३१ ऑक्टोबर २०२२
सामान्य काळातील एकतिसाव्या आठवड्याचा सोमवार
आजची वाचने

“…जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, अपंग, लंगडे आणि आंधळे यांना आमंत्रण दे. ते तुझी परतफेड करू शकत नाहीत, म्हणून तू खरोखर धन्य होशील. कारण नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.” लूक 14:13-14
जीवनात आपण कितीतरी वेळा तात्काळ फळ मिळावे म्हणून काम करण्याच्या सापळ्यात अडकतो. आपण एखादे काम चांगले केले, तर लोकांनी त्याची दखल घ्यावी, आपले आभार मानावेत आणि त्याचा मोबदला द्यावा, असे आपल्याला वाटते. पण येशूच्या या बोधातून हे स्पष्ट होते की आपण इथे आणि आत्ता कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता सेवामय जीवन जगावे. त्याऐवजी, आपले प्रतिफळ स्वर्गात मिळेल अशी आशा ठेवावी.
आपल्या प्रभूने दिलेले हे कार्य प्रत्यक्ष जीवनात पार पाडणे कठीण जाऊ शकते. त्यासाठी पूर्ण निःस्वार्थपणे आणि बदल्यात काहीही मिळावे अशी अपेक्षा न ठेवता दुसऱ्याची काळजी घ्यावी लागते. पण हे आध्यात्मिक तत्त्व समजले की आपल्याला उमगते: ‘प्रतिफळ’ केवळ स्वर्गातच आपली वाट पाहत नाही; आपल्या निःस्वार्थ कृतीतून ते इथे आणि आत्ताही आपल्याला मिळते.
इतरांची निःस्वार्थ सेवा केल्याबद्दल आपल्याला इथे आणि आताच मिळणारा ‘मोबदला’ म्हणजे जीवनातील पावित्र्य. इतरांवर दया करण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा आपले जीवन पवित्र होते. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता गरजू व्यक्तीच्या भल्यासाठी केलेली प्रेमाची कृती म्हणजे दया. बदल्यात आपल्याला काहीतरी मिळावे, या अटीवर ती केली जात नाही. दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असल्यामुळे, केवळ तिच्या भल्यासाठी आणि अन्य कोणत्याही हेतूशिवाय आपण तिच्यावर दया करतो. पण आनंदाची गोष्ट अशी की, खरी दया दाखवणाऱ्या व्यक्तीवरही त्या कृतीचा खोल परिणाम होतो. दुसऱ्यावर निःस्वार्थपणे दया करून आपण आपल्या दयाळू देवाचे अनुकरण करतो आणि अधिकाधिक त्याच्यासारखे होतो. दुसऱ्या कोणाकडूनही आपल्याला मिळू शकेल अशा कोणत्याही प्रतिफळापेक्षा हे प्रतिफळ मोठे आहे.
आज चिंतन करा: गरजू लोकांशी दयेने वागण्याची तुमची कितपत तयारी आहे? त्यांच्याकडून परतफेडीची अपेक्षा न ठेवता तुम्ही द्यायला तयार आहात का? तसे असेल, तर जगाकडून मान मिळवून देणाऱ्या कोणत्याही कृतीपेक्षा या निःस्वार्थ कृतीत तुम्हाला कितीतरी मोठा आशीर्वाद लाभेल.
हे परमदयाळू प्रभू, सर्व गरजूंसाठी दया आणि करुणा यांनी भरलेले हृदय मला दे. कोणत्याही प्रतिफळाची अपेक्षा न करता दररोज त्यांची सेवा करण्याचा मी प्रयत्न करावा. दयेच्या या कृती हेच माझ्यासाठी पुरेसे प्रतिफळ ठरोत आणि माझ्या जीवनातील पावित्र्याचा उगम व पाया बनोत. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
आगमनकाळासाठी आणि नाताळासाठी नवे साहित्य!
आगमनकाळ आणि नाताळकाळातील चिंतन
संत मदर तेरेसा यांच्यावरील माहितीपट—२ & ३ नोव्हेंबर!
सामान्य काळासाठी पवित्र शास्त्रावरील चिंतन





