मराठी

प्रायश्चित्तकाळ—‘गुप्तपणे’ ख्रिस्ती जीवन जगणे

बुधवार, 22 फेब्रुवारी 2023
राखेचा बुधवार (वर्ष अ)

आजची वाचने

व्हिडिओ

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “आपली सत्कृत्ये लोकांनी पाहावीत म्हणून ती करू नका, याची काळजी घ्या; नाहीतर तुमच्या स्वर्गीय पित्याकडून तुम्हाला कोणतेही प्रतिफळ मिळणार नाही.” मत्तय 6:1

चारचौघांत होणाऱ्या कौतुकातून आपल्याला एक प्रकारचे लौकिक समाधान मिळते. आपण जे साध्य केले आहे, त्याची इतरांनी दखल घ्यावी असे आपल्याला अनेकदा वाटते. इतरांनी आपले कौतुक करावे अशी आपली इच्छा असते आणि आपण किती चांगली कामे करतो, हे त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठीही आपण कित्येकदा विशेष धडपड करतो. तुमचे काय? इतरांच्या नजरेत आपले महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही नेहमी करता का?

जुन्या कराराच्या काळात लौकिक मानसन्मान मिळवण्याची इच्छा असणे सामान्य होते. खरे तर, देवाची आज्ञा पाळल्यामुळे मिळणारे ‘आशीर्वाद’ असे मोशेच्या नियमशास्त्रात या मानसन्मानांचे वर्णन केले आहे (अनुवाद 28 पाहा). पण येशूने दिलेल्या कृपेच्या नव्या नियमातील एक मुख्य तत्त्व असे होते की लौकिक मानसन्मान मिळवणे हे आता जीवनाचे ध्येय असू नये. त्याऐवजी अंतःकरणातील पावित्र्याची संपदा आणि स्वर्गात साठवलेले धन यांवर आपले लक्ष असावे. आजचे शुभवर्तमान आपल्याला सावध करते की लोकांकडून कौतुक मिळवण्याच्या प्रयत्नात आपण स्वर्गीय पित्याकडून मिळणारे प्रतिफळ गमावतो. दानधर्म, उपवास आणि प्रार्थना गुप्तपणे करणे उत्तम, म्हणजे “गुप्तपणे केलेले पाहणारा तुमचा पिता तुम्हाला प्रतिफळ देईल.”

प्रायश्चित्तकाळातील आपल्या वाटचालीला सुरुवात करताना, तुमच्या श्रद्धामय आणि प्रेममय जीवनामागचे हेतू आणि ध्येये प्रामाणिकपणे तपासण्याची ही चांगली वेळ आहे. आपली श्रद्धा आणि प्रेम यांचे आचरण गाजावाजा न करता करणे, हे आपले एक ध्येय असले पाहिजे. आपल्या श्रद्धाजीवनाला काही अंशी गुप्ततेची जोड असली पाहिजे. याचा अर्थ आपण ख्रिस्ती नाही किंवा आपल्याला आपल्या श्रद्धेची लाज वाटते, असे भासवणे नव्हे. उलट, श्रद्धेचे ‘अप्रकट’ आणि ‘गुप्त’ आचरण म्हणजे देवावर आपले प्रेम आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करावी असे आपल्याला वाटते, म्हणून प्रार्थना करणे, सेवा करणे, उपवास करणे आणि देवाशी आपले नाते अधिक दृढ करणे. देवाशी असलेल्या नात्यातून आपल्या अंतःकरणाला लाभणारे आशीर्वाद हेच आपले सर्वांत मोठे प्रतिफळ आहे. आपण आपल्या अंतःकरणात डोकावून तिथे वास करणाऱ्या देवाचा शोध घेतला पाहिजे. देवाशी अशी आंतरिक जवळीक असली पाहिजे, जिची जाणीव केवळ आपल्यालाच असते. देवावरचे हे गुप्त, आंतरिक आणि जिव्हाळ्याचे प्रेम आपल्याला बदलून टाकणारे आणि आपले सारे जीवन व्यापून टाकणारे झाले पाहिजे. देवाशी असलेले हे आंतरिक नाते तुमच्या जीवनात किती जिवंत आहे?

आनंदाची बातमी ही आहे की आपल्या आत्म्याच्या गुप्त गाभ्यात आपण आपल्या प्रेमळ देवाशी जिव्हाळ्याचे नाते जोडतो, तेव्हा देव आपल्याद्वारे इतरांच्या जीवनाला स्पर्श करतो. इतरांना आपला हेवा वाटणार नाही, आणि त्यांचे कौतुक मिळवणे हेही आपले ध्येय असणार नाही. आपण सगळ्यांच्या नजरेचे केंद्र होणार नाही. उलट, देव आपल्याद्वारे इतरांना स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहण्यास मदत करेल, जेणेकरून देवाचे त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे त्यांना उमगेल. एका अर्थाने, या गुप्ततेत आपण पडद्याआड राहतो आणि आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात बदल घडवणारा देवच असतो. हीच खरी श्रद्धा. हेच खरे पावित्र्य. हेच खरे प्रेम. यासाठीच आपण प्रार्थना करतो, उपवास करतो आणि इतरांसाठी स्वतःला देतो. आपले कौतुक व्हावे म्हणून नव्हे, तर देवावरील प्रेमापोटी, आपल्या आत्म्यांच्या पावित्र्यासाठी आणि इतरांच्या तारणासाठी.

या प्रायश्चित्तकाळात देवाला अगदी गुप्तपणे, कुणाच्याही नकळत तुमच्याकडे यायचे आहे, या साध्या सत्यावर आज मनन करा. त्याला आपले प्रेम खास तुम्हाला प्रकट करायचे आहे. तुम्ही किती पवित्र आहात हे सर्वांना सांगता यावे म्हणून नव्हे, तर तुमच्या अंतःकरणात देवाच्या प्रेमाची तुम्हाला जाणीव व्हावी म्हणून. देवाला तुमच्याशी जे गुप्त आणि पवित्र नाते जोडायचे आहे, त्यावर मनन करा. हे नाते तुम्ही वाढू दिलेत, तर तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही अशा रीतीने देव तुमच्याद्वारे इतरांच्या जीवनालाही स्पर्श करू शकेल, हे लक्षात ठेवा.

हे गुप्तपणे वास करणाऱ्या माझ्या प्रभू, माझ्या आत्म्याच्या गुप्त गाभ्यात येऊन तुझे प्रेम मला प्रकट करण्याची तुझी इच्छा आहे. तिथे दररोज तुझी भेट घेता यावी आणि तुझ्याशी माझे जिव्हाळ्याचे नाते अधिकाधिक दृढ व्हावे. या प्रायश्चित्तकाळात तू माझ्याकडे येत असताना, तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक गुप्त मार्गांनी माझा साधन म्हणून उपयोग कर. हे प्रभू, सर्व स्तुती आणि गौरव तुलाच असो. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.

क्रुसाच्या पायथ्याशी 40 दिवस: प्रस्तावना
आपल्या धन्य मातेच्या हृदयातून उमटलेली प्रेमळ दृष्टी

प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य

प्रायश्चित्तकाळासाठी निवडक पुस्तके:

शुभवर्तमानावरील आणखी चिंतने

दैवी दयेवरील चिंतन

प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने

सर्व संत / सण

अधिक वाचन – राखेचा बुधवार

आजचे संत – संत प्रेषित पेत्राचे धर्मासन—सण
2023 मध्ये या दिवशी राखेचा बुधवार असल्याने हा सण साजरा केला जात नाही.

मिस्साच्या वाचनांचे पर्याय

वरील मुख्य छायाचित्र: राखेचा बुधवार (फ्लिकरवरून)