३ फेब्रुवारी २०२४
सामान्य काळातील चौथ्या आठवड्याचा शनिवार
आजची वाचने
संत ब्लेझ, बिशप व रक्तसाक्षी — ऐच्छिक स्मरण
संत अन्सगार, बिशप — ऐच्छिक स्मरण

“तुम्ही सर्वांपासून दूर एखाद्या एकांतस्थळी चला आणि थोडी विश्रांती घ्या.” मार्क 6:34
बारा प्रेषित गावोगावी फिरून शुभवर्तमानाची घोषणा करून नुकतेच परतले होते. ते थकले होते. येशूला त्यांची कणव आली आणि त्याने त्यांना थोडी विश्रांती घेण्यासाठी आपल्याबरोबर एकांतात येण्यास सांगितले. म्हणून ते नावेत बसून पलीकडच्या एका एकांतस्थळी निघाले. पण लोकांना हे कळताच नाव ज्या ठिकाणी जात होती तिकडे ते पायीच घाईघाईने गेले. त्यामुळे नाव तिथे पोहोचली तेव्हा लोकांचा जमाव त्यांची वाट पाहत होता.
अर्थात, येशू चिडला नाही. त्याच्या आणि बारा प्रेषितांच्या सहवासात राहण्याची लोकांची उत्कट इच्छा पाहून तो निराशही झाला नाही. उलट, शुभवर्तमान सांगते की त्यांना पाहून “त्याच्या अंतःकरणात करुणा दाटून आली,” आणि तो त्यांना अनेक गोष्टी शिकवू लागला.
आपल्याही जीवनात इतरांची मन लावून सेवा केल्यावर विश्रांती घ्यावीशी वाटणे स्वाभाविक आहे. स्वतःसाठी आणि आपल्या प्रेषितांसाठी येशूलाही विश्रांती हवी होती. पण लोकांना त्याच्या सहवासात राहण्याची आणि त्याच्या उपदेशातून आध्यात्मिक पोषण मिळवण्याची मनापासून इच्छा होती, हे स्पष्ट दिसताच येशूने आपल्या विश्रांतीत ‘खंड’ पडू दिला. आपल्या प्रभूच्या या उदाहरणातून शिकण्यासारखे बरेच काही आहे.
उदाहरणार्थ, आईला किंवा वडिलांना अनेकदा थोडा वेळ एकांतात घालवावासा वाटतो; पण नेमक्या त्याच वेळी घरात एखादी बाब उद्भवते आणि तिच्याकडे लक्ष द्यावे लागते. धर्मगुरू आणि व्रतस्थ स्त्री-पुरुष यांच्यावरही सेवाकार्यातून अनपेक्षित जबाबदाऱ्या येऊ शकतात. सुरुवातीला त्यामुळे आपल्या बेतात व्यत्यय येतो आहे असे त्यांना वाटू शकते. जीवनातील कोणत्याही पाचारणाला किंवा परिस्थितीला हे लागू पडते. आपल्याला एका गोष्टीची गरज आहे असे वाटत असते; पण कर्तव्याची हाक येते, तेव्हा आपली गरज भलत्याच कामासाठी आहे, हे लक्षात येते.
आपले कुटुंबीय, ख्रिस्तसभा, आपले समाजगट किंवा मित्र यांच्यासाठी ख्रिस्ताच्या प्रेषितीय कार्यात सहभागी होण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे आपला वेळ आणि शक्ती उदारपणे देण्याची तयारी ठेवणे. काही वेळी विश्रांती घेणेच विवेकाला धरून असते, हे खरे. पण इतर वेळी, विश्रांती आणि विरंगुळ्याची आपली गरज वाजवी वाटत असली, तरी प्रेमाने सेवा करण्याच्या हाकेला पहिले स्थान द्यावे लागते. जेव्हा खरे प्रेम आपल्याकडून अशी सेवा मागते, तेव्हा आपला वेळ उदारपणे देण्यासाठी आवश्यक ती कृपा प्रभू आपल्याला नेहमी देतो, याचा आपल्याला अनुभव येईल. अनेकदा अशाच क्षणी प्रभू आपल्याद्वारे इतरांच्या जीवनात खरा बदल घडवून आणतो.
आज आपल्या सभोवतालच्या लोकांच्या खऱ्या गरजांवर चिंतन करा. आज तुम्ही दिलेल्या वेळेचा आणि लक्षाचा कोणाला मोठा फायदा होईल का? इतरांच्या अशा काही गरजा आहेत का, की ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे बेत बदलावे लागतील आणि कठीण वाटले तरी स्वतःला त्यांच्या सेवेसाठी द्यावे लागेल? इतरांसाठी स्वतःला उदारपणे देण्यास कचरू नका. खरे तर, अशा प्रेमळ सेवेमुळे केवळ आपण ज्यांची सेवा करतो त्यांच्या जीवनातच बदल घडत नाही; आपल्यालाही अशा सेवेतून अनेकदा विलक्षण विसावा आणि नवी उमेद मिळते.
हे माझ्या उदार प्रभू, तू स्वतःला पूर्णपणे अर्पण केलेस. लोक आपल्या गरजा घेऊन तुझ्याकडे आले, तेव्हा तू प्रेमाने त्यांची सेवा करण्यास मागेपुढे पाहिले नाहीस. तुझ्यासारखे उदार हृदय मला दे आणि प्रेमाने इतरांची सेवा करण्यासाठी तू मला ज्या कार्याला बोलावतोस, त्याला नेहमी “हो” म्हणायला मला मदत कर. इतरांची सेवा करण्यात, विशेषतः जीवनात अचानक आणि अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या प्रसंगी, मला मोठा आनंद मिळू दे. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रायश्चित्तकाळासाठी पुस्तके:
आजचे संत –
संत ब्लेझ, बिशप आणि रक्तसाक्षी







