१८ फेब्रुवारी २०२४
प्रायश्चित्तकाळातील पहिला रविवार (वर्ष ब)
आजची वाचने

पवित्र आत्म्याने येशूला वाळवंटात पाठवले. तो तेथे चाळीस दिवस राहिला आणि सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. तो रानटी पशूंमध्ये होता आणि देवदूत त्याची सेवा करत होते. मार्क 1:12–13
आज आपण एका अद्भुत घटनेवर चिंतन करतो. वर उद्धृत केलेल्या उताऱ्यात देवाचा पुत्र आणि परमपवित्र त्र्येकातील दुसरी व्यक्ती असलेल्या येशूने दोन प्रकारे स्वतःला नम्र केले. पहिले म्हणजे, त्याने सैतानाकडून आलेल्या मोहांना सामोरे जाणे स्वीकारले. दुसरे म्हणजे, त्याने स्वतः निर्माण केलेल्या सुष्ट देवदूतांना आपल्या मानवी रूपात आपली सेवा करू दिली.
सर्वप्रथम, सैतान हा एक पतित देवदूत आहे, हे लक्षात घ्या. देवाने त्याला निर्माण केले आणि तो मुळात चांगला होता. पण प्रकटीकरणाच्या ग्रंथात (12:4) असे सूचित केले आहे की, देवाने निर्माण केलेल्या देवदूतांपैकी एक तृतीयांश देवदूतांना स्वर्गातून पृथ्वीवर भटकण्यासाठी हाकलून देण्यात आले. हे दुष्ट आत्मे पतित देवदूतांचा प्रमुख असलेल्या सैतानाच्या इशाऱ्यावर काम करतात. म्हणूनच, वरील उताऱ्यानुसार, वाळवंटात येशूला मोहात पाडण्याचा प्रयत्न करणारा स्वतः सैतान होता. शिवाय, येशूने सुष्ट देवदूतांना आपल्या मानवी स्वभावात आपली सेवा करू दिली. या कृतींतून आपल्या प्रभूच्या मानवतेत नम्रतेचा सद्गुण किती परिपूर्ण होता, हे दिसून येते.
संत थॉमस अक्विनास यांच्या मते, देवदूतांची निर्मिती तीन मुख्य हेतूंनी झाली. पहिला हेतू म्हणजे देवाची उपासना. उपासनेमुळे त्यांना देवाशी एकात्मता लाभते आणि देव व प्रत्येक देवदूत यांच्यात परिपूर्ण प्रेमाची देवाणघेवाण होते. दुसरे म्हणजे, देवदूत सर्व बाबतींत देवाची इच्छा अमलात आणतात. त्यात निसर्गाचे नियम कार्यान्वित करणे आणि ख्रिस्ताने क्रूसावर मिळवून दिलेली कृपा प्रदान करणे यांचा समावेश होतो. तिसरे म्हणजे, देव देवदूतांना आपले संदेशवाहक म्हणून पाठवतो. देवदूतांनी संदेष्ट्यांशी, आपल्या धन्य मातेशी, संत योसेफांशी आणि इतरांशी निरनिराळ्या प्रकारे संवाद साधल्याची नोंद पवित्र शास्त्रात आहे. संत थॉमस अक्विनास यांचाही असा विश्वास होता की, आपल्यापैकी प्रत्येकाला एक संरक्षक देवदूत दिलेला आहे. त्याचे कार्य केवळ आपले रक्षण करणे नव्हे, तर देवाची इच्छा आपल्याला कळवणे हेही आहे.
देव म्हणून येशू हा पिता आणि पवित्र आत्मा यांच्यासह सर्व देवदूतांचा सृष्टिकर्ता होता. मनुष्य म्हणून त्याने सुष्ट देवदूतांची सेवा स्वीकारली आणि पतित देवदूतांच्या हल्ल्यांनाही तो सामोरा गेला. या देवदूतांच्या स्वाभाविक शक्तींना नम्रपणे स्वतःवर कार्य करू देऊन येशू आपल्यालाही तसेच करायला शिकवत होता.
सुष्ट आणि दुष्ट अशा दोन्ही प्रकारच्या देवदूतांच्या मुख्य स्वाभाविक शक्तींपैकी एक म्हणजे आपल्या मनात विचार सुचवून आपल्यावर प्रभाव टाकण्याची शक्ती. सुष्ट देवदूत तुमच्या कल्पनेत असे विचार आणू शकतात की ज्यांमुळे तुम्ही चांगल्या गोष्टींकडे वळाल. दुष्ट देवदूत मात्र तुम्हाला फसवून पापाकडे नेणारे विचार सुचवू शकतात. अशा प्रकारे ते खरोखरच आपल्याशी संवाद साधतात आणि याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आपल्या आध्यात्मिक साधना या ग्रंथात लोयोलाचे संत इग्नेशियस देवदूतांच्या सेवेकडे बरेच लक्ष देतात. पतित देवदूतांच्या खोटेपणात व फसवणुकीत आणि सुष्ट देवदूतांकडून मिळणाऱ्या सांत्वनदायी मार्गदर्शनात फरक कसा ओळखायचा, हे ते शिकवतात. आजच्या शुभवर्तमानातील उताऱ्यात येशू मोहांना सामोरा जातो आणि देवदूतांची सेवा स्वीकारतो. या देवदूतांचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न किती महत्त्वाचा आहे, हे या उताऱ्यातून अनेक प्रकारे स्पष्ट होते. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील पुस्तक पाहा: अंतरंगाचा वेध: उपासनावर्षानुसार मांडलेली इग्नेशियस यांची शिकवण व ध्यानचिंतने.
देवदूत आणि दुष्ट आत्मे हे दोघेही तुमच्या जीवनात सतत सक्रिय असतात आणि तुमच्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. या विस्मयकारक सत्यावर आज चिंतन करा. तुमच्या जीवनातील त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेचा विचार करताना, त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याचे विविध मार्ग कोणते आहेत, याचाही विचार करा. तुमच्या संरक्षक देवदूताशी बोला. देवदूतांमध्ये सर्वोच्च स्थान असलेल्यांकडे मध्यस्थीची विनंती करा. देवाच्या उपासनेत त्यांच्यासोबत सहभागी होण्याचा प्रयत्न करा. त्यांनी तुमचे रक्षण करावे म्हणून प्रार्थना करा. देवाकडून येणारी सर्वोच्च सत्ये त्यांनी तुम्हाला कळवावीत, अशी विनंती करा. या पवित्र देवदूतांकडे लक्ष द्या. म्हणजे त्यांचे स्वर ओळखायला शिकत असताना, ते देवाकडून देत असलेल्या मार्गदर्शनानुसार चालण्यास तुम्ही तयार व्हाल.
हे माझ्या प्रभू, सर्वांचा सृष्टिकर्त्या, प्रेम आणि उपासना या गौरवशाली हेतूंसाठी तू देवदूतांची निर्मिती केलीस. तुझी पवित्र इच्छा अमलात आणण्याचे आणि पृथ्वीवरील आम्हा लोकांशी संवाद साधण्याचे कार्यही तू त्यांना सोपवलेस. पतित देवदूतांची फसवणूक आणि सुष्ट देवदूतांचे मार्गदर्शन अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्यास मला मदत कर. हे देवाच्या दूतांनो, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझे रक्षण करा आणि देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार चालण्यास मला मार्गदर्शन करा. हे येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
प्रायश्चित्तकाळातील पहिल्या रविवारचे ध्यानचिंतन:
वाळवंटातील ४० दिवस
प्रायश्चित्तकाळासाठी उपयुक्त साहित्य
प्रायश्चित्तकाळासाठी पवित्र शास्त्रावर आधारित चिंतने
वरील चित्र: ख्रिस्ताची मोहपरीक्षा, विकिमीडिया कॉमन्सच्या सौजन्याने






