्दल पश्चात्ताप केलेला नसतो. शिवाय, ती स्वतःचे पाप मान्य करायलाच नकार देते, त्यामुळे ती पश्चात्तापही करू शकत नाही. तिची सदसद्विवेकबुद्धी काम करत नाही. तिने स्वतःच्या डोळ्यांवर झापडे लावली आहेत आणि देवानेही तशीच झापडे लावावीत अशी तिची अपेक्षा असते. पण देव सर्व काही पाहतो आणि त्यानुसार न्याय करतो.

स्वर्गप्राप्ती सोपी नाही, हे सांगण्यासाठी येशू “अरुंद दाराची” उपमा देतो. त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आणि देवाची असीम दया लाभणे, या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आपल्या परीने पाहता, आपण देवाची इच्छा जाणून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आणि त्याला उदार मनाने प्रतिसाद दिला, तरच स्वर्गप्राप्ती शक्य आहे. याची सुरुवात म्हणजे आपल्या पापांची कबुली देणे आणि ती पापे सोडून देणे. त्यानंतर आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.

हे स्वीकारणे कठीण वाटत असेल, तर एवढेच लक्षात ठेवा की ही शिकवण खुद्द येशूने दिली आहे. त्याचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे आणि तो जे सांगतो ते त्याला खरोखरच अभिप्रेत आहे. हे ऐकून तुमच्या मनात एक प्रकारचे पवित्र भय जागे होत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. “पवित्र भय” ही एक देणगी आहे. तिच्यामुळे आपली सदसद्विवेकबुद्धी योग्य रीतीने घडते आणि आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी चिरंतन तारणाच्या मार्गात दूर न होणारे अडथळे बनल्या आहेत, हे ती ओळखू शकते. अशी योग्य रीतीने घडलेली सदसद्विवेकबुद्धीच आपल्याला त्या अरुंद दाराकडे नेईल. तेच चिरंतन जीवनाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे.

चिरंतन तारणाचा विषय आपण सर्वांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, या सत्यावर आज चिंतन करा. आपल्या आध्यात्मिक जीवनात ढिलाई आली आहे असे जाणवले, तर बदल घडवण्यासाठी या सुवार्तेतून प्रेरणा घ्या. स्वर्गाचे दार ठोठावल्यावर आपला प्रभू आपल्याला ओळखत नाही, असे ज्यांना कळेल, त्यांच्यापैकी तुम्ही होऊ नका. आपले तारण होणारच असे गृहीत धरण्याचे पाप जीवनातून मुळासकट काढून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करा. मग स्वर्गात तुमचे प्रतिफळ खरोखरच मोठे असेल.

हे माझ्या परमदयाळू प्रभू, केवळ तूच आमच्यासाठी स्वर्गाची दारे उघडू शकतोस, आणि तुझ्या पवित्र इच्छेला ज्यांनी प्रतिसाद दिला आहे त्यांच्यासाठीच तू ती उघडशील. मी कोणकोणत्या बाबतींत तुझ्यापासून दूर जातो आणि माझ्या आध्यात्मिक वाटचालीत ढिलाई करतो, हे मला दिसावे म्हणून माझे डोळे उघड. हे स्पष्टपणे पाहण्यासाठी आणि तुला मनापासून प्रतिसाद देण्यासाठी मला आवश्यक ती कृपा दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

आजचे संत आणि सण

मिस्सातील वाचनांचे पर्याय