मराठी

कृतज्ञ अंतःकरण

24 नोव्हेंबर 2022
अमेरिका: कृतज्ञता दिन—ऐच्छिक स्मृतिदिन

(अमेरिकेबाहेरील देशांसाठी सामान्य काळातील चौतिसाव्या आठवड्याच्या गुरुवारचे चिंतन पाहा.)

आजची वाचने

व्हिडिओ

येशूने उत्तर दिले, “दहाही जण शुद्ध झाले होते, नाही का? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? देवाचे आभार मानण्यासाठी या परदेशी माणसाशिवाय दुसरा कोणीच परत आला नाही काय?” लूक 17:17-18

कृतज्ञता दिनाच्या शुभेच्छा! कृतज्ञता दिन हा खास कॅथलिक पवित्र दिवस नसला, तरी आपल्या श्रद्धाजीवनाशी त्याचा जवळचा संबंध आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहता, कृतज्ञतेला शुभवर्तमानाच्या संदेशात मध्यवर्ती स्थान आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. कृतज्ञता दिन आपल्या श्रद्धेच्या या पैलूवर चिंतन करण्याची उत्तम संधी देतो. सदैव मनापासून कृतज्ञ राहण्याचे आपल्याला आवाहन आहे. तुम्ही देवाचे किती आभारी आहात?

कृतज्ञ राहणे आपणा सर्वांनाच वेगवेगळ्या प्रकारे कठीण जात असेल. स्वर्गात आपल्याला परिपूर्णता प्राप्त होईपर्यंत आपली कृतज्ञता कधीच पुरेशी ठरणार नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पण सध्या कृतज्ञतेवर चिंतन करणे आणि ती आपल्या आत्म्यात वाढावी यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

सर्वप्रथम, देवाने आपल्यासाठी जे काही केले आहे ते स्पष्टपणे दिसल्याशिवाय आपल्या मनात कृतज्ञता जागणार नाही. जीवनात आपले लक्ष केवळ अडचणींवरच खिळून राहते आणि त्यामुळे आपण सहज खचतो, निराश होतो, वैतागतो, तर कधी रागावतोही. पण रोजच्या जीवनात आपल्याला वाहावे लागणारे क्रूस आणि ओझी यांपलीकडे पाहून आपल्या प्रभूने आपल्याला किती विपुल कृपा आणि दया दिली आहे, हे ओळखणे कितीतरी अधिक कठीण आहे. ती दया आणि कृपा आपल्याला दिसली नाही, तर खऱ्या अर्थाने कृतज्ञ राहणे आपल्याला फार कठीण जाईल.

म्हणून या कृतज्ञता दिनी या साध्या प्रश्नावर चिंतन करा: देवाने माझ्यासाठी जे काही केले आहे ते मला दिसते का? त्याची विपुल दया माझ्या जीवनात कार्यरत आहे, हे मला दिसते का? वर दिलेल्या शुभवर्तमानातील उताऱ्यात येशूने कुष्ठरोग झालेल्या दहा जणांना बरे केले, पण त्यांपैकी केवळ एकच जण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परत आला. कृतज्ञता व्यक्त करण्यात कमी पडलेल्या त्या नऊ जणांपैकी एखाद्यासारखे तुम्ही आहात का? तसे असेल, तर देवाकडून मिळालेले खरे आणि विपुल आशीर्वाद ओळखणे तुम्हाला बहुधा कठीण जात असावे. पूर्णपणे कृतज्ञ राहणे आपल्याला कठीण जाते, हे तुम्ही नम्रपणे मान्य करू शकलात, तर सत्य अधिक स्पष्टपणे पाहण्याच्या दिशेने आणि तुमच्या मनात असायला हवी ती अधिक खोल कृतज्ञता जोपासण्याच्या दिशेने तुम्ही पहिले पाऊल टाकले असेल. कृतज्ञ असणे म्हणजे सत्य स्पष्टपणे पाहणे. त्या सत्याचा स्वीकार करण्यास तयार राहा; देव तुमचे जीवन बदलेल आणि तुम्हाला आनंदाने भरून टाकेल!

हे प्रभू, माझे हृदय कृतज्ञतेने भरून टाक.  तुझ्या अथांग कृपेकडे आणि दयेकडे माझी दृष्टी वळवायला मला मदत कर.  जीवनातील संघर्ष आणि मला खचवणारी ओझी यांपलीकडे पाहायला मला मदत कर.  त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, तू माझ्यासाठी जे काही केले आहेस आणि आजही जे काही करत आहेस, त्या सर्वांची मला अधिकाधिक जाणीव होऊ दे.  हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

सर्व संत / सण

अधिक वाचन –अमेरिका: कृतज्ञता दिन

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वर दिलेले चित्र: “प्लायमथचा पहिला कृतज्ञता दिन” (1914), चित्रकार जेनी ए. ब्राउन्सकॉम्ब, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने